पणजी: ‘एसटी’ राजकीय आरक्षणाचा पेच कायम असून, बुधवारी, २५ रोजी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी होत आहे. या प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
२०२६ नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही अंदाजांच्या किंवा जुन्या आकडेवारीच्या आधारे गोव्यातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या अधिसूचित करण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने जनगणना आयुक्तांना स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देणारी याचिका गोवा सरकार आणि ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स ऑफ गोवा’ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २५ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे तर गोवा खंडपीठात सुद्धा २५ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी नियमित सुनावणी होणार आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप याचिका दाखल केलेली नाही. गोव्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाची पुनर्रचना अधिनियम, २०२५ या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका एडविन लुसियो फर्नांडिस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला होता.
त्याच आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले आहे. २०२६ नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही अंदाजांच्या किंवा जुन्या आकडेवारीच्या आधारे गोव्यातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या अधिसूचित करण्यास उच्च न्यायालयाने जनगणना आयुक्तांना स्थगित केले आहे. सध्याची लोकसंख्या मोजण्याची कोणतीही विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध नसताना, २०११च्या जनगणनेतील ९.९ टक्के एसटी लोकसंख्येच्या आकडेवारीवर विसंबून राहण्याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या प्रयत्नांना या आदेशामुळे मोठा धक्का बसला होता.
दोन्ही विशेष अनुमती याचिकांवर सुनावणी
बुधवारी (ता.२५) सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या दोन्ही विशेष अनुमती याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे. त्याच दिवशी गोवा खंडपीठातही मूळ याचिकेवर सुनावणी होणार असल्याने, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देते की या प्रकरणात कोणते नवे निर्देश देते, याकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.