"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

Goa water sources conservation: कर्नाटकातल्या खानापूरजवळच्या देगावात डोंगरातल्या वेताच्या वनात एका छोट्या झऱ्याच्या रूपात वाहणारी नदी, गोव्याची प्रमुख जीवनदायिनी म्हादई म्हणून नावारूपास येते.
Goa water sources conservation
Goa water sources conservationDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातल्या खानापूरजवळच्या देगावात डोंगरातल्या वेताच्या वनात एका छोट्या झऱ्याच्या रूपात वाहणारी नदी, गोव्याची प्रमुख जीवनदायिनी म्हादई म्हणून नावारूपास येते. सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलात उगम पावणारी ही म्हादई असंख्य झऱ्यांना कवेत घेऊन उसगाव ओलांडल्यावर मांडवी म्हणून प्रसिद्ध पावते. खरे तर बारमाही प्रवाहित राहणारी मांडवी, असंख्य झऱ्यांना कवेत घेत असल्याने गोड्या पाण्याच्या प्रचंड साठ्यामुळे सर्वाधिक पेयजलाचा पुरवठा करत असते, याची जाणीव खूप कमीजणांना असते.

गोव्याला बारमाही खळाळणाऱ्या झऱ्यांचे वैभव लाभलेले आहे. सांग्यातील रिवणची तळसाझर माळोलीची निरंकाराची झर, वाळपईतील मासोर्ड्याची झर, अस्नोड्यातील आंबेशीची झर अशा शेकडो झरी गावातल्या लोकवस्तीला ताजे, औषधी गुणधर्मांनी युक्त चवदार पाणी बारमाही पुरवठा करायच्या.

चर्मरोग, नेत्रविकार, पचन साहाय्यक म्हणून अशा औषधी झऱ्यांचा लौकिक आपल्या समाजात होता. परंतु गेल्या पाव शतकापासून आपण ज्या झरी देवाधर्माच्या नावाखाली पवित्र मानल्या त्यातल्या काही झरी वगळता अन्य झरींची स्थिती केविलवाणी झालेली आहे.

डिचोलीतील नागझर बिगर गोमंतकीयांचा धोबीघाट झालेला आहे. पोंबुर्फा येथील झर गोवा पर्यटन विकास महामंडळाने सिमेंट-कॉंक्रीटच्या बांधकामाद्वारे बंदिस्त केलेली आहे. सालमोणा झरीसाठी स्थानिकांनी संघर्ष केलेला असला तरी दिवसेंदिवस खालवणारा झरीचा दर्जा सुधारण्याच्या चळवळीत समाजाबरोबर सरकारी यंत्रणा अपयशी ठरलेली आहे.

सांडपाणी आणि मलनि:स्सारण व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण नियोजन केलेले नाही. गावोगावी उघड्यावरती मलमूत्र विसर्जन केल्याने नदीनाले प्रदूषित होत आहेत तर शौचालये बांधकामासंदर्भात नियमांची पायमल्ली होत असल्याने झरे, तलावांसारख्या जलस्रोतांतले पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.

औद्योगिक वसाहतींच्या भोवताली असणाऱ्या जुन्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित राहिलेले नाही. वाढती गृहनिर्माण वसाहती आणि बहुउद्देशीय संकुले यांच्या वाढत्या विस्तारात भूगर्भातले जलस्रोतच प्रदूषित होण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. खनिजाच्या वारेमाप उत्खननामुळे खाणपट्ट्यातल्या जलस्रोतांचा विध्वंस झालेला आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके यांच्या अतिरेकी वापराने तलावावरती घातक वनस्पतीचे आच्छादन निर्माण आलेले आहे.

पूर्वी बारमाही वाहणाऱ्या गोड पाण्याच्या झऱ्यांवरती अख्ख्या गावाची तहान भागायची. त्यामुळे अशा झऱ्यांच्या भोवताली गावातल्या लोकवस्तीचा विस्तार व्हायचा. सत्तरीतील झरमे गाव, बहुधा तेथील चवदार पाण्याच्या झऱ्यांवरून ओळखला जातो.

