Goa Politics: 'मायलेज'च्या भीतीपायी, एकजुटीला मूठमाती; सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यावरून विरोधकांत एकमत नाही

Goa Assembly Session: ‘एकीचे बळ म्हणजे काय’, हे सांगणारी एक प्रसिद्ध कथा आहे. शेतकरी आपल्या मुलांना ‘एकजूट’ आणि ‘सहकार्य’ गुणांचे कृतीतून महत्त्व पटवून देतो, असा त्याचा आशय आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

‘एकीचे बळ म्हणजे काय’, हे सांगणारी एक प्रसिद्ध कथा आहे. शेतकरी आपल्या मुलांना ‘एकजूट’ आणि ‘सहकार्य’ गुणांचे कृतीतून महत्त्व पटवून देतो, असा त्याचा आशय आहे. गोव्यातील विरोधी पक्षातील आमदारांकडे नेमक्या याच गुणांची कमतरता सरकारच्या पथ्थ्यावर पडत आहे. २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यावरूनही विरोधकांत एकी नसल्याचे स्पष्ट झाले आहे

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलावलेल्या बैठकीला विजय सरदेसाई, वीरेश बोरकर अनुपस्थित होते. अधिवेशनात ते वेगळी चूल मांडतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधाऱ्यांना हेच अपेक्षित असावे. ‘डिव्हाइड अँड रूल’ ही त्यांची कूटनीती राहील, यात नवल नाही. विरोधी आमदार म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध करणारे नाहीत.

ते लोकशाहीचे रक्षक, सरकारचे मार्गदर्शक व जनतेच्या ‘आवाजा’चे प्रतिनिधी असतात. त्‍यांनी एकसंध राहून कर्तव्‍य बजावणे अपेक्षित आहे. विधानसभेतील त्यांची एकी सत्तेचा समतोल राखण्यासाठी अत्यावश्यक असते. आगामी विधानसभा निवडणूक अठरा महिने दूर आहे. बऱ्याच इच्छुकांनी मोर्चेबांधणीचा ‘श्रीगणेशा’ केला आहे.

Goa Politics
Goa Politics: 'सभापती सरकारच्या हातचे बाहुले' सरदेसाईंच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत, फळदेसाईंचा सल्ला

एरव्ही सत्ताधारी भाजपवर टीका करणारे एकत्र न आल्यास विरोधाला अर्थ राहणार नाही. त्याची चुणूक आतापासून दिसू लागली आहे. अलिकडच्‍या काळात अधिवेशनाचे दिवस कमी होत आहेत.

मुख्यमंत्री आधीच अल्प ठरलेल्या मागील अधिवेशनाचा दाखला देऊन ‘ते’ तीन दिवस पावसाळी अधिवेशनातील समजावेत, असे सूचित करताहेत, ज्याचे कुणाला सोयरसुतक दिसत नाही. सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या विधानसभा पूर्वतयारी बैठकस्‍थळी सभापती उपस्थित राहतात आणि तो वादाचा मुद्दा ठरतो. दशा आणि दिशा कळण्यास वर्तमान पुरेसे आहे. अशा स्‍थितीत विरोधी पक्ष एकमेकांना पाण्‍यात पाहू लागल्‍यास पानिपत अटळ आहे.

पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्दे धसास लावणे अगत्‍याचे आहे. हृदयविकार, मधुमेह, कर्करोगींचे वाढते प्रमाण; महसुलासाठी शाळा, मंदिर परिसरात दिले जाणारे मद्य परवाने, बेकायदा बांधकामांचा चिखलकाला, सामाजिक योजनांचा गैरवापर, वाढते घटस्‍फोट- कुटुंब न्‍यायालयांची गरज, बेसुमार जमीन रूपांतरे असे सामाजिक पटलावरील जटिल प्रश्‍‍न विरोधकांनी एकजुटीतून हाती घेतल्‍यास उपायवजा ठोस उत्तरे मिळू शकतील.

सात विरोधकांपैकी सरदेसाई हे तीनदा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत; तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍यासह उर्वरित सहाजण प्रथमच विधानसभेत पोहोचले आहेत. सभागृहात ‘मायलेज’ कोण घेईल ही भीती व्‍यर्थ आहे. तेथे अनुभवाचा वापर अधिकाधिक व्‍हायला हवा. नेमके त्‍याच मुद्यावर घोडे अडताना दिसते.

विरोधकांमधील दुफळी नेहमीच भाजपसाठी उपयुक्‍त ठरली आहे. २०१२ची विधानसभा निवडणूक वगळता, २०१७ व २०२२ला मिळालेली सत्ता ही विरोधकांची शकले करूनच अभेद्य बनली, हा इतिहास सर्वश्रुत आहे. विरोधी बाकांवरील सात आमदार एकत्र न राहिल्‍यास भविष्‍यात सत्तास्‍थानी पोहोचण्‍याची त्‍यांची इच्‍छा दिवास्‍वप्‍न ठरेल, हे निराळे सांगण्‍याची आवश्‍‍यकता नाही.

दिल्लीत पराभवानंतर केजरीवाल यांचा अहंकार दुखावला; तर काँग्रेसला आपली जागा व्यापणाऱ्या पक्षाचे अध:पतन झाल्याचा मोठा आनंद झाला. या स्थित्यंतराचे गोव्यातही परिणाम दिसू शकतात, याचा स्थानिक नेत्यांना अंदाज आला आहे. आडातच नसलेले पोहऱ्यात शोधण्याचा त्रास ते घेऊ इच्छित नाहीत.

Goa Politics
Goa: 28 फेब्रुवारी 2014 पूर्वी बांधलेली घरं होणार कायदेशीर! राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

जिथे एकतेचे मृगजळही दृष्टिपथात नाही, तिथे विरोधाचे पाणी सत्ताधाऱ्यांना दिसणार कुठून? ते पाजणार तरी कोण? सत्ताधाऱ्यांना राज्य करण्यासाठी फूट पाडण्याचीही तसदी घ्यावी लागणार नाही, असेच एकंदर वातावरण विरोधी गोटात आहे. एकमेकांना विरोध करण्यात विरोधक गुंतलेले असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र अधिवेशन रणनीती आखण्‍याच्‍या निमित्ताने अभूतपूर्व एकजूट दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com