पणजी: सांताक्रुझचे सरपंच सोनू डी. आरावजो यांच्याविरुद्ध 7 पंचसदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावावर येत्या 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांसदर्भातची नोटीस 11 पंचसदस्यांना देऊन बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती सांताक्रुझ पंचायत सचिव राजेंद्र गावस यांनी दिली. सांताक्रुझ पंचायतीचा पाच वर्षांच्या कार्यकाळात सरपंच व उपसरपंचांची संगीत खुर्ची सुरू आहे. प्रत्येकाला सरपंच किंवा उपसरपंचपद मिळावे यासाठी या दृष्टीने पंचायतीचा कार्यभार सुरू होता.
ही पंचायत माजी आमदार टोनी फर्नांडिस यांच्याकडे होती मात्र सत्तापालट झाल्याने या पंचायतीच्या सात सदस्यांनी सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव आणला आहे. सोनू डी आरावजो या नाममात्र सरपंच असून त्यांच्या पडद्यामागील सूत्रधार त्यांचे पती आहेत. त्यांचा होत असलेल्या हस्तक्षेपामुळे या पंचसदस्यांनी सरपंचांनाच खुर्चीवरून हटविण्याचा निर्णय घेत अविश्वास ठराव तिसवाडी गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
या सांताक्रुझ पंचायतीमध्ये 11 पंचसदस्य असून त्यापैकी 7 जणांनी हा अविश्वास ठराव दाखल केला आहे त्यामध्ये नामदेव नाईक, लॉरेन्स रॉड्रिग्ज, आंतोनिओ डायस, लाफिरा ओलिव्हेरा, दिशा कवळेकर, शिल्पा बांदोडकर व निलेश काणकोणकर यांचा समावेश आहे. इंदिरा फर्नांडिस, मारियानो डी आरावजो, प्रसाद नाईक व सोनू आरावजो हे चौघे एकत्र आहेत.
काही दिवसांपूर्वी सांताक्रुझ मतदारसंघात निवासी परिसरामध्ये कचरा विल्हेवाट सुविधा केंद्र (एमआरएफ) उभारण्याचा प्रयत्न पंचायतीने केला होता त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. आता बांबोळी यथील डोंगराळ भागात कोणत्याही अधिकारिणीकडून परवाना नसताना काम सुरू केले होते मात्र काही अंतरावर असलेल्या कॉलनीच्या नागरिकांनी ते बंद पाडले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.