पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्स (आरजीपी) या दोन पक्षांशी युती करण्यास काँग्रेस पक्ष तयार झाला असून, पुढील दोन दिवसांत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
युतीबाबत स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांना युती मान्य असल्याने लवकरच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांच्याशी चर्चा करून युती आणि जागा वाटपाच्या विषयांवर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
‘ झेडपी निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि आरजी या दोन पक्षांशी युतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांची समिती स्थापन केली होती.
सोमवारी त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून युतीबाबत त्यांचे म्हणणे आपण जाणून घेतले आहे. त्यात सर्वांनीच युतीची गरज असल्याची भूमिका घेतली आहे’, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
‘गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीशी युतीचा निर्णय आम्ही घेतला असला, तरी दोन ते तीन जागांबाबत त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच सरदेसाई व परब यांच्याशी चर्चा करून त्या जागांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. तेव्हा कोणता पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवेल? हे स्पष्ट होईल’, असेही ठाकरे म्हणाले.
चर्चा सुरू, पण...!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर काणकोणातून निवडून आलेल्या आणि त्यानंतर भाजपात गेलेल्या इजिदोर फर्नांडिस यांना फॉरवर्डने प्रवेश दिल्यावरून आरजी अजूनही आक्रमक आहे.
त्यावरून सरदेसाईंना टोला लगावताना, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजीत युतीबाबत चर्चा सुरू आहेत. परंतु, आम्ही पारदर्शक राजकारण करणे गरजेचे आहे. जनतेलाही तसेच वाटते, अशी प्रतिक्रिया आमदार वीरेश बोरकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
रायची उमेदवारी क्वाद्रोस यांच्या पत्नीला
जिल्हा पंचायतीचा राय मतदारसंघ अगोदर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव ठेवला होता. त्यामुळे फॉरवर्डने तेथे लुईस क्वाद्रोस यांना उमेदवारी देऊन त्यांचा प्रचारही सुरू होता.
पण, काहीच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने बदल करून हा मतदारसंघ एसटी महिलांसाठी राखीव केला. त्यामुळे फॉरवर्डने आता रायची उमेदवारी लुईस क्वाद्रोस यांच्या पत्नी इनासिना पिंटो यांना जाहीर केल्याची माहिती फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.