पणजी: किनारी भागात स्थिरावलेल्या पर्यटनाला धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाची जोड देण्याचे आव्हान पुढे ठाकले असतानाच गोव्याचे शेजारी स्पर्धक म्हणून पुढे येत आहेत. कर्नाटक सरकारने अलीकडे किनारी भागातील पर्यटनवाढीसाठी अबकारी दरात सवलत देता येईल याचे केलेले सुतोवाच आणि महाराष्ट्राने गोव्याच्या धर्तीवर शॅक उभारणीसाठी चालवलेले प्रयत्न हे बरेच काही सांगून जाणारे आहेत.
गोव्यातील विदेशी पर्यटकांनी गोकर्ण परिसराकडे मोर्चा वळवून आता ७-८ वर्षांचा कालावधी उलटला आहे. गोव्यातील हुशार हॉटेल व्यावसायिकांनी तेथे आपली हॉटेल्सही उभारली आहेत. आता गोव्यात मिळते ते सारे गोकर्ण परिसरात तुलनेने स्वस्तात मिळू लागल्याने विदेशी पर्यटक तेथे स्थिरावले आहेत. गोकर्णच्या मुख्य बाजारपेठेत आता भाड्याने दुचाकी मिळतील, असे फलक झळकले आहेत. दिवसाला केवळ १०० रुपये भाडे या दराने दुचाकी मिळत आहे.
महाराष्ट्रातही न्याहरी योजना सरकारने राबवली आहे. प्राचीन कोकणचे दर्शन घडवणे आणि झिपलाईनचा प्रकल्प साकारला गेला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील या गोष्टी चटकन दिसून येतात; पण स्पर्धा ही त्यापुढे आहे. ती चटकन दिसून येत नाही. कर्नाटकने आपली पर्यटनस्थळे विकसित करणे सुरू केले आहे. पूर्वी याणा या महाकाय शिला रांगाकडे जाण्यासाठी धड वाट नव्हती तेथे आता पायऱ्या विकसित केल्या आहेत. महामार्गावरून जाताना वाटेत असणाऱ्या पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक लावले आहेत. कुमठ्यानजीकचा मिर्जान हा किल्ला असाच कर्नाटकने नावारूपाला आणला आहे.
सावंतवाडी येथील केसरी येथे मत्स्यसंग्रहालय सुरू झाले. त्याची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली. गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांची आपसुक पावले त्याकडे वळू लागली आहेत. सावंतवाडीचे शिल्पग्राम हेही उदाहरण त्याच सदरातले. आकेरी येथे श्री रामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. ते पर्यटन नकाशावर तसे नव्हते; पण ते जाणीवपूर्वक पर्यटनात जोडण्यात आले. सिंधुदुर्गातील कातळशिल्पांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर झाल्याने ती अभ्यासण्यासाठी मुद्दामहून तेथे जाणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. देवगडची पवनचक्की आणि उद्यानाचा मोठा बोलबाला करण्यात आला.
हे सारे समाजमाध्यमावर सुरू आहे. त्यामुळे ते चटकन जाणवतेच असे नाही. मंगळूरजवळील गुरूपूर हे नवीत तीर्थक्षेत्र उदयाला येत आहे. कर्नाटकातील कुके सुब्रमण्यम, धर्मस्थळ आणि उडुपी येथील श्री क्षेत्रांविषयी माहिती आता देशभर पोहोचली आहे. यात सरकारचे नव्हे तर तेथील चालकांचे प्रयत्न मोलाचे आहेत.
धार्मिक पर्यटनातून मोठी उलाढाल होते हे आपल्या शेजाऱ्यांनी ओळखले आहे. आजही आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. १०-१५ वर्षांपूर्वी जसे देवदर्शनासाठी लोक येत होते तसे आता येत नाहीत तर त्याला धार्मिक व आध्यात्मिक पर्यटनाची जोड मिळाली आहे, हे कोणी लक्षात घेतलेले नाही.
वरील विवेचनातून सांगायचा मुद्दा एवढाच की आता आपसुक पर्यटक येतील आणि पर्यटन क्षेत्र चालेल अशी स्थिती नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन मोठ्या राज्यांशी स्पर्धा आहे, हे विसरून चालणार नाही.
कर्नाटकाने अभयारण्ये पर्यटकांसाठी खुली केली. सफारी सुरू केल्या. आपण कॉटेजीस बांधली; पण असलेल्या अभयारण्यांचा पर्यटनासाठी वापर फारच मर्यादित स्वरूपात केला जात आहे. पावसाळ्यात धबधबे सोडले तर निसर्ग पर्यटन आहे कुठे, अशी स्थिती आहे. याउलट महाराष्ट्रात निसर्गवाचनाचे प्रयोग जोरात सुरू आहेत. कर्नाटकही यात मागे नाही. त्यांनी गिरीशिखरांचे मार्केटिंग केव्हाच सुरू केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.