गोव्यातल्या बारमाही वाहणाऱ्या झऱ्यांमुळे एकेकाळी झरमे, नागझर आदी ग्रामनामामुळे चवदार आणि थंडगार पाण्याच्या स्रोतासाठी नावारूपास आलेला आहे.

नदीनाले, तलाव, तळी, झरी यांसारख्या जलस्रोतांची स्थिती दिवसेंदिवस गोवाभर खालवत चालली असून, त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या बाबतीत बेफिकीरपणा समाजात वाढत चाललेला आहे. जलस्रोत खात्यातर्फे विहिरींच्या पुनर्जीवनासाठी सरकारने योजना आखलेली असून, यापूर्वी नियोजन केलेल्या छपरांवरचे पावसाचे जलसंचय करण्याची योजना लोक प्रतिसादाभावी दुर्लक्षित पडलेली आहे.

गोव्याच्या जीवनरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडवी, जुवारीसारख्या नद्यांचे जलसंचय, पूरनियंत्रण क्षेत्राचे संरक्षण होणे काळाची गरज आहे. झरे, तलाव यांचे सौंदर्यीकरण करण्याची योजना राबवताना सिमेंट -कॉंक्रीटच्या बांधकामाला टाळून, जांभ्या दगडात नियोजनबद्ध त्यांचे अस्तित्व शरवण्याची आवश्यकता आहे.

जलस्रोतांच्या संरक्षण आणि संवर्धनास प्राधान्य दिले तर गोव्याचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राहील. ‘जिथे हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरतात मजला गाणी’ ही कविवर्य बा. भ. बोरकरांची धारणा गोमंतकीयांनी नसानसांत भिनवली आणि ती वास्तवात आणण्यासाठी धडपडल्यास गोवा ‘सुजलाम्, सुफलाम्’ होईल.

केपे तालुक्यातल्या मोरपिर्ल गावातली देवाझर, तेथील गावकऱ्यांसाठी पेयजल आणि सिंचनाचा आधार ठरली होती .

एकेकाळी आपल्या गावातील बारमाही प्रवाहित राहणाऱ्या झऱ्यांच्या अस्तित्वाची तिथला समाज आत्मीयतेनं संरक्षणाची जबाबदारी घ्यायचा. परंतु आज सांडपाणी, मलमूत्र विसर्जन, केरकचरा यांची विल्हेवाट नियोजितरीत्या केली जात नसल्याने, तेथील झरे, तलाव अस्तित्वाची अंतिम लढाई लढत आहेत. एकेकाळी स्थानिकांना पेयजल आणि जलसिंचनासाठी झरी आधार ठरल्या होत्या आणि त्यासाठी त्यांचे पावित्र्य टिकवण्यासाठी लोकमानस सदैव तत्पर आणि दक्ष असायचे.

Goa water sources conservation
Opinion: भारतातील शहरांना भविष्यात अधिकाधिक पाण्याची गरज भासणार आहे, पण आपण ही मागणी पूर्ण करू शकू का?

परंतु जेव्हा पाणी पुरवठा विभागाद्वारे नळातून पाणी पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली, तेव्हा अशा झरींची वार्षिक साफसफाई करून, त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची मानसिकता समाजातून झपाट्याने गायब होत गेली.

मोरपिर्लातील देवाझर /पायकाझर, सत्तरीतील वाघेरी पर्वतावरचे मोराकुच्याचे पाणी, मोर्लेगडावरचे जंगली हळदीच्या सान्निध्यातले हळदीचे पाणी, गोमुखातून स्रवणारे पणजीतील आल्तिनो येथील ‘बोक दी व्हाक’चे पाणी तेथील समाजासाठी पेयजलाचा आणि आंघोळ, सिंचनाचा आधार ठरला होता.

Goa water sources conservation
1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

परंतु गेल्या काही वर्षांपासून आपण आरंभलेल्या आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे या झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे. आज या झरींचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आपण नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com