Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: गोवा भारतापासून वेगळा?

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी पोटनिवडणूक रद्द झाल्यावर थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली खरी...पण ही धाव स्लो मोशन आल्याची चर्चा सुरू आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोवा भारतापासून वेगळा?

गोवा पोर्तुगीजांच्‍या तावडीतून सोडवून भारतात सामील करुन झाल्‍यावरही काहीजण गोवा हा वेगळा असे म्‍हणत असत. आता गोव्‍याच्‍या सरकारही गोवा भारतापासून वेगळा असे वाटते का0 हा प्रश्र्‍न पडण्‍याचे कारण म्‍हणजे, राजकीय विश्र्‍लेषक ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो यांनी आपल्‍या फेसबुकवर टाकलेला पोस्‍ट. फोंडा पोट निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍याचे कारण पुढे करुन गोवा विधानसभेचे अधिवेशन घाईघाईत गुंडाळण्‍यात आले होते. याचाच संदर्भ देत अॅड. कुतिन्‍हो यांनी एक पोस्‍ट टाकला आहे. ते म्‍हणतात, गोव्‍यात विधानसभा अधिवेशन आटोपते घेतले. मात्र तामिळनाडू आणि पश्र्‍चिम बंगाल येथे निवडणुका चालू असताना संसदेचे अधिवेशन चालू आहे. हीच काय ती आचारसंहिता? की हा दुटप्‍पीपणा? ॲड. कुतिन्‍हो यांचा हा सवाल विचार करण्‍यासारखा नाही का?

भाटीकर ‘स्लो मोशन’मध्ये

काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी पोटनिवडणूक रद्द झाल्यावर थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली खरी...पण ही धाव स्लो मोशन आल्याची चर्चा सुरू आहे. कारण काय, याचिका टाकली आणि मग जरा शांतच बसल्यासारखं झालं म्हणे! राजकारणात जसं ‘घोषणा मोठी आणि कृती छोटी’ असतं, तसंच काहीसं इथे दिसतंय, असे मिश्किल टोमणे सध्या रंगतात. एकूणच, केतन भाटीकर यांची चाल ही ‘चेस’ आहे की ‘कॅरम’, हे अजून स्पष्ट व्हायचंय! आता पुढचा डाव ते कसा टाकतात आणि लोकांच्या या चर्चेला काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

मडगावचे काँग्रेस कार्यकर्ते!

जेव्हा दिगंबर कामत कॉंग्रेसमध्ये होते, तेव्हा या पक्षातील कित्येक कार्यकर्ते काम करताना दिसत होते. त्यामानाने भाजपकडे कार्यकर्तेही कमी होते. आता दिगंबरबाब भाजपमध्ये गेल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्ते गायब झाल्याचे दिसत आहे. याचा अर्थ दिगंबरबाबसोबत सर्व कॉंग्रेसमधील कार्यकर्ते भाजपवासी झाले. आता प्रश्न असा आहे की, आगामी नगरपालिका व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांसमवेत कार्यकर्ते असतील का? जे भाजपवासी झालेत ते मनाने कॉंग्रेस मध्येच आहेत असे काहीजण दबक्या आवाजात बोलताना दिसतात. तसेच ज्या भाजप कार्यकर्त्यांना दिगंबरबाब यांचा प्रवेश आवडलेला नाही तेही यावेळी विरोधी भूमिका घेतील असे बोलले जातेय. मात्र उघडपणे कोणीही येत नाहीत, हे खरे. शेवटी प्रश्न आहे तो मतांचा. लोकसभा निवडणुकीवेळी कुठे होते कॉंग्रेसचे कार्यकर्ते, तरी त्यांचा उमेदवार जिंकला ना? अशीच चर्चा मडगावमध्ये रंगली आहे.

कुंकळ्ळीतील ‘त्रिमूर्ती’ची योजना काय?

