Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: पैंगीणमध्‍ये तिरंगी लढतीची शक्‍यता! राजकीय समीकरणे बदलू लागली; प्रचारात गोवा फॉरवर्डची आगेकूच

Goa Zilla Panchayat Election: पैंगीण जिल्हा पंचायत मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: पैंगीण जिल्हा पंचायत मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे प्रशांत नाईक यांनी खोतीगाव पंचायत क्षेत्रातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. माजी सरपंच महादेव गावकर, मंडळाध्यक्ष दत्ता गावकर, तसेच मोहनदास लोलयेकर, विकास भगत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवारी नारळ फोडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली.

गेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ आदिवासी महिलांसाठी राखीव होता. त्यावेळी गावडोंगरीच्या शोभना वेळीप या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. लोलये, पैंगीण, गावडोंगरी आणि खोतीगाव या चारही पंचायत क्षेत्रांत मिळून सुमारे १६ हजार मतदार आहेत.इजिदोर फर्नांडिस यांनी एका मुलाखतीत पुढील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. भाजप सोडून इतर पक्षांकडून उमेदवारी घेण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला आहे.

पैंगीण आणि खोला जिल्हा पंचायत मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. पैंगीणमधील काँग्रेस उमेदवारीची माळ दया गावकर यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता मानली जाते. भाजपने या निवडणुकीसंदर्भात अद्याप सावध भूमिका घेतली आहे. आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर हे जो उमेदवार सुचवतील, त्याला पाठिंबा देण्याची तयारी लोलये पंच अजय लोलयेकर यांनी दर्शवली आहे. त्यांचे नाव भाजप उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

दया गावकर यांचा काँग्रेस प्रवेश

खोतीगावचे माजी सरपंच राजेश गावकर यांनी अलीकडेच आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. ते या पक्षाचे उमेदवार असणार हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. त्‍यादृष्‍टीने त्‍यांनी पुढे पावले टाकायला सुरुवात केली आहे.

माजी सरपंच दया ऊर्फ उमेश गावकर हे मंगळवारी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. ते काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा सादर करतील. माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे ते समर्थक आहेत.

संभाव्य उमेदवार

गोवा फॉरवर्ड :

प्रशांत नाईक

काँग्रेस :

दया ऊर्फ उमेश गावकर

आम आदमी पक्ष :

राजेश गावकर

भाजप :

अजय लोलयेकर (चर्चेत)

मतदारसंघाचे समीकरण

एकूण पंचायत क्षेत्रे ४ : लोलये, पैंगीण, गावडोंगरी, खोतीगाव. एकूण मतदार : सुमारे १६ हजार. मागील निवडणूक : आदिवासी महिलांसाठी राखीव. विजयी : शोभना वेळीप (काँग्रेस)

कारापूर-सर्वणमध्‍ये काँग्रेस, गोवा फॉरवर्डच्‍या गाठीभेटी

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्यातील कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा मतदारसंघ खुला असून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे उमेदवार जवळपास निश्‍चित झाले असून, भाजप उमेदवारीबाबत अजूनही चित्र स्‍पष्‍ट झालेले नाही.

भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची अंतिम नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहेत. आता ते कोणाच्या नावाला पसंती देतात, त्याकडे भाजप कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर, दुसऱ्या बाजूने कारापूर-सर्वणचे विद्यमान जिल्‍हा पंचायत सदस्‍य महेश सावंत यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळीही ते भाजपची उमेदवारी मिळविण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत.

पण त्‍यांच्‍यापुढे अनेक उमेदवारांनी आव्‍हान निर्माण केले आहे. या मतदारसंघात वन-म्हावळिंगे, पिळगाव, कारापूर-सर्वण पंचायतींचा समावेश आहे. काँग्रेस उमेदवार म्हणून पिळगावचे माजी सरपंच बाबाजी प्रभुगावकर यांची पत्नी उज्‍ज्वला प्रभुगावकर यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. तर, देविदास प्रभुगावकर हे गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांचे नावही जवळपास निश्चित आहे.

मोरजीत स्नेहा तिळोजी यांच्‍या प्रचाराला प्रारंभ; बैठकांना गर्दी

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी अजून आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी काही अपक्ष इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मोरजी मतदारसंघातून स्नेहा दत्तप्रसाद तिळोजी यांनी प्रचाराचा आरंभ केला आहे. आपल्‍याला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात स्नेहा तिळोजी या आमदार जीत आरोलकर यांच्या समर्थक मानल्या जातात. मोरजी, मांद्रे, आगरवाडा, चोपडे परिसरातील आजी-माजी सरपंच, पंच व कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारीसाठी आग्रह केला असल्‍याचे त्‍या सांगतात. रावराजे देशप्रभू सभागृहात झालेल्या त्‍यांच्‍या बैठकीत मोठी गर्दी झाली होती. दरम्‍यान, निवडून आल्यास मूलभूत सुविधा, महिलांची प्रगती, स्वावलंबन उपक्रम आणि पंचायत क्षेत्राचा विकास प्राधान्याने करण्याचे आश्वासन स्नेहा तिळोजी यांनी दिले आहे.

तोरसेत तिकीट वाटपावेळी भाजपने समतोल साधावा

पेडणे तालुक्यातील तोरसे जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपकडून तिकीट वाटपात सातत्याने तोरसे पंचायतीलाच प्राधान्य दिले जात आहे. त्‍यामुळे अन्‍य पंचायत क्षेत्रांत नाराजी पसरली आहे.

एकूण आठ पंचायत क्षेत्रे असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक जिल्‍हा पंचायत निवडणुकांमध्‍ये फक्त दोनच पंचायत क्षेत्रांतील उमेदवारांना पक्षाची तिकिटे मिळाल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. उर्वरित सहा पंचायत क्षेत्रांकडे होत असलेले पक्षाचे दुर्लक्ष दूर करण्याची वेळ आता आली असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. यंदाच्या निवडणुकीत तरी वारखंड, नानेचे पाणी, विठलादेवी, नागझर, वझरी, कासारवर्णे, चांदेल, हळर्ण, इब्रामपूर, हंसापूर आणि हाळी येथील कार्यकर्त्यांचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी अधिक तीव्र झाली आहे.

या पार्श्वभूमीवर २००९ पासून भाजपच्या संघटनेत सक्रिय असलेले व माजी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांच्या कार्यकाळात संघटनात्मक कामात पुढे असलेले ज्ञानेश्वर वरक, संजना परब, देविदास च्यारी हे दावेदार म्हणून पुढे आले आहेत. स्थानिकांच्या मतानुसार, यंदा या तिघांपैकी एखाद्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्‍यान, वारखंड-नागझरचे माजी उपसरपंच आणि विद्यमान पंच वसंत नाईक यांनीही भाजप नेत्यांना निवेदन देत, यावेळी उर्वरित सहा पंचायत क्षेत्रांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

शिरोडा, बोरीत रणधुमाळी सुरू

जिल्हा पंचायत निवडणुकीची घोषणा होताच शिरोडा मतदारसंघात उमेदवारांची मोर्चेबांधणी जोर धरू लागली आहे. शिरोडा विधानसभा क्षेत्रात येणारे शिरोडा-पंचवाडी आणि बोरी-बेतोडा-निरंकाल-कोनशे-कोडार असे दोन जिल्‍हा पंचायत मतदारसंघ यंदा महिलांसाठी राखीव झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत.

या बदलामुळे सलग दोन कार्यकाळ बोरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दीपक नाईक बोरकर यांची हॅट्‌ट्रिकची हुकली आहे. शिरोडा मतदारसंघातून पूर्वी निवडून आलेले नारायण कामत यांनी विकासकामे केली होती. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा प्रभाव अजूनही मजबूत असल्याचे दिसून येते.

दरम्यान, शिरोडा मतदारसंघात डॉ. गौरी शिरोडकर यांचे नाव भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर आहे. सामाजिक कार्यकर्त्या मनीला शिरोडकर यांच्याही हालचालींना वेग आला आहे. बोरी मतदारसंघात दीपक बोरकर यांनी पत्नी सिमरन बोरकर यांना तिकीट मिळावे म्हणून पक्ष श्रेष्ठींकडे संपर्क साधला आहे. बोरीच्या उपसरपंच भावना मनुराय नाईक, माजी पंच परिमल सामंत, तसेच बेतोडा-निरंकाल माजी सरपंच पूनम सामंत या देखील मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

शिरोडा, बोरी मतदारसंघांबाबत...

दोन्ही मतदारसंघ महिलांसाठी राखीव

दोन्‍ही मतदारसंघात ५ प्रमुख गावांचा समावेश

स्थानिक पातळीवर अनेक नवीन चेहरे पुढे

दोन्‍ही मतदारसंघांत भाजपचा प्रभाव

संभाव्य उमेदवारांची नावे

शिरोडा मतदारसंघ : डॉ. गौरी शिरोडकर (भाजप चर्चेत), मनीला शिरोडकर (सामाजिक कार्यकर्त्या). बोरी मतदारसंघ : सिमरन नाईक बोरकर, भावना मनुराय नाईक, परिमल सामंत, पूनम चंद्रकांत सामंत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: वैयक्तिक संबंध अन् शाळेत फोन वापरल्याचा खोटा आरोप; बार्देश येथे शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, गुन्हा दाखल

मी आयुष्याला कंटाळलीये! जीवन संपविण्यासाठी महिलेने गोव्याच्या समुद्रात घेतली उडी, जीवरक्षकाने दिले जीवदान

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर हैदराबादच्या 23 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; Video

Divjotsav 2025: 25-30 वर्षांपूर्वी गोव्यात चिकण मातीचेच दिवे दिसायचे, पितळीच्या दिवजांची वाढती संख्या; बदलता दिवजोत्सव

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

SCROLL FOR NEXT