Goa News: राज्य सरकारने शिरगावातील खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याची घोषणा केल्याने स्थानिकांच्या घरांचा व देवस्थानचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. शिरगाव गावातील सुमारे ३७० घरे व प्रसिद्ध लईराई देवस्थान असलेली जागा खाण कंपन्यांच्या मालकीची असल्याचे एकचौदाच्या उताऱ्यात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे लिलाव करण्यापूर्वी सरकारने स्थानिकांचा प्रश्न धसास लावावा, अशी मागणी शिरगाव स्थानिकांनी केली.
पणजीतील पत्रकार परिषदेत बोलताना शिरगावचे गणेश गावकर म्हणाले, शिरगावात यापूर्वी बांदेकार, चौगुले व सेझा गोवा या तीन खाण कंपनीकडून गेली 70 वर्षे खनिज उत्खनन झाले आहे. या खाणपट्ट्यातून खनिज उत्खनन झाल्याने सुमारे 5 ते 6 मोठे खंदक (पीट) तयार झालेले आहेत.
मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायही नष्ट झाला आहे. या तीन खाण कंपन्यांनी कोमुनिदाद जमिनीत सुरू केलेल्या खनिज व्यवसायानंतर ही जमीन एक चौदाच्या उताऱ्यावर आपल्या नावावर करून घेतली आणि सरकारने त्याला प्रोत्साहन दिले. सरकारने खाणपट्ट्यांच्या लिलावासाठी शिरगाव गावाची निवड करण्यामागे काय कारण आहे.
तसेच तो प्रस्ताव कोणत्या आधारावर ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न करून गावकर म्हणाले, हे खाणपट्ट्याच्या क्षेत्रात असलेले खंदक वस्ती व लईराई देवस्थानपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आहेत. या ठिकाणी राज्यातील लईराई जत्रा होते व मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात.
त्यामुळे खाणपट्ट्यांचा लिलाव झाला, तर जो कोणी ती घेईल, तो या शिरगाव क्षेत्रावर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खाणपट्ट्यांची मालकी कोणाच्या नावावर आहे, हे अधी सरकारने त्यांना स्पष्ट करण्यास सांगावे.
सरकारने शिरगाव क्षेत्रातील खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यापूर्वी स्थानिकांचा प्रश्न सोडवण्याबरोबरच तेथील खाणपट्ट्यातील खंदक बुजवावेत, नष्ट झालेली शेती पूर्वस्थितीत आणावी, तेथे जलस्रोत झरे आटले आहेत तेथे पाणी उपलब्ध करावे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खाणपट्ट्यामधील पृष्ठभागावर खाण कंपन्यांचा अधिकार व त्याखाली असलेल्या खनिज मालावर सरकारचा अधिकार असल्याने या प्रकरणी सरकारने दखल घेऊन शिरगाववासियांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी स्थानिकांनी आज सरकारला केली. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनाही सादर केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.