

Mumbai-Goa highway bus accident
कोकण आणि गोव्याला जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी पहाटे रक्ताचा सडा पडला. नागोठणे परिसरातील सुकळी खिंडीत एका खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला असून, यामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण ३८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी १० जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे नसून चालकाच्या बेदरकारपणामुळे घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. पहाटेच्या वेळी जेव्हा प्रवासी गाढ झोपेत होते, तेव्हा सुकळी खिंडीतील एका धोकादायक वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसचा वेग इतका प्रचंड होता की, वळण घेताना ही बस थेट उलटली. बस उलटताच प्रवाशांचा आक्रोश आणि किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. अपघाताचा भीषण आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. प्रवाशांच्या मते, बस मुंबईतून सुटल्यापासूनच चालक अत्यंत बेजबाबदारपणे गाडी चालवत होता. अनेक प्रवाशांनी त्याला गाडी हळू चालवण्याची विनंती केली होती, मात्र त्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, प्रवासादरम्यान चालकाची 'मस्ती' पाहून काही प्रवाशांनी 'RedBus' पोर्टलवर त्याच्या विरोधात ऑनलाईन तक्रारही नोंदवली होती. मात्र, प्रशासनाकडून किंवा ट्रॅव्हल्स कंपनीकडून या तक्रारीची दखल घेण्यापूर्वीच काळाने घाला घातला.
घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या जखमींना खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ज्या १० प्रवाशांची प्रकृती गंभीर होती, त्यांना अधिक उपचारांसाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत पावलेल्या दोन प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून, याप्रकरणी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.