फोंडा: प्रियोळ जिल्हा पंचायत मतदार संघ हा जरी प्रियोळ विधानसभा मतदारसंघातला वाटत असला तरी या मतदारसंघात प्रियोळ- वेलिंग पंचायतीसह मडकई मतदार संघातील कुंडई व मडकई या दोन पंचायतीचा समावेश असल्यामुळे हा ‘झेडपी’ मतदारसंघ प्रियोळ व मडकई या दोन विधानसभा मतदारसंघांना जोडणारा ठरला आहे.
सध्या या जिल्हा पंचायतीचे प्रतिनिधित्व ‘मगो’चे दामोदर नाईक करत असले तरी यावेळी हा मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे दामोदर यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. गेल्यावेळी मगो - भाजप युती नसतानाही ‘मगो’ ने या झेडपी मतदार संघावर झेंडा फडकविला होता.
त्यावेळी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हे मंत्री नसूनही मगो विजयी ठरला होता, हे विशेष. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हे २०२० च्या ‘झेडपी’ निवडणुकीवेळी मंत्री असूनही त्यांची ‘मगो’पुढे डाळ शिजली नव्हती. पण आता समीकरणे बदलली असून भाजप -मगो युतीची दाट शक्यता दिसत आहे. तसे झाल्यास हा मतदार संघ ‘मगो’ ला दिला जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी प्रियोळ झेडपी मतदारसंघासाठी रणनीती आखायला सुरुवात केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही दीपक ढवळीकर यांना प्रियोळ-वेलिंग पंचायतीत भरघोस मते मिळाली होती. त्यामुळे आता ती पुनरावृत्ती, ही दीपक यांची जबाबदारी असणार आहे. भविष्याच्या दृष्टीनेही ते त्यांना उपकारक ठरू शकते. आता दीपक यात यशस्वी होतात की काय हे मात्र बघावे लागेल.
भाजप-मगो युती होऊन हा मतदार संघ मगोला दिल्यास प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांची काय भूमिका असणार यावर साऱ्यांचे लक्ष आहे. ते एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतात का युतीच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहतात हे बघावे लागेल. त्यांची या झेडपी मतदारसंघाबाबतची भूमिका येत्या त्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची ठरू शकते एवढे मात्र नक्की
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.