Goa ZP Election: जिल्हा पंचायतीच्या तीन जागांवरील पोटनिवडणुकांचे निकाल अनपेक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. दोन जिल्हा पंचायत मतदारसंघांत भाजपला त्यांच्या आमदारांचा फायदा झाला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केली.
कुठ्ठाळीत विजयी उमेदवार भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या पत्नी आहेत. बूथस्तरापासून पक्षसंघटना तळागाळात बांधणे गरजेचे असल्याचा धडा या निकालातून काँग्रेसला मिळाला आहे. आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आता पक्षबांधणीवर भर देणार आहोत, असे पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी निकालानंतर म्हटले.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या फक्त महिनाभर आधी काँग्रेसचे साळगावचे आमदार भाजपमध्ये गेल्याने रेईशमागूस जिल्हा पंचायत मतदारसंघात आमच्यासमोर आव्हान उभे राहिले होते. कुठ्ठाळी आणि दवर्ली मतदारसंघात आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या दोन मतदारसंघांतील उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बसून निकालांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे पाटकर यांनी म्हटले आहे.
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते-
जिल्हा पंचायत पोटनिवडणुकांचे निकाल निराश करणारे असले तरी अलीकडील आठ आमदारांच्या धक्कादायक पक्षांतराने आमच्यासमोर मर्यादा होत्या. आम्ही निराश झालेलो नाही. प्रत्येक मतदारसंघात पंचायत पातळीवर मजबूत नेतृत्व व कार्यकर्त्यांची फळी तयार करणे यावर आम्ही भर देणार आहोत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.