‘एकीत बळ असते’ हे आता राजकारण्यांना कळू लागले आहे. देशात व राज्यात भाजपला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची भाषा करताना दिसतात. राजकीय युती करून देशातून मोदींना व राज्यातून डॉ. सावंत सरकारला खाली खेचण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, कुंकळ्ळीत वेगळीच राजकीय युती घडविण्यात येत असल्याची चर्चा आहे. कुंकळ्ळीचे मतदार भाजपला हरवण्यासाठी नव्हे तर, खुद्द विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांना कुंकळ्ळीतून हद्दपार करण्यासाठी अनोखी राजकीय युती जन्मास येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. डॉ. जॉर्सन फर्नांडिस, निवृत्त पोलिस अधीक्षक सॅमी तवारीस यांनी युरी यांच्या विकासकामांच्या शुभारंभाच्या पूर्व संध्येची संधी साधून पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे युरी विरोधी प्लॅनिंग जाहीर केले. यापूर्वी ‘आप’चे प्रशांत नाईक, भाजपचे क्लाफास डायस, सॅमी तवारीस, डॉ. जॉर्सन फर्नांडिस व काँग्रेसचे एल्विस गोम्स यांनी मतदार संघात सर्वत्र बॅनर लावून युरी विरोधक एकत्र येत असल्याचे संकेत दिले होते. आता ही युती युरीला हटविण्यात किती फायदेशीर ठरते, हे पहावे लागेल.

कुंकळ्ळीतील इव्हेंट!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कुंकळ्ळी मतदारसंघात भाजप सरकारने आज शुक्रवार, १७ रोजी कुंकळ्ळी बस स्थानकाजवळ विविध प्रकल्पांच्या पायाभरणी व उद्‍घाटनांचा ‘इव्हेंट'' आयोजित केला आहे. मुख्यमंत्री, नगर नियोजन मंत्री, साबांखा मंत्री तसेच मायकल लोबो, एल्टन डिकॉस्ता, मुख्यसचिव असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत म्हणे. कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ उभारले असून, लोकांसाठी कार्यक्रमानंतर खास मेजवानी असल्याचे कळते. कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या कार्यक्रमात भाजपने विरोधी पक्षनेत्याच्या मतदारसंघातूनच निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न तर नव्हे.

वॉरनची राजकीय धडपड

सामाजिक कार्यकर्ता वॉरन आलेमाव हे आता आपली राजकीय ‘इनिंग्स’ खेळण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचा कल कॉंग्रेसकडे आहे हे काही लपलेले नाही. फॉरवर्डवाल्यांशीही त्यांची जवळीक आहे बरं का! काही महिन्यांपूर्वी त्यांनी दक्षिण गोवा कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांना पत्र लिहून कॉंग्रेस प्रवेशाची आपली ही इच्छा कळवली होती. आता सावियो यांच्या जागी आसिस नोरोन्हा हे अध्यक्ष बनले असून, ते विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे खंदे समर्थक आहेत. युरी वॉरनचे सख्खे चुलतभाऊ आहेत. त्यामुळे कॉंग्रेस प्रवेशाचे त्यांचे स्वप्न पूर्णही होऊ शकते. मात्र, विधानसभा निवडणुकीत बाणावली मतदारसंघातून उमेदवारी देईल याबाबत काही भरोसा नाही. युरी व वॉरन या दोघांना ही उमेदवारी दिली तर ‘फॅमिलीराज’चा मुद्दा आहे. यापूर्वी कॉँग्रेसने याच आलेमाव फॅमिलीतील चौघांना उमेदवारी देऊन आपले हात पोळून घेतले होते. त्यामुळे पुन्हा ही ‘रिस्क’ पक्ष घेण्याची शक्यता तशी कमीच आहे म्हणा. पण शेवटी हे राजकारण आहे व तेथे काहीही घडू शकते हेही, तेवढेच खरे नाही का?.

न्यायालय विरुद्ध ‘जनभावना’

