पणजी: राजधानी पणजीत ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे होणारे धूळप्रदूषण, वाहतुकीची कोंडी आणि विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केलेले रस्ते आदी समस्यांची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. तसेच उपाययोजनांसंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोणतेही नियोजन न करता खोदकामे तसेच अधिसूचना न काढता रस्ते बंद केले जात असल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेऊन अडचणी व समस्या नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सरकारला देत खंडपीठाने जनहित याचिकेवरील सुनावणी येत्या सोमवारी १३ जानेवारी रोजी ठेवली आहे.
‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत पणजीत सुरू असलेल्या कामांबाबतची माहिती जनहित याचिकादाराच्या वकिलांनी दिली. पणजीत (Panaji) अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. ही खोदकामे करताना अथवा रस्ते वाहतुकीसाठी बंद करताना कोणतीही आगाऊ सूचना देण्यात आलेली नाही. अचानक रस्ते बंद केल्यामुळे वाहनचालकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सुरू असलेली कामे कधी पूर्ण होतील, यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. खोदकामांमुळे होणाऱ्या धूळप्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच वाहतूक पोलिसांसह अन्य संबंधित सरकारी यंत्रणांचे लक्षच नाही. कोणालाच याबाबत सोयर-सुतक नाही व कोणीही गंभीरतेने याची दखल घेत नाही. सरकारी यंत्रणा लोकांना होणारा त्रास, अडचणींचा विचार न करता त्यांना गृहीत धरत असल्याचा आरोप वकिलांनी केला.
‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत प्रत्येकवेळी विचारणा होत असल्याने पणजीचे आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरात हे आज बरेच भडकले. हा प्रश्न मला नको तर ‘इमॅजिन पणजी’चे अध्यक्ष असलेल्या मुख्य सचिवांना तसेच व्यवस्थापकीय संचालकांना विचारा, असा सल्ला त्यांनी दिला.
मागील सुनावणीवेळी ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सुरू असलेली ९० टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांच्या ठिकाणीच पुन्हा सांडपाणी निचरा गटाराच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. याचिकादाराच्या वकिलांनी पणजी शहरातील सद्यःस्थितीची माहिती देणारी छायाचित्रेच यावेळी खंडपीठासमोर सादर केली.
पणजी शहरात सध्या तीन ठिकाणी ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे येत्या २० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले. याच योजनेअंतर्गत सुरू असलेली अन्य कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. परंतु येत्या मे महिन्यापर्यंत शहरातील सर्व कामे पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होईल, असे ते म्हणाले. पणजीत सध्या सगळीकडेच रस्त्यांची फोडाफोडी सुरू आहे.
धूळ मोजमाप करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणाही तैनात करण्यात आलेली नाही. तसेच धूळ उडू नये म्हणून पाणी फवारणीचीही सोय करण्यात आलेली नाही. खोदकाम करण्यात येत असल्याने काही ठिकाणचे रस्ते बंद करून वाहतूक (Transportation) वळविण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहेत, परंतु ही वाहतूक कोणत्या रस्त्यावरून वळविण्यात आली आहे याची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे, असे वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.