Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

Betki Village Goa: देेवभूमी अंत्रूज महालातील फोंडा तालुक्यात खांडोळा व सावईवेरे यांच्या मध्यभागी बेतकी हा गाव आहे. ह्या गावाला ‘झील सावई, बेतकी आवय’ अशी म्हण प्रचलित आहे.
Betki Village Goa
Betki Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

देेवभूमी अंत्रूज महालातील फोंडा तालुक्यात खांडोळा व सावईवेरे यांच्या मध्यभागी बेतकी हा गाव आहे. ह्या गावाला ‘झील सावई, बेतकी आवय’ अशी म्हण प्रचलित आहे. बेतकी गावची श्री मंडोदरी म्हणजे ती रावणाची पतिव्रता मंदोदरी आहे, अशी काहींची चुकीची धारणा आहे. पण ती श्री मंडोदरी म्हणजे बेतकी गावची कुलस्वामिनी तशीच ग्रामदेवता आहे.

कधीकाळी निर्मळ पाण्यासाठी प्रख्यात असलेली, जिच्या उदरात पाणी (मंडूक) आहे, म्हणून यांच्या संयोगातून मंडोदरी हे नाव प्रचलित झाले असावे. येथील जलाशयाच्या म्हणजे तळ्यात बारामाही पाणी असल्याने तिला मंडोदरी हे नाव प्राप्त झाले, असे मानतात. श्री मंडोदरी ही जित्या कुडीची माया म्हणून प्रसिध्द आहे. तसेच तिथे तिचा नारबंदो (बंधू) भाऊ प्रसिध्द आहे. ‘कदंब’च्या काळात या गावचे कन्नड भाषेतील बेतगी असे नाव प्रसिध्द होते.

बारा कुळाचे बाटा वांगडी इथे वास करतात. बेतकी गावात भव्यदिव्य सुशोभित आकर्षक असे सुंदर महाद्वार आहे ते फार मनमोहक आहे. आत प्रवेश करताच गारव्याची झुळूक मनाला स्पर्शून जाते. वाटेत दोन्ही बाजूना आंब्याचे व फणसाचे वृक्ष ताजेतवाने आहेत. तसेच दोन्ही बाजूंनी घरे आहेत गावाच्या मध्यभागी सुंदर प्राथमिक शाळा, व सत्यनारायणाचा मंडप आहे. तसेच गावात श्री मंडोदरी सहित, सातेरी, रवळनाथ ग्रामपुरुषाची मंदिरे आहेत.

Betki Village Goa
Querim Ponda: सफर गोव्याची! लावण्यमयी निसर्गराजीने नटलेलं, सुरश्री केसरबाई केरकरांचा पदस्पर्श लाभलेलं 'फोंडा-केरी'

तसेच श्री नारायणदेव मंदिर आहे. गावात ओहळातून बारामाही पाणी वाहत असते. त्याच पाण्यावर येथील शेतकरी वर्ग शेतीभाती, कुळागरे, नारळाच्या बागा यांची मशागत करतात. या गावात पुष्कळ सण साजरे होतात. तसेच गावात तीन वेळा दिवजोत्सव होतो. चतुर्दशी, महाशिवरात्री, व नवे उत्सव. पोर्तुगीज आमदानीत इथे खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी माल मिळेल म्हणून खणलेले खंदक (मिनरल) मातीत रूपांतर झाले ही देवीची कृपा म्हणावी लागेल.

Betki Village Goa
Querim Ponda: सफर गोव्याची! लावण्यमयी निसर्गराजीने नटलेलं, सुरश्री केसरबाई केरकरांचा पदस्पर्श लाभलेलं 'फोंडा-केरी'

नाहीतर येथील कुळागरे व शेती खाणमालकांनी नष्ट केली असती. या गावातील लोकांनी आपली जमीन विकली नाही, अशा या गावच्या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या गावच्या मातीत अष्टपैलू कलाकार आहेत. गावातले लोक एकमेकांच्या सहाय्याने गावाचा झपाट्याने विकास करत आहेत. थंड हवेमुळे आरोग्यसंपदा या गावाला लाभली आहे. ह्या गावात माझा जन्म झाला नसला तरी माझ्या ह्रदयात बेतकी गाव ठाण मांडून बसला आहे. या मातीशी माझे नाते जुळले आहे. आणि म्हणूनच या गावाचा मला अभिमान आहे.

वनिता विठ्ठल फडते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com