Goa Assembly News: काँग्रेसमधून घाऊक पक्षांतर करत भाजपात प्रवेश केलेल्या 8 आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्र प्रकरणाची पुढील सुनावणी 6 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे.
या आमदारांपैकी एका आमदाराच्या वकिलाने त्यांचे मत मांडण्यासाठी मुदत मागितली होती, त्यामुळे या आमदारांना सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये या दिंगबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस आणि आलेक्स सिक्वेरा या आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यांच्याविरोधात काँग्रेस नेते डॉम्निक नोरोन्हा यांनी विधानसभा सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका दाखल केली होती.
त्यावर काल पहिल्यांदा सभापतींसमोर सुनावणी झाली. संबंधित आमदारांचे वकील ॲड. अभिजीत कामत यांनी या त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ मागितला होता. त्याप्रमाणे 5 एप्रिलपर्यंत मुदत दिली असून 6 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.
दरम्यान, याचिकांवर सुनावणी होत असल्याने ते आठ अडचणीत सापडले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करून महत्त्वाची पदे तर मिळाली नाहीत, शिवाय सुनावणींचा ससेमिराही लागला आहे.
कामत, लोबो सुनावणी 6 मार्चला
याशिवाय आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेली अपात्रता याचिकेवरील सुनावणी 6 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
गत वर्षी विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील एक गट फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या माहितीच्या आधारे पाटकर यांनी हा गट फुटण्यापूर्वीच सभापतींकडे या दोघांना अपात्र ठरवावे, अशी स्वतंत्र याचिका दाखल केली होती.
आज सुनावणीवेळी या दोन्ही आमदारांचे वकील सभापतींसमोर हजर नव्हते. मात्र, यापूर्वीच त्यांचे जवाब नोंदवले आहे. त्याच्या प्रतिही आम्हाला देण्यात आल्या आहेत, असे काँग्रेसचे वकील अभिजीत गोसावी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.