विधानसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपल्याने सत्ताधारी भाजपने जिल्हा पंचायत निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. विद्यमान मंत्री, आमदारांना २०२७ मध्ये उमेदवारी देताना या निवडणुकीच्या निकालाचाही विचार करण्यात येणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना आधीच सांगितलेले होते. त्यामुळे काही मंत्री, आमदारांनी जीव ओतून आपापल्या मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार केला, पण यातील काही मंत्री, आमदारांना आपले उमेदवार जिंकतील यावर विश्वास नसल्याने त्यांच्या गोटात आत्तापासूनच खळबळ माजल्याची चर्चा सुरू आहे. ∙∙∙
बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी आपण जिल्हा पंचायत निवडणुकीत पडलो नाही असे जरी म्हटले असले तरी चर्चिल कोणत्याही निवडणुकीपासून दूर राहणे शक्यच नाही हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे चर्चिल आलेमाव यांनी आपला पाठिंबा नक्की कुणाला दिला असेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कदाचित त्यांनी अपक्ष उमेदवार मारिया रिबेलो यांना पाठिंबा दिला असावा असे सांगितले जाते, पण चर्चिलबाब मात्र याबाबतीत कुणाच्या कळू देत नाहीत. चर्चिल बाबांच्या मनात आहे तरी काय? ∙∙∙
जिल्हा पंचायतींना काही अधिकार नसतात. त्यामुळे गोव्यातील राजकारणात या स्तराला काही किंमत नाही. तरीही ही निवडणूक काही आमदार व मंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनली होती. भाजपने जिल्हा पंचायत निकालावरच विधानसभा निवडणुकीचे तिकिट दिले जाईल असे जाहीर केल्याने मंत्री आमदारांसह विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांनी झोकून देऊन प्रचार केल्याने काही मतदारसंघात त्या बऱ्याच अटीतटीने लढल्या गेल्या. उदाहरण द्यायचेच झाल्यास गिर्दोली मतदारसंघाचे देता येईल. हा मतदारसंघ केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा आणि माजी आमदार बाबू कवळेकर यांनी आपल्या प्रतिष्ठेचा बनवला होता. त्यामुळे या मतदारसंघात मतदानही भरपूर झाले. आता या मतदारसंघात जिंकून कोण येणार यावर पैजा लावल्या जात असून काँग्रेसचे काही हितचिंतक लाखाला पाच लाख अशी पैज लावून बोली लावू लागले आहेत. आता बोला!! ∙∙∙
बेतकी - खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप विरुद्ध अपक्ष अशी काटेकी टक्कर आहे. खरे म्हणजे ही लढत म्हणजे गोविंद विरुद्ध दीपक अशीच म्हणावी लागेल. कारण अपक्ष उमेदवार सुनील भोमकर हे दीपक ढवळीकरांचे कट्टर समर्थक आहेत, तरीपण राज्यात भाजप - मगो युती असल्याने या मतदारसंघात मगो समर्थक मतदारांनी कोणती भूमिका घेतली आहे त्यावर विजय निश्चित आहे. ∙∙∙
काँग्रेस–गोवा फॉरवर्ड–आरजीपी या तीन पक्षांची काही महिन्यांपूर्वी युती झाली असती आणि ती तळागाळातील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत पोहोचली असती, तर जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला हरवणे फारसे कठीण गेले नसते, असे युतीसाठी पुढाकार घेतलेल्या आमदार विजय सरदेसाईंनी पुन्हा एकदा सांगितले. सरदेसाईंचे ‘भावी प्लॅन’ काँग्रेसच्या वरिष्ठांना काही महिने आधी पटले होते. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही
सुरू केले होते. मग मध्येच त्यांच्याकडून युतीच्या चर्चांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? की कुणा एकाला आरजीपी युतीत नको होती? या प्रश्नाचे उत्तर तिन्हीही पक्षांचे कार्यकर्ते अजूनही शोधत आहेत. ∙∙∙
मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी हल्लीच पालिका नगराध्यक्षपदाची तीन वर्षांची टर्म पूर्ण केली. सध्या ते ख्रिसमस मूडमध्ये आहेत. आपल्या प्रभाग २१ मध्ये त्यांनी नाताळनिमित्त ख्रिसमस स्टार व कॅरोलचेही त्यांनी शनिवारी यशस्वी आयोजन केले. उपस्थितीही लक्षणीय होती. दामूचे नगराध्यक्षपद औटघटकेचे असल्याचे त्यांचे विरोधक सुरवातीला बोलत होते. मात्र, मडगावच्या बाबाचा वरदहस्त असल्याने त्यांनी आपली तीन वर्षांची टर्म यशस्वीपणे पूर्ण केली. गोवा मुक्तीदिन सोहळ्यात बोलताना त्यांनी आज सोमवारपासून सर्व पालिका मजुरांनी बरोबर सकाळी साडेआठ वाजता कामावर हजर रहावे असेही बजाविले आहे. त्याची अंमलबजावणी आज होते की नाही बघावे लागेल. दिलेल्या इशाऱ्यानुसार हजर राहणार नाही त्यांना ख्रिसमसची खास गिफ्ट मिळेल हे नक्की. ही भेट मेमोची असेल याबाबत शंका नाही. ∙∙∙
फोंडा तालुक्यातील कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघात यावेळेला भाजप काँग्रेस आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. मगोचे समर्थक केतन भाटीकर यांनी या निवडणुकीत वेगळी चूल मांडत आपला अपक्ष उमेदवार दाखल केला. पक्षाशी गद्दारी केल्यामुळे भाटीकर कंपूने मगोचा राजीनामाही दिला, पण मूळ मगो मतदार भाटीकर उमेदवाराला मतदान केल्याशिवाय राहतील का? असा सुज्ञ सवाल मतदार करताना दिसतात. याचाच अर्थ भाटीकरांचे पारडे जड दिसतेय. तरीपण पाहुया मतदार कुणाला कौल देतात ते...! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.