पणजी, ता. 19 (प्रतिनिधी) : येत्या डिसेंबरच्या अखेरीस गोव्यात ‘सनबर्न ईडीएम’ फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे, मात्र उत्तर तसेच दक्षिण गोव्यातून या कार्यक्रमाला विरोध केला गेला. यानंतर यंदाचा सनबर्न महोत्सव पेडण्यातील धारगळ इथे आयोजित केला जाईल अशा बातम्या समोर येत होत्या, मात्र याला देखील स्थानिक विरोध दर्शवत आहेत. महोत्सवाच्या नियोजित जागेच्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर हॉस्पिटल आहेत, त्यामुळे त्याचा अधिक फटका रुग्णांना बसेल, शिवाय वाहतूक कोडींही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असे स्थानिकांना वाटते.
हा संगीत महोत्सव धारगळ येथे होणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने तेथील स्थानिक नागरिक भारत नारायण बागकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहितार्थ एक याचिका सादर केली. या याचिकेवर बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. हा महोत्सव धारगळमध्ये नकोच, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. या कार्यक्रमामुळे ध्वनी तसेच लाईटचे प्रदूषण निर्माण होऊ शकते अशी भीती त्याने याचिकेतून मांडली.
या जनहित याचिकेत सरकारसह पर्यटन संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए), बार्देश - पेडणे उपजिल्हाधिकारी, पेडणे उपविभागीय पोलिस अधिकारी, पेडणे पोलिस निरीक्षक, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळचे प्राधिकरण
जलस्रोत खाते, धारगळ पंचायत सरपंच व सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्र सरकार तसेच सनबर्न फेस्टीव्हलचे आयोजन करत असलेली मे. स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा. लि. कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
सनबर्नच्या कार्यक्रमाला देश-विदेशातून लाखो पर्यटक उपस्थिती लावत असतात आणि यंदाच्या वर्षी सदर महोत्सव 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर असे तीन दिवस होणार असल्याचे जाहीर करण्यात आले पण, सनबर्नच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत तिकीटविक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.