

मडगाव: ‘बिस्लेरी’च्या पाण्यात संभाव्य कर्करोगजनक ब्रोमेटचे अंश आढळल्याचे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जाहीर केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणाचे गोव्याशीही कनेक्शन असून, तपासणीसाठी घेतलेले नमुने बिसलेरीच्या गोव्यातील प्लांटमधून गोळा करण्यात आले होते.
बिस्लेरी इंटरनॅशनलच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याविरोधात खटला चालवण्यास ‘एफएसएसएआय’ने रविवारी मंजुरी दिली. कंपनीच्या खुलाशानुसार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी गोव्यातील प्रकल्पातून पाण्याचे सहा नमुने गोळा करण्यात आले होते. हे नमुने सुमारे १४ महिन्यांपूर्वी घेतले होते.
एफएसएसएआयच्या माहितीनुसार, तपासणी केलेल्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत ते पाणी असुरक्षित घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने ब्रोमेटला मानवासाठी ‘संभाव्य कर्करोगजनक’ ठरवले आहे. कंपनीच्या अपीलनंतर नमुना पुढील तपासणीसाठी रेफरल फूड लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला. तेथेही ‘पॉलिन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स’ आढळल्याने पाणी पिण्यास असुरक्षित असल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि.ने खुलासा केला आहे. हे प्रकरण सुमारे १४ महिन्यांपूर्वीचे असून, कंपनीला अद्याप एफएसएसएआयकडून कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही, असा दावा कंपनीने केला आहे. प्राथमिक तपासणीत सहापैकी पाच नमुने सर्व निकषांवर पात्र ठरले. मात्र, सहाव्या नमुन्यात ‘ब्रोमेट’चे प्रमाण १० मायक्रोग्रॅम प्रति लिटर या विहित मर्यादेपेक्षा किंचित जास्त म्हणजेच १२ मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळले. पण स्वतंत्र प्रयोगशाळेत या नमुन्याची चाचणी केली असता सगळे काही ठीक सापडले, असे बिसलेरीने म्हटले आहे.
प्रतिस्पर्धी कंपनीकडून षड्यंत्र?
‘एफएसएसएआय’च्या या चाचणीकडे उद्योगक्षेत्रात संशयाने पाहिले जात असून, एका मोठ्या कंपनीचे उत्पादन बाजारात यावे यासाठी मुद्दामहून रचलेले हे कारस्थान आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यापूर्वी ‘मॅगी’बाबतही असेच झाले होते. त्यावेळी दुसऱ्या एका उत्पादनाला पुढे आणण्यासाठी ‘मॅगी’मध्ये दोष असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली होती.
एक लिटर पाण्यात केवळ दोन मायक्रोग्रॅम ब्रोमेटचे अधिक प्रमाण आढळले, तर त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. त्यातून कर्करोग होऊ शकतो, ही भीती अनाठायी आहे. बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियमित होणारा पाणीपुरवठा अधिक दूषित आहे. हे एकंदर प्रकरण बिस्लेरीची बदनामी करण्यासाठी असावे, असे वाटते.
- डॉ. नंदकुमार कामत, ज्येष्ठ वैज्ञानिक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.