आमदार संकल्प आमोणकर हे सध्या ‘कायदा विरुद्ध भावना’ या नव्या मालिकेचे मुख्य कलाकार बनले आहेत की काय, अशी चर्चा गावोगावी रंगली आहे. पूर्वी एकदा न्यायालयावर भाष्य केल्यामुळे आमदाराला नोटीस मिळाल्याची चर्चा अजून थंडावलेली नाही, तोवर आता पुन्हा तेच धाडस! न्यायालयाचे आदेश म्हणजे आदेशच, पण त्यावरही ‘जनतेच्या भावना’ नावाचा ब्रेक लावायचा प्रयत्न सुरू आहे, असं लोक म्हणतात. आता प्रश्न असा की, न्यायालय मोठं की भावना? की दोघांनाही खूश ठेवण्याचा हा नवा राजकीय ‘फॉर्म्युला?’ गावात तर अशीही चर्चा सुरू आहे की, आमदारसाहेब न्यायालयाला आव्हान देतायत की, स्वतःलाच अडचणीत नेतात? कारण एकीकडे आदेश मोडला तर ‘अवमान’, आणि दुसरीकडे लोकांना नाराज केलं तर ‘राजकारण’ धोक्यात! आता पुढे काय होणार, पुन्हा नोटीस, की सगळं शांत? हे कुणालाच ठाऊक नाही. पण एवढं मात्र नक्की, की या सगळ्या प्रकारात ‘सरकारी कामात अडथळा’ आणि ‘राजकीय स्टंट’ यांचं मिश्रण तयार झालंय... आणि प्रेक्षक मात्र मजा घेतायत!

आपापसातच कुस्ती...

म्हापशात गेल्या ३० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, कारण काँग्रेसकडे स्वतःचा तगडा उमेदवारच नव्हता. नेहमी ‘आयात’ उमेदवारांवर अवलंबून राहणाऱ्या काँग्रेसमध्ये आता मात्र उमेदवारीसाठी तिघांत जुंपली आहे. प्रतीक्षा खलप, शशांक नार्वेकर आणि विजय भिके हे तिघेही आतापासूनच शर्यतीत उतरले आहेत. शशांक नार्वेकरांकडे नगरसेवकपदाचा अनुभव आहे, तर भिके यांनी कठीण काळात पक्षाचा तंबू साभाळलाय. पण म्हापशातील लोक आता उपरोधाने म्हणतायत की, जनतेत कोणाचे किती वजन आहे यापेक्षा, ज्याची दिल्लीत ‘पॉवर’ जास्त, त्यालाच उमेदवारी मिळणार! भाजपला हरवण्याआधी ही मंडळी एकमेकांना हरवण्यातच जास्त धन्यता मानत आहेत, हे मात्र नक्की!

बैठकीच्या फलनिष्पतीची आशा!

सांतिनेज खाडीतील प्रदूषण दूर करून ती खाडी पुनर्संचयित करण्याचे आव्हान महापालिका व इतर खात्यांसमोर उभे राहिले आहे. महापौर रोहित मोन्सेरात यांनी मळ्याच्या तलावातील दूषितपणा प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्यांनी सांतिनेज खाडीच्याही प्रदूषणावर भाष्य केले होते. त्यानुसार त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सरकारी पातळीवर बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य विभाग, आयपीएससीडीएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, ‘एसआयडीसीजीएल’, ‘जीएसयूडीए’, जलसंपदा विभाग, ‘सीसीपी’, ‘जीएसपीसीबी’ आणि ‘आरएनडी’ या खात्यांच्या अधिकारी सहभागी झाला होता. त्यातून आता खाडीची स्वच्छता आणि पुनर्संचयनासाठी एक दीर्घकालीन ‘मास्टर प्लॅन’ विकसित करण्याचा निर्णय झाला. महापौर रोहित मोन्सेरात सध्या पणजीतील विविध विषय हाती घेत आहेत, त्यातूनच झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. बैठकीची फलनिष्पती ही जेव्हा खाडीच्या पुनर्संचयनाचे काम मार्गी लागेल, तेव्हाच मानली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart Electricity Meter: 'स्मार्ट मीटर'बाबत लोकांत अज्ञान! ‘स्मार्ट जनजागृती झाली नाही; वीजमंत्री ढवळीकरांची अप्रत्यक्ष कबुली

Stray Dogs: भटक्‍या कुत्र्यांच्‍या बंदोबस्‍ताची जबाबदारी 'दृष्‍टी'कडे द्या! द. गोव्‍यातील सरपंचांची पर्यटन संचालकांकडे मागणी

Goa Viral Video: 'त्या' व्हिडिओप्रकरणी युवक जेरबंद, क्राईम ब्रँचची यूपीत कारवाई; व्हिडिओ व्हायरल केल्याचा ठपका

घरमालकांसाठी नवे नियम लागू! भाडेकरूंची माहिती 5 दिवसांत देणं बंधनकारक; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट 'तुरुंगवास'

Drowning Death: काळाचा घाला! फिट आली अन् तोल गेला; गुडघाभर पाण्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT