Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: डिचोलीत 'पुणेरी' राजकारण

Khari Kujbuj Political Satire: ‘फोंड्यात केतन आणि काणकोणात चेतन’ अशी नवीन हॅशटॅग लाईन आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोलीत ‘पुणेरी’ राजकारण

डिचोलीत हळूहळू पालिका निवडणुकीचे वारे तापू लागले आहे. पालिकेच्या राजकारण नवे वळण घेण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत. कारण डिचोलीच्या राजकारणात शिरकाव केलेले उद्योजक चैतन्य ऊर्फ सनी मानकर हे होय. मानकर हे मूळ पुण्‍याचे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते डिचोलीतील मुळगाव येथे वास्तव्यास आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डिचोली मतदारसंघातून लढविण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यादृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांची फळी उभारून संगीत कार्यक्रम, नोकरभरती मेळावे आदी उपक्रम राबविले. विधानसभा निवडणुकीपूर्वी पालिका निवडणूक होईल. विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्यांनी पालिका निवडणुकीत आपले पॅनल उतरविण्याची तयारीही केली आहे. पालिकेच्या चौदाही प्रभागांतून आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. विधानसभा निवडणूक लढवायची म्हणजे पालिका निवडणुकीत राजकीय ‘वजन’ दाखवून द्यायचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मानकर यांचे ‘पुणेरी’ राजकारण डिचोलीत कितपत यशस्वी ठरते, हे पहावे लागेल.

चेतनने बाशिंग बांधले!

‘फोंड्यात केतन आणि काणकोणात चेतन’ अशी नवीन हॅशटॅग लाईन आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोवा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व विद्यमान अध्यक्षांचे मेंटर चेतन देसाई यांनी काणकोण मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत चेतन देसाई आपले पॅनल उतरवणार असल्याचे कळते. देसाई यांनी काणकोण मतदारसंघात आपले कार्य जोमाने सुरू केले असून मल्लिकार्जुन व चेतन देसाई महाविद्यालय चालवित असलेल्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शिक्षण व क्रीडा क्षेत्रात विशेष करून क्रिकेटमध्ये त्यांनी मोठे काम सुरू केल्याने युवा वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यात ते काहीअंशी यशस्वी ठरले आहेत. हल्लीच त्यांनी काणकोण मतदारसंघात सीझन बॉल फ्लड लाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व आमदार एल्टन डिकॉस्टा यांना निमंत्रित केले होते. आता चेतन देसाई यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यास ते रमेश तवडकर यांना आव्हान देऊ शकणार का? हा खरा प्रश्‍‍न आहे.

सरकारला सोयरसुतक नाहीच!

गेल्‍या काही महिन्‍यांपासून सातत्‍याने गोवा-महाराष्‍ट्र असा प्रवास करत असलेल्‍या ‘ओंकार’ हत्तीने गोव्‍यात आल्‍यानंतर शेती, पिकांची नासाडी करण्‍याचे सत्र सुरूच ठेवलेले आहे. कर्नाटक सरकारच्‍या मदतीने या हत्तीचा बंदोबस्‍त लावण्‍याची हमी वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी काही महिन्‍यांपूर्वी दिली होती. परंतु आत्तापर्यंत तसे काहीही झालेले नाही. दुसरीकडे, ओंकारचा अधिवास महाराष्‍ट्रातील दोडामार्ग परिसरात असल्‍यामुळे त्‍याच्‍याबाबत केवळ महाराष्‍ट्र सरकारच निर्णय घेऊ शकते. त्‍यामुळे ओंकार हत्ती गोव्‍यात आल्‍यानंतर त्‍याला दोडामार्ग येथे परतवून लावणे इतकाच पर्याय गोवा सरकारकडे असल्‍याचे वन खात्‍याचे वरिष्‍ठ अधिकारी सांगतात. या गोंधळात ओंकारकडून मात्र शेतकऱ्यांचे जगणे कठीण होत आहे. तरीही राज्‍य सरकार महाराष्‍ट्र सरकारशी चर्चा करून ओंकारबाबत तोडगा काढत नसल्‍याने सरकारला शेतकऱ्यांचे काहीच सोयरसुतक नसल्‍याची चर्चा मोपा, तांबोसे परिसरात सुरू आहे.

