Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; काही शिक्षक हप्ते घेतात?

Khari Kujbuj Political Satire: एका व्यक्तीच्या चुकीमुळे आज संपूर्ण विद्यापीठाची मान शरमेने खाली गेली आहे, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे प्राध्यापकांच्या इमेजला तर धक्का लागलाच आहे.

Sameer Panditrao

काही शिक्षक हप्ते घेतात?

शिक्षण क्षेत्रात सध्या किनारपट्टीवरील शिक्षकांविषयी एक धक्कादायक चर्चा वेगाने पसरत आहे. शिक्षण संचालनालयाचे शिक्षकांवर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे, असे म्हणत काहीजण आता उघडपणे बोलू लागले आहेत. विशेषतः अनुदानित शाळेतील शिक्षकांवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे, काही शिक्षक बांधकाम व्यावसायिकांकडून तक्रारी करून ‘हप्ते’ उकळतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. ही चर्चा खरी आहे की खोटी, हा भाग वेगळा; पण ‘धूर आहे, म्हणजे आग आहे,’ असे म्हणतात. त्यामुळे या चर्चेत काहीतरी तथ्य असावे, असे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे. यात शालेय पातळीवरील शिक्षकांचा समावेश असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे, आणखी काही गैरकृत्ये समोर येण्यापूर्वी, शिक्षण संचालनालयाने किनारपट्टीवरील शिक्षकांची तातडीने चौकशी करावी, असे लोक बोलत आहेत. कोणत्या शिक्षकाने किती तक्रारी केल्या याचा अहवाल तयार करून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा स्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त केली जातेय.∙∙∙

नाते असावे पण असे नव्हे!

गोवा विद्यापीठात सध्या एकाच विषयाची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे एका प्राध्यापकाने केलेल्या गैरकृत्याची. ‘असे करायचेच होते, तर निदान सावधगिरी बाळगायला हवी होती,’ अशी चर्चा प्राध्यापकांच्या वर्तुळात रंगू लागलीय. एका व्यक्तीच्या चुकीमुळे आज संपूर्ण विद्यापीठाची मान शरमेने खाली गेली आहे, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे प्राध्यापकांच्या इमेजला तर धक्का लागलाच आहे, पण त्याचा परिणाम आता इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरही होत आहे. प्रत्येकजण संशयाच्या नजरेने पाहू लागला आहे. म्हणूनच, ‘नाते असावे पण असे नव्हे,’ असेच प्राध्यापक आता उघडपणे बोलू लागलेत. या घटनेने विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला मोठा तडा गेला असून, यातून बाहेर पडण्यासाठी बराच काळ लागेल असे दिसते. ∙∙∙

‘श्रद्धांजली’ला सरकारची मान्यता?

‘ताजमहाल मॉडेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला अकादमीच्या ओपन एअर थिएटरचे छत कोसळल्याच्या घटनेला काल दोन वर्ष उलटल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘कला राखण मांड’च्या पदाधिकाऱ्यांनी ‘आयज माका, फाल्यां तुका’ अशा आशयाचा फलक नेऊन स्मृतिप्रीत्यर्थ घटनास्थळी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. मात्र, सदर छत कोसळण्याची घटना घडली होती, तेव्हा व डागडुजीचे काम सुरू असताना पोलिसांचा कडेकोट पहारा असायचा इतकेच नव्हे तर काम चालू असलेल्या ठिकाणी डोकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही पोलिस हटकायचे. पण काल एकही पोलिस कला राखण मांडच्या पदाधिकाऱ्यांना अटकाव करण्यास नव्हता. कला संस्कृती मंत्री पदावरून गावडेंना डच्चू मिळाल्यानंतर तर हा बदल झाला नाही ना? किंवा या श्रद्धांजलीला सरकारची मान्यता तर नाही ना, अशी चर्चा कलाकारांत रंगली. ∙∙∙

हेच का हो ते, मॉडेेल मडगाव?

एका बाजूने मडगावचा सर्वांगीण विकास करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकार ‘जी-सुडा’ संस्‍थेच्‍या माध्‍यमातून मडगावसाठी मास्‍टर प्‍लॅन बनवू पहात असून दुसऱ्या बाजूने मडगावातील पदपथांची दुर्दशा एवढी झाली आहे की, या पदपथावरून चालत जाणे पादचाऱ्यांसाठी खरेच सुरक्षित का? असा कुणालाही प्रश्‍न पडावा. अगदी मडगाव पालिकेच्‍या नाकासमोर असलेल्‍या उद्यानाच्‍या पदपथाचीही अशीच अवस्‍था झाली आहे. या पदपथाच्‍या फरशा उखडून गेल्‍या असून त्‍यावरून चालताना पादचार्‍यांना एकप्रकारे कसरत करावी लागते. मडगाव पालिकेच्‍या नाकासमोर जर अशी स्‍थिती तर मडगावात इतर ठिकाणी काय अवस्‍था असेल? यालाच मॉडेल मडगाव म्‍हणायचे का? ∙∙∙

कही खुशी कही गम...

