पणजी: गोव्यात सध्या सर्दी, खोकला आणि तापाच्या विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून, विशेषतः लहान मुलांमध्ये याचे प्रमाण लक्षणीय आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पावसाळ्यात या आजारांचे प्रमाण नेहमीच वाढते.
मात्र, यंदा ऑगस्टच्या उत्तरार्धापासून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात संसर्गाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दररोज सुमारे १२ रुग्ण सर्दी-खोकल्याच्या त्रासावर उपचार घेत आहेत.
काळजी घेण्याचे आवाहन
या आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे : वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.
स्वतःची काळजी घेणे आणि आजारी व्यक्तींपासून अंतर ठेवणे.
ताप किंवा सर्दी-खोकला असल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे.
योग्य उपचार महत्त्वाचे
आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याचा हा विषाणूजन्य प्रादुर्भाव हंगामी असून, तो घाबरण्याचे कारण नाही. मात्र, दुर्लक्ष केल्यास न्यूमोनियासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. सध्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, पुढील काही आठवडे हा धोका कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
सावधगिरी बाळगा
गोव्यातील सध्याच्या हवामानामुळे विषाणूंचा प्रसार वेगाने होत असल्याने नागरिकांनी घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लक्षणे आणि धोका
या विषाणूजन्य आजारांमध्ये सर्दी, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि श्वसनाचा त्रास ही प्रमुख लक्षणे आढळतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा संसर्ग गुंतागुंत निर्माण करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.