

Uttar Pradesh Murder Case: उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यात रंगपंचमीच्या दिवशी एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली. आपल्या पत्नीचा दुसऱ्या पुरुषासोबत असलेला संसार सहन न झाल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन तिची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण सुरु होती, त्याच दिवशी सकाळी 6 वाजता भररस्त्यात रक्ताचा हा भीषण खेळ खेळला गेला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, मृतदेहाजवळ बसून रडणारा प्रियकर आणि थोड्या अंतरावर जखमी अवस्थेत पडलेला पती पाहून स्थानिक नागरिकही सुन्न झाले.
आरती (31) असे मृत महिलेचे नाव आहे. आरतीचा विवाह आरसी मिशन परिसरातील मनमोहन पांडे याच्याशी झाला होता आणि त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, गेल्या काही काळापासून आरती आणि मनमोहन यांच्यात वाद सुरु असल्याने त्यांच्या घटस्फोटाचा (Divorce) खटला न्यायालयात प्रलंबित होता. गेल्या 4-5 महिन्यांपासून आरती तिच्या पतीला सोडून ब्रजदीप नावाच्या प्रियकरासोबत बालाजी नगर कॉलनीतील एका भाड्याच्या घरात 'लिव्ह-इन' मध्ये राहत होती. त्यांची मुलगी मात्र वडील मनमोहन सोबत राहत होती. ही गोष्ट मनमोहनच्या मनात शल्यासारखी खुपत होती.
बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास, जेव्हा लोक रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडण्याची तयारी करत होते, तेव्हा मनमोहनने आरतीच्या घराजवळ गाठून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, आरती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यावेळी तिला वाचवण्यासाठी आलेल्या प्रियकर ब्रजदीपवरही मनमोहनने वार केले. या झटापटीत मनमोहन स्वतः देखील जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच चौक कोतवाली पोलिसांनी तिघांनाही रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी आरतीला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीचा मृतदेह घराबाहेरील भिंतीजवळ पडला होता, तर जखमी प्रियकर तिच्याजवळ बसून रडत होता. सध्या दोन्ही जखमी पुरुषांवर उपचार सुरु असून पोलिसांनी (Police) मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.