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षाचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांच्याविरोधात माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका पाटकरांनी त्यांच्यावर ठेवला आहे. परिणामी, प्रदेशाध्यक्षांच्या आरोपानंतर सध्या फेरेरांच्या प्रामाणिकपणावर बोट ठेवल्यासारखे आहे! याला फेरेरा काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. परंतु, सध्या फेरेरा यांची भाजपाच्या काही नेतेमंडळींसोबत जवळीक वाढली आहे. जे कदाचित पाटकरांना आवडले नसावे. कारणं काहीही असली तरी, या राजकीय हालचालीनंतर फेरेरा दुखावले आहेत, असे त्यांचे जवळचे कार्यकर्ते सांगताहेत. दुसरीकडे, भाजपचे हळदोणेचे माजी आमदार ग्लेन टिकलो हे मात्र खुश झाले असतील. परंतु, फेरेरा यांची भाजप नेत्यांशी वाढलेली राजकीय मैत्री टिकलोंसाठी देखील तितकीच टेन्शन देणारी आहे, याचे वेगळे कारण सांगण्याची गरज नाही... ∙∙∙

गोव्याचे चर्चिल आणि धोनी

कुणीही म्हणेल, गोव्याचे चर्चिलबाब व क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी यांचा संबंध काय. पण दोघेही क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत. एक क्रिकेटचा बादशाह तर दुसरा फुटबॉल संघ चालविणारा व बाणावलीचा पात्रांव. ७६ वर्षीय चर्चिलने २०२७ ची विधानसभा निवडणूक लढविण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. ही आपली शेवटची निवडणूक हे सांगण्यास ते विसरलेले नाहीत. पण गेल्या दोन निवडणुकांपासून ही आपली शेवटची निवडणूक, असे ते सांगत आलेत. त्यामुळे यावेळी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील का व त्याला मते देतील का, या बद्दल शंकाच आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले असले तरी आयपीएल मध्ये ते अजुनही चेन्नय सुपर किंग्स तर्फे खेळतात. गेल्या दोन वर्षांपासून आयपीएल खेळण्याचे हे आपले शेवटचे वर्ष असे सांगत आहेत. मात्र धोनीची क्रिकेट क्षेत्रात लोकप्रियता अफाट आहे व त्याला पाहण्यासाठीच लोकांची गर्दी करतात. पण चर्चिल बाबचे तसे नाही ना ! ∙∙∙

हंगामी शिक्षकांचे भवितव्य

गोव्यातील शिक्षण खात्याची अवस्था बिकट गणली जाऊ लागली आहे. खात्यांत म्हणे सध्या सातशेवर हंगामी शिक्षक कामावर आहेत.त्यांतील बहुसंख्य दहा ते बारा वर्षे हंगामीच म्हणून आहेत तर कंत्राटी तत्वावर घेतलेले असंख्यजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहचलेले आहेत. या हंगामी शिक्षकांमुळे अनेक शाळाही अडचणीत आलेल्या आहेत. अनेकजण आज ना उद्या कायम होतील म्हणून दिवस ढकलत आहेत. आता सरकार हंगामी वा कंत्राटी शिक्षक का नियुक्त करते त्याचे उत्तरही कोणाकडेच नाही. काही राजकारणी आता शिक्षण संस्था चालक झालेले असून त्यांनी तरी शिक्षकांना कायम करावे वा त्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा असे हंगामी शिक्षक व त्यांचे कुटुंबीय बाळगून आहेत. सत्ताधारी पक्षाशी निगडीत लोकांच्या शाळेत सुध्दा म्हणे हीच अवस्था आहे. शिक्षण खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नसल्याचा तर हा परिणाम नसेल ना, अशी शंकाही अनेकजण आता घेऊ लागलेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AAP Exit INDIA Block: मोठी बातमी! गोव्यात आम आदमी पक्षाचा इंडिया आघाडीला राम राम; 'एकला चलो रे'चा नारा

Goa Crime: म्हापशात 'धूम स्टाईल' चोरीचा प्रयत्न, महिलेच्या धाडसामुळे डाव फसला; दोन मंगळसूत्र चोर अटकेत

Goa Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! GSSC कडून 436 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कसा कराल अर्ज? जाणून घ्या

FDA Raid: नागवा-हडफडेत एफडीएची कारवाई, हुबळीतून आणलेलं 300 किलो चिकन जप्त

Mapusa: म्हापशात अज्ञाताने जाळल्या 6 कचराकुंड्या; पालिकेची पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT