

पणजी: एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हद्दीत कोळसा वाहतुकीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ११.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत रेल्वेने ५.३६ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली.
मुरगाव बंदरात हा कोळसा उतरवण्यात येतो. तेथून रेल्वेने होस्पेट, बेल्लारीतील उद्योगांना तो पुरवला जातो. विशेष म्हणजे, केवळ सप्टेंबर महिन्यातही कोळसा वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली. सप्टेंबर २०२६ मध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेने ०.९० दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली. सप्टेंबर २०२५ मधील कामगिरीच्या तुलनेत कोळसा वाहतुकीत २०.८ टक्के वाढ झाली. त्याच महिन्यात एकूण मालवाहतूक ४.४१ दशलक्ष टनांवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या ४.१७ दशलक्ष टनांच्या तुलनेत ५.९ टक्के अधिक आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीतही वाढ नोंदविण्यात आली असून, एप्रिल-सप्टेंबर २०२६ मध्ये एकूण २६.१ दशलक्ष टन मालवाहतूक झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ ५.८ टक्के आहे. मालवाहतुकीमध्ये लोहखनिजाने सर्वाधिक वाटा राखला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १०.१७ दशलक्ष टन लोहखनिजाची वाहतूक झाली असून, त्यात ४.७ टक्के वाढ झाली. त्यानंतर पिग आयर्न व तयार पोलादाची ५.९५ दशलक्ष टन वाहतूक झाली असून, त्यात १०.५ टक्के वाढ नोंदली गेली.
रेल्वेच्या उत्पन्नावरही परिणाम
१ मालवाहतुकीच्या वाढीचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरही दिसून आला आहे. सप्टेंबरमध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेला मालवाहतुकीतून ४६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत त्यात ३७.२८ कोटी रुपये म्हणजेच ८.७२ टक्के वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मालवाहतूक उत्पन्न २,५४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
२ या कालावधीत इतर मालवाहतूक घटकांमध्येही वाढ झाली. इतर साहित्यात २० टक्के, खनिज तेलात १५.९ टक्के, कंटेनर वाहतुकीत १३.४ टक्के, सिमेंटमध्ये १८.२ टक्के आणि अन्नधान्य वाहतुकीत ८९.४ टक्के वाढ नोंदली गेली. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मालवाहतुकीने मागील वर्षाच्या तुलनेत सातत्यपूर्ण वाढ कायम ठेवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.