Ravi Naik Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: फोंड्याची काँग्रेसची उमेदवारी कोणाला?

Goa: रवींचे कार्यकर्ते आक्रमक : पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

Dainik Gomantak

फोंडा : फोंड्यात (Ponda, Goa) सध्या काँग्रेसच्या (Congress Party) गोटात धुमशान सुरू आहे. फोंड्याचे विद्यमान आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) विरुद्ध विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) असा संघर्ष सुरू आहे.

दिगंबर कामत हे रवींना विश्वासात न घेता फोंड्यात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप रवींचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. त्यांनी आता कामत यांना विरोधी पक्षनेते पदावरून व गिरीश चोडणकरांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावे, अशी मागणी केली आहे. रवींना विश्वासात न घेता परवा दिगंबर कामतांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या राजेश वेरेकरांच्या कार्यालयाचे उद्‍घाटन झाले त्यामुळे या संघर्षात अधिकच भर पडली आहे. फोंड्यात खडपाबांध येथे रवींचे काँग्रेसचे कार्यालय असताना व तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बरीच वर्दळ असताना आणखी दुसऱ्या कार्यालयाची आवश्यकता ती काय, असा सवाल रवींचे कार्यकर्ते करत आहेत. हा सरळ सरळ आमदारांना आव्हान देण्याचा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरे कार्यालय उघडायचे असल्यास प्रदेशाध्यक्षांनी रवींना विश्वासात घ्यायला हवे होते, असेही कार्यकर्ते म्हणतात. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांनी फोंड्यातील काँग्रेसची गटसमिती बरखास्त केली आहे त्याबद्दलही काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. कोणतेही कारण न देता समितीच्या हाती नारळ का देण्यात आला याचे उत्तर प्रदेशाध्यक्ष अजूनही देऊ शकले नाहीत. त्यामुळेही असेल, पण या समितीने परवा रवींच्याच कार्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करून ही समिती अजूनही कार्यरत असल्याची चुणूक दिली.

राजेश वेरेकरांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते टाकत असलेली पावलेही रवींच्या गोटात नाराजी वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सध्या फोंड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांत दोन गट पडलेले दिसताहेत. इतके दिवस रवी हेच फोंड्यातील काँग्रेसचा चेहरा बनले होते, पण आता हा चेहरा हटविण्याचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांकडून झाल्याचे दिसत आहे. रवींनी उमेदवारीबाबत आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नसली तरी रवी रिंगणात न उतरल्यास कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच तसेच दक्षिण जिल्हा काँग्रेसचे सचिव जॉन परेरा यांना उमेदवारी देण्याची मागणी गटसमितीने तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. पण सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे काँग्रेस कार्यकर्ते मात्र दुखावले गेल्यासारखे झाले आहेत.

एकेकाळी मगोपचा बालकिल्ला असलेल्या फोंड्यात काँग्रेसला रुजवण्यात रवींचा सिंहाचा वाटा होता, हे कोणीच नाकारू शकणार नाही. पण, आता मात्र रवी आमदार असूनही गिरीश चोडणकर व दिगंबर कामत त्यांना डावलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. रवी हे बहुजन समाजाचे मोठे नेते असल्यामुळे त्यांना दुखावल्यास त्याचा परिणाम पक्षाला गोवाभर भोगावा लागेल, अशी भीती काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. म्हणूनच फोंड्यात काँग्रेसची उमेदवारी देताना रवींना विश्वासात घेणे महत्त्वाचे असल्याचा सूर निघत आहे. रवी राजकारणातील हातखंडा वापरण्यात वाकबगार असल्यामुळे ते निर्णायक क्षणी कोणती रणनीती आखतात हे सांगणे कठीण असले तरीही सध्या फोंड्यातील काँग्रेस पक्षात घोळ सुरू झाला आहे, एवढे निश्चित.

समिती बरखास्त करणे हा अन्याय

कोणते कारण न देता फोंड्याची काँग्रेसची गटसमिती बरखास्त करणे, ही प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांची मोठी चूक असल्याचे मत कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच व काँग्रेसचे फोंड्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते हुसेन मुल्ला यांनी व्यक्त केले आहे. आम्ही गेली कित्येक वर्षे फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्याबरोबर पक्षाचे काम करत असून, आता मात्र फोंड्याबद्दल काहीही माहिती नसलेले गिरीश चोडणकर हे मनमानी निर्णय घेत आहेत. यामुळे पक्षकार्याला धोका पोचण्याचा संभव असून, हा फोंड्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप प्रवेशाच्या वावड्या उठविणारे हेच ते लोक

आपल्या भाजप प्रवेशाच्या वावड्या या दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांच्या गोटातूनच बाहेर पडत असल्याचा संशय फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी व्यक्त केला. आपण आपल्या कार्यालयात बसलो असताना भाजप प्रवेश केला, अशा वावड्या कशा काय उठतात याचे उत्तर हेच लोक असू शकेल. खरेतर न्यायालयाने दिगंबर कामत यांच्‍यावर आरोप निश्चित केल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. २००७ साली तत्‍कालीन अर्थमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यावर क्रिकेट तिकिटाच्‍या घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. आता आपल्यावर आरोप निश्चित झाल्यानंतर ते हा निकष विसरले असावेत, असे वाटते. पण यामुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे, याचा विषाद वाटतो, असेही त्‍यांनी सांगितले.

रवींशिवाय फोंड्यात काँग्रेसची डाळ शिजणार?

रवी नाईकांना विश्वासात न घेता जर राजेश वेरेकर किंवा अन्य कोणाला उमेदवारी देण्यात आली तर सध्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असलेल्या फोंडा मतदारसंघात काँग्रेसची डाळ शिजणे कठीण जाऊ शकते, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या उमेदवारीवर चारवेळा निवडून आल्यामुळे रवींचा फोंड्यावर असलेला प्रभाव स्पष्ट होतो. त्यांच्या कार्यालयात होणारी लोकांची गर्दीही हेच सूचित करते. रवी मडकईतून निवडणूक लढविणार की फोंड्यातून हे जरी स्पष्ट नसले तरी ते सध्या दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आहेत. त्यांची ‘चाय पे चर्चा’ ही मोहिमही सध्या जोरात सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT