Panaji News : बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळ कंपाऊंडच्या बाहेरील भागात खाद्यपदार्थ, भाजी तसेच फळे विक्रेत्यांना कायमस्वरुपी गाळे देण्यात येऊनही त्या ठिकाणी पदपथावर अतिक्रमण केल्याप्रकरणी आज सांताक्रुझ पंचायतीने पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई केली.
या कारवाईमुळे काही विक्रेत्यांनी माल घेऊन पळापळ सुरू केली. दीनदयाळ स्वयंरोजगार योजनेखालील गाडेधारकांनीही केलेले अतिक्रमण हटवून तेथील पदपथ लोकांसाठी खुला केला. या कारवाईवेळी पंचायतीने पदपथावर अतिक्रमण करून ठेवलेले साहित्य तसेच खाद्यपदार्थांचा माल जप्त केला.
ही कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे. या इस्पितळाबाहेर असलेल्या भाजी - फळे तसेच काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून केलेले अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले होते व त्याच्या बदल्यात विक्रेत्यांना कायमस्वरूपी गाळे बांधून दिले होते.
मात्र,तिथे व्यवसाय न करता अनेकांनी पदपथावर व्यवसाय सुरू केला होता. दीनदयाळ गाडेधारकांनी तर तेथे टेबल - खुर्च्या मांडून पदपथ अडवले होते. त्यामुळे या इस्पितळात येणाऱ्यांना पदपथ नसल्याने रस्त्यांवरून चालत ये-जा करावी लागत होती.
पदपथावर अतिक्रमण केलेल्या दीनदयाळ योजनेखालील पाच गाडेधारकांना तसेच भाजी व फळे विक्रेत्यांना पंचायतीने तेथून हटण्यासाठी तीन दिवसांची मुदत देऊन नोटिसा बजावल्या होत्या. तरीही अतिक्रमणे न हटविल्याने ही कारवाई करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी मुख्य सचिवांनी ‘गोमेकॉ’ला भेट दिली, तेव्हा या इस्पितळ प्रवेशद्वारासमोर तसेच पदपथावर अतिक्रमण करून विक्रेत्यांनी पदपथ अडविले होते. त्यामुळे लोकांना चालण्यासाठी तेथे पदपथही नव्हते. याची दखल मुख्य सचिवांनी घेऊन ही अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सांताक्रुझ पंचायतीला ठोस कारवाईचे निर्देश दिले. सांताक्रुझ सरपंच ओलिव्हेरा व उपसरपंच परेरा यांनी आज पुढाकार घेऊन आगशी पोलिसांच्या मदतीने सकाळी 10 वा. कारवाई सुरू केली.
सांताक्रुझ पंचायत क्षेत्रात काहीजण पदपथावर तसेच रस्त्यालगत, जंक्शनवर गाडे उभे करून रात्री फास्टफूड वा खाद्यपदार्थाचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडसर होत आहे अशा सर्वांविरुद्ध पंचायतीतर्फे कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमणांवर ठोस पावले उचलण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे.
पदपथ अडवून व रस्त्यावर पार्क केलेली वाहने यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा टोळण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. पोलिसांनीही रात्री गोमेकॉ बाहेर फास्टफूडच्या मोबाईल वाहनांविरुद्ध कारवाई करावी यासाठी पंचायतीतर्फे पत्र दिले जाणार आहे.
जेनिफर ऑलिव्हेरा, सरपंच, सांताक्रुझ पंचायत
या ठिकाणी रात्री काही फास्टफूड मोबाईल वाहने उभी करून रस्ता अडवत असल्याने त्यांच्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे. सांताक्रुझ पंचायतीकडूनही देखरेख ठेवली जाणार आहे. यापुढे कोणालाही पदपथावर अतिक्रमण करू दिले जाणार नाही. विक्रेत्यांनी दिलेल्या गाळ्यांतच व्यवसाय करावा अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी नियमानुसार व्यवसाय करून पंचायतीला सहकार्य करावे.
व्हिनासिओ डॉमनिक परेरा, उपसरपंच, सांताक्रुझ पंचायत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.