Shivani and His Father Dainik Gomantak
गोवा

Margao News : हुंड्यासाठी सासरकडून मुलीचा छळ; वडिलांचा आरोप

Margao News : : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तपशिलासह निवेदन सादर

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव, नवेवाडे-वास्‍को येथे झालेल्‍या शिवानी राजावत व जयदेवी चौहान यांच्‍या मृत्‍यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून हा घातपात असून त्‍यामागे शिवानीच्या सासरच्या मंडळींचा हात आहे.

तिचा नवरा नौदलाचा अधिकारी अनुराग याचे दुसऱ्या मुलीशी संबंध होते. तसेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळींचा छळ सुरू होता.

त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी जयदेवी यांचे पती तथा शिवानीचे वडील दिलीपसिंह चौहान यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

नवेवाडे-वास्को येथील राष्ट्रोळी जय संतोषी माता मंदिराशेजारी भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शिवानी राजावत (२६) या गर्भवती महिलेचा आणि तिची आई जयदेवी चौहान यांचा १८ नोव्हेंबर रोजी गॅसच्या स्फोटात जागीच मृत्यू झाला होता.

हा घातपाताचा प्रकार असून या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा. हा सुनियोजित पद्धतीने रचलेला कट आहे, असा आरोपही दिलीपसिंह यांनी निवेदनात केला आहे. यासंबंधी त्‍यांनी मध्‍यप्रदेशहून एक व्‍हिडिओ संदेश जारी केला असून त्‍यातूनही त्‍यांनी हा घातपाताचा प्रकार असल्‍याचे म्‍हटले आहे.

दिलीपसिंह यांनी आपल्‍या निवेदनात शिवानी आपली एकुलती एक मुलगी होती. तिच्‍या लग्‍नात माझ्या क्षमतेनुसार १२ लाख रुपये रोख आणि सर्व घरगुती वस्तू आणि दागिने दिले होते. शिवानी हिचे लग्न ५ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले होते. सोसायटीसमोर सोहळा पार पडला आणि लग्नाच्या ४ ते ५ महिन्यांनी शिवानीचा सासरी छळ सुरू झाला, असे म्हटले आहे.

शिवानीने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती आई जयदेवी चौहान यांना दिली होती. हुंडा कमी दिल्याने सासरची मंडळी तिचा छळ करत होती.

तिला नीट जेवणही दिले जात नव्हते. माझ्या मुलीने तिचा पती अनुरागला याची माहिती दिली. पण, त्याने पत्नीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. तोही आईची बाजू घेऊन पत्नीला त्रास द्यायचा. तो मारहाणही करायचा, असे गंभीर आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.

निवेदनात काय आहेत आरोप?

आपला जावई अनुराग याचे दुसऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. यामुळे माझ्या मुलीसोबत त्याचे रोज भांडण व्हायचे. आज जवळपास ४-५ महिन्यांपूर्वीच जावई शिवानीला गोव्याला घेऊन गेला होता. तेव्हाच त्याच्या प्रेमसंबंधांविषयी मला तिने माहिती दिली. तिने जयदेवीलाही हे सांगितले होते, असे दिलीपसिंह यांनी म्‍हटले आहे.

तिचा नवरा अनुराग दुसऱ्या मुलीशी नेहमी मोबाईलवर बोलत असे, तिने याबाबत सांगितले होते. म्हणूनच जयदेवी यांना गोव्यात पाठवले होते. त्यानंतर माझी पत्नी ३ नोव्हेंबर रोजी गोव्यात आली. तेव्हापासून अनुरागने भांडण सुरू केले. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी शिवानी आणि जयदेवी यांचा गॅसचा स्फोट होऊन मृत्यू झाला.

एकंदरीत प्रकार पाहिल्यास मोठी शंका येते. हा घातपात आहे. हा सुनियोजित कट आहे. या घटनेमागे शिवानीची सासू आणि पती अनुराग राजावत यांचा हात आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

वारंवार व्‍हायचे वाद

शिवानी आणि तिच्‍या सासरच्‍या लोकांचे वारंवार वाद व्‍हायचे, अशी माहिती त्‍यांच्‍या शेजाऱ्यांनी दिली आहे. ही भांडणे रोजच व्‍हायची. मात्र ती घरगुती भांडणे असल्‍याने आम्‍ही त्‍याकडे दुर्लक्ष केले होते.

मात्र त्‍याचा परिपाठ अशा भीषण घटनेत होणार याची आम्हांला कल्‍पनाही नव्‍हती, अशा प्रतिक्रिया शेजारी व्‍यक्‍त करीत असून हा घातपाताचा जर प्रकार असेल तर दोघांची नव्‍हे, तर तिघांची हत्‍या झाल्‍याचे मानले पाहिजे. कारण या अपघातात शिवानीच्‍या पोटातील बाळही मारले गेले, अशा आशयाच्‍या प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी व्‍यक्‍त केल्‍या.

मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत!

मडगाव, काही वर्षापूर्वी हणजूण पोलिस हद्दीत घडलेल्या ब्रिटिश नागरिक युवती ‘स्कार्लेट मृत्यू’ प्रकरणात गोवा पोलिसाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली होती.

आधी हा अपघाती बुडून मृत्यू म्हणून सारवासारव करणाऱ्या पोलिसावर मयताच्या आईने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याच्या कारणास्तव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमातून दबाव आल्याने, शेवटी खून व बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची नामुष्की ओढवली होती. सदर युवतीचा मृतदेह शवागारात तब्बल एक वर्ष पडून राहिला होता.

तसेच मागाहून हे प्रकरण गोवा सरकारने सीबीआयकडे सुपूर्द केले होते. इतके होऊनही गोवा पोलिसांनी यातून काही धडा घेतलेला आहे, असे दिसत नाही. गेल्या शनिवारी नवेवाडे -वास्को येथे गॅस सिलिंडर स्फोटातील मायलेकींच्या दुहेरी मृत्यू प्रकरण याच मार्गाने जात असून यातील गर्भवती शिवानी हिचा मृतदेह मागील आठवडाभर दक्षिण गोवा शवागारात अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत अडकून पडला आहे.

गोव्याला हादरून सोडणारी दुहेरी मृत्यूची ही घटना गेल्या शनिवारी सकाळी घडली. यात नौदल अधिकारी अनुराग राजवत यांच्या गर्भवती पत्नी शिवानी व त्‍यांची सासू जयदेवी चौहान यांचा आगीत भाजून मृत्यू झाला.

रविवारी शवचिकित्सा झाल्यानंतर वास्को पोलिसांनी जयदेवीचा मृतदेह तिच्या मुलाकडे सुपूर्द केला. मात्र शिवानीचा मृत्‍यू लग्नाच्या सात वर्षाच्‍या आत झाल्याने कायद्यानुसार त्‍याचा तपास उपजिल्हाधिकारी करत असल्‍याने तिचा मृतदेह राखून ठेवण्‍यात आला आहे.

आता या शुक्रवारी (ता. २४) मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी मयत शिवानी यांचे बंधु शुभमसिंग चौहान यांना पत्र पाठवून शिवानीचा मृतदेह त्याच्या पतीला द्यायला हरकत असेल तर चार दिवसात लिखित स्वरूपात द्यावी, असे कळविले आहे तर शुभम यांनी लगेच पत्र लिहून ‘हा खून की अपघात याचा शोध लागत नाही, तोपर्यंत मृतदेह कुणालाही देऊ नये, असे कळविले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मौन

हे प्रकरण गोव्यातील सर्वच प्रसार माध्यमांनी लावून धरले असून सोशल मिडियावर पोलिस तपासातील त्रुटीचे फोटो व्हायरल होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे वास्को पोलिसांची सध्या गोची होत आहे कारण त्यांनी माध्यमांना काही स्पष्टीकरण दिल्यास वरिष्ठाकडून तंबी येते.

तसेच माध्यमांनी कितीही टीका केली तरी तपास अधिकारी वरिष्ठाच्या आदेशाशिवाय काहीच करू शकत नाही. प्रकरण जास्तच तापले तर हे वरिष्ठ अधिकारी ऐनवेळी तपास अधिकारी बदलतील व गुन्हा नोंद करून मोकळे होतील. सध्या वास्को पोलिस, एका बाजूला उपजिल्हाधिकारी व दुसऱ्या बाजूला वरिष्ठ अधिकारी अशा कात्रीत सापडले आहेत.

जावयानेच केला घातपात; शिवानीच्‍या वडिलांचा आरोप

तिचा पती अनुराग हा बाहेर बाजारात गेल्‍याचे सांगितले जाते, तर सासू जवळच्‍या मंदिरात गेली हाेती. शिवानीच्‍या आईने दूध तापविण्‍यासाठी लाईटर सुरू केल्‍यावर गॅसचा भडका उडून ती भाजली.

तिला वाचविण्‍यासाठी शिवानी आली, त्‍यावेळी तीही होरपळली. हा गॅस नेमका कुणी सुरू ठेवला होता, याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले असून शिवानीच्‍या पतीने मुद्दाम गॅस ऑन ठेवला असावा, असा आरोप तिच्‍या माहेरच्‍या लोकांकडून केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT