Konkani Drama Competition: 'हा कोकणी लेखकांचा अनादर, नाट्य चळवळीला मारक'; राज्यनाट्य स्पर्धा आणि वादांचे साद-पडसाद

Konkani Drama Competition Goa: युगांक नायक यांनी आपल्याला मिळालेले दुसरे बक्षीस हा ''कोकणी लेखकांचा अनादर आहे आणि ते नाट्य चळवळीला मारक आहे'' असे सांगून नाकारले आहे.
konkani state drama competition
konkani state drama competitionDainik Gomantak
Published on
Updated on

ज्ञानेश मोघे

कला अकादमीची कोकणी राज्य नाट्य स्पर्धा नुकतीच आटोपली, तिचे निकाल जाहीर झाले आणि यावेळी पहिल्यांदाच, ''स्वतंत्र नाट्यसंहिता'' घेऊन या स्पर्धेत उतरलेल्या नाटकांमुळे नाटकाच्या निकालावर वादांचे साद-पडसाद उमटले. त्यापैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा वाद, ''स्वतंत्र नाट्यसंहिता विभागात पहिले बक्षीस कुणालाच न मिळणे'' यासंबंधीचा आहे.

या विभागात दुसरे बक्षीस युगांक नायक यांना त्यांच्या ''देश राग'' या नाटकासाठी दिले गेले होते. दुसरा वाद निर्माण झाला तो वैभव कवळेकर यांनी स्वतंत्र नाटक असा दावा करून स्पर्धेत सादर केलेल्या ''इन सर्च ऑफ सर्व्हायवल'' या नाटकामुळे. हे नाटक स्वतंत्र नसल्याचे परीक्षकांनी नमूद करून स्पर्धेतून बाद ठरवले. 

युगांक नायक यांनी आपल्याला मिळालेले दुसरे बक्षीस हा ''कोकणी लेखकांचा अनादर आहे आणि ते नाट्य चळवळीला मारक आहे'' असे सांगून नाकारले आहे.

हा निश्चितच वादाचा मुद्दा आहे आणि त्यावर चर्चा व्हायलाच हवी. मात्र स्पर्धेतून बाद झालेले ''इन सर्च ऑफ सर्व्हायवल'' हे नियमानुसार स्वतंत्र नसल्याने व ते मूळ इंग्रजी (किंवा त्याचा अनुवाद असलेल्या मराठी) नाटकावरून सरळसरळ उचलले गेल्याचे दिसत असल्यामुळे स्पर्धेतून बाद होणे हे साहजिकच होते. त्यात कुठला वाद असताच कामा नये. कारण खोटा दावा करून नाटक सादर करणे ही मोठी चुकच आहे. अशा कृतींमुळे इतर स्पर्धकांवर देखील अन्याय होत असतो. 

स्पर्धेत संहितेसाठी दोन विभाग आहेत. एक स्वतंत्र संहितेचा आणि दुसरा अनुवादित किंवा रूपांतरित नाटकांचा. या दोन्ही विभागात पारितोषिके आहेत.

गोव्यातील नाट्य स्पर्धांचा विचार केला तर त्यातील रूपांतरित किंवा अनुवादित विभागांमध्ये अधिक नाटके असतात. नाट्य संहिता विभागातील तीव्र स्पर्धा टाळण्यासाठी किंवा आपला नावलौकिक होईल या आशेने काहीजण (यात अनेक नामांकित लेखकही सामील आहेत)

कादंबरी, सिनेमा किंवा नाटक यावर आधारून लिहिलेल्या आपल्या नाटकाला हुशारीने ''स्वतंत्र नाट्यसंहिता'' या विभागात दाखल करून नाट्यप्रयोग सादर करतात. अशी खूप उदाहरणे आहेत मात्र त्यांचा गवगवा आत्तापर्यंत झाला नव्हता, जो या कोकणी राज्य नाट्य स्पर्धेत झाला.

''स्वतंत्र नाट्यसंहिता'' असा दावा करून या स्पर्धेत सादर झालेल्या ''इन सर्च ऑफ सर्व्हायवल'' या नाटकाचे कथानक प्रख्यात लेखक स्टीफन किंग यांची ''मिजरी'' (Misery) या कादंबरीतील कथानकासारखेच हुबेहूब आहे.

''मिजरी'' या कादंबरीवर त्यानंतर त्याच नावाचा हॉलीवुडपटही आला आहे तसेच ब्रॉडवेवर याच नावाचे (आणि हेच कथानक असलेले) नाटक काही वर्षे चालले आहे. त्यात नामवंत अभिनेत्यांनी कामही केले आहे.

(युट्युबवर सिनेमा आणि नाटक दोन्हीही उपलब्ध आहेत) या नाटकाचा मराठी अनुवाद चंद्रशेखर फणसळकर यांनी मराठीत केला असून (हा अनुवाद आहे हे त्यांनी सभ्यपणे मान्यही केले आहे.) त्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी कला अकादमी आयोजित मराठी राज्य नाट्य स्पर्धेतही झाला होता. 

दुर्दैवाचे म्हणजे स्पर्धा आटपून गेल्यानंतर व त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर ''इन सर्च ऑफ सर्व्हायवल''चे लेखक वैभव कवळेकर हे मान्य करताहेत की त्यांनी मूळ कादंबरीवरून प्रेरित होऊन हे नाटक लिहिले आहे.

खरे तर कोकणी राज्य नाट्य स्पर्धेची प्रवेशिका भरताना, त्यात, नाटक अनुवादित किंवा रूपांतरित आहे का हा प्रश्न विचारलेला असतोच, त्याचबरोबर हे नाटक खास स्पर्धेसाठी‌ स्पर्धेसाठी लिहिले गेले आहे का हा देखील प्रश्न विचारला गेलेला असतो.

या प्रश्नाचे उत्तर जर संस्थेने (किंवा लेखकाने) ''होय'' असे दिलेले असेल तर ''इन सर्च ऑफ सर्वाइव्हल''च्या बाबतीत निश्चितच खोटेपणा झाला आहे. कादंबरीवरून प्रेरित होऊन (आणि तेच कथानक असलेली इतर भाषेतील नाटके प्रचारात असताना) त्यांनी लिहिलेले नाटक स्वतंत्र कसे असू शकते?

''प्रेरित'' हा एक नवीन आडवळणी शब्द यानिमित्ताने लेखकाने निर्माण केला आहे. (आपण विशिष्ट साहित्यकृतीचे अनुवाद व रूपांतर केलेले नाही हे अगदी आटापिटा करून सांगण्यासाठी ''अनुसर्जन'' हा शब्दही गोमंतकीय नाटककारांनी यापूर्वी यथेच्छपणे वापरला आहे. त्यात आता ''प्रेरित'' या शब्दाची भर घालण्यास हरकत नाही.)

कला अकादमीच्या स्पर्धेत सादर होणाऱ्या या नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर जागृत प्रेक्षकांकडून ''हे नाटक कॉपी केले गेलेले आहे'' असे संदेश काही परीक्षकांना आले. कहर म्हणजे चंद्रशेखर फणसळकर यांनी अनुवादित केलेल्या त्या नाटकाच्या एका जुन्या प्रयोगात चक्क यंदा परीक्षक मंडळावरील सदस्याने मुख्य भूमिका वठवली होती. त्यामुळे या नाटकाच्या सादरीकरणाच्या ''मुळाचा'' अभ्यास करणे परीक्षकांना अजिबात कठीण गेले नसावे. 

असे कॉपी करून ‘सर्वाइव्ह’ होणे कठीण असते हे खरेतर तसे करणाऱ्या लेखकांना समजायला हवे. यापूर्वी अनेक लेखकांनी नाट्यस्पर्धेत तसे केले आहे मात्र त्यांची ती नाटके कॉपी केली गेलेली आहेत हे प्रयोगासाठी हजर असलेल्या शेकडो प्रेक्षकांमधील काहींना ठाऊकही झालेले असते.

मात्र परीक्षक त्याबाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे (किंवा वाद टाळण्याकडे त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे) अशी नाटके खपूनही जातात पण प्रेक्षकांकडून किंवा कलाकारांकडून त्याबद्दल चर्चा होतच असते. त्याकडे डोळेझाक करून पदरी पडलेली बक्षिसे घेऊन असे लेखक स्वत:ला मिरवत मात्र राहतात.

konkani state drama competition
Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

डोळे झाकून दूध पिण्याची ही वृत्तीच खरे तर दुर्दैवी आहे. रूपांतर किंवा अनुवाद करणे ही देखील अतिशय कौशल्याची बाब आहे आणि त्यातही लेखकांनी खरे तर अभिमान वाटून घ्यायला हवा. 

मुळात जेव्हा ''कथानक'' स्वतंत्र असते किंवा स्वतंत्र विचाराने, स्वतंत्र दृष्टिकोनातून सादर केली गेलेली असते तेव्हाच ती नाट्यकृती स्वतंत्र ठरते. ''इन सर्च सर्वायव्हल'' मध्ये असा स्वतंत्र दृष्टिकोन आहे की नाही हाच मुख्य प्रश्न आहे.

konkani state drama competition
Konkani Drama Competition: कल्पकतेचे साक्ष देणारे, विलक्षण अनुभूतीचे नाट्य 'भोगपर्व'

यावर इतरांकडून सम्यक चर्चा यानिमित्ताने हवी होती, विशेष करून गोमंतकीय नाट्यक्षेत्रात कृतीप्रवण असणाऱ्यांकडून ती व्हायलाच हवी कारण त्यातूनच अशाप्रकारच्या, इतरांवर अन्याय होणाऱ्या बाबींवर लगाम बसू शकतो. मात्र समाजमाध्यमावर प्रकट होणारी काही, विशेषत: युवा नाट्यकर्मींची मते पाहता, अशाप्रकारे लेखकाने 'प्रेरित होणे' व त्यातून निर्माण झालेली कला कृती लेखकांनी स्वतंत्र मानणे ही त्यांच्यासाठी स्वागत करण्याजोगी बाब आहे असेच दिसते. युगांक नायक ज्या नाट्य चळवळीबद्दल बोलतात त्या चळवळीसाठी हे मात्र अधिक धोकादायक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com