शिक्षणाची ही शोकांतिका!

बरोबरी, दर्जा, जबाबदारी, उपलब्धता व स्वीकारहर्ता हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पाच स्तंभ आहेत. मात्र देशातील सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये ‘एनईपी’चे हे पाच स्तंभ दिसतात का? हा खरा प्रश्‍‍न आहे. आपल्या राज्यात शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी शिक्षणाची शोकांतिका आजही अनुभवायला मिळते. एका बाजूने काही शाळांमध्‍ये आवश्यक असलेली पटसंख्या राखण्यासाठी शाळेचे शिक्षक विद्यार्थी शोधायला दारोदारी फिरताना दिसतात. ‘कोणी विद्यार्थी देता का हो विद्यार्थी?’ अशी आरोळी ठोकत विद्यार्थी शोधण्याची वेळ काही शाळांतील शिक्षकांवर आलीय. दुसऱ्या बाजूने शहरातील काही मोठ्या शाळांमध्‍ये दाखला घेण्यासाठी पालकांना भल्या पहाटे उठून प्रवेशअर्ज घ्यावे लागतात. राजकीय शिफारस व मोठी देणगी देऊन आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घेणारे पालक आहेत. तिसऱ्या प्रकारचे पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना पंचतारांकित शाळांमध्‍ये प्रवेश मिळतात. एका बाजूने शिक्षकांना विद्यार्थ्यांना शोधावे लागते तर दुसऱ्या बाजूने पालक मुलांच्‍या प्रवेशासाठी धडपडतात. ही शिक्षण खात्यातील शोकांतिका म्हणावी लागली ना?

कोण कोणाला पडणार होता भारी?

फोंड्याची पोटनिवडणूक रद्द झाली तरी कवित्व काही संपत नाही. ही निवडणूक रद्द करण्यामागे कोणाचा हात आहे?, कोण कोणाला भारी पडणार होता?, कोणाची कशी जिरली? इथपर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया जनमानसातून प्रकट होत आहेत. अर्थातच या साऱ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पना आहेत आणि समाजमाध्यमांवर तर मेसेजचा पाऊस पडत आहे. आता त्यातील एकच गोम महत्त्‍वाची आहे ती म्हणजे कोण कोणाला भारी पडणार हा विषय. अर्थातच या विषयावर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत खरा प्रकाश पडेल.

सरकारी कामाचा ताण

जलस्रोत खात्याच्या एका कनिष्ठ अभियंत्याने वाळपईत पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ती घटना दुर्दैवी होती पण काहींनी त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केल्याच. त्‍या अधिकाऱ्यावर म्‍हणे कामाचा ताण होता व त्‍यामुळेच त्याने जीव दिला, असा तर्क काहींनी लावला. अशा तर्कामुळे अनेकदा खरे कारण उजेडात येत नाही व तपास भलत्याच दिशेने भरकटतो असे तपास यंत्रणा म्हणते. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी नोकरीत कामाचा ताण आहे असे म्हणणे हा प्रकारच मुळी हास्यास्पद असल्याचे लोक बोलतात. बहुतांश कर्मचारी काम न करताच गलेलठ्ठ पगार व सर्व सुविधा मिळतात. म्हणूनच तर प्रत्येकजण सरकारी नोकरीसाठी केवळ आटापिटाच नाही तर ती मिळावी म्हणून लाखोंची रक्कम मोजतो. त्यातूनच पूजा नाईकसारखी प्रकरणे घडतात. मग सरकारी कामाचा ताण येतोच मुळी कुठे?

कुंकळ्‍ळीत काँग्रेसचे ठरले?

‘व्हेल बिगिन हाफ डन’ असे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. ‘सुरुवात योग्य झाली तर अर्धे काम फत्ते’ असा त्याचा अर्थ. महिनाभरात पालिका निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कुंकळ्‍ळी पालिका क्षेत्रात काँग्रेसच्‍या टीमने चौदाही प्रभागांत आपले उमेदवार शॉर्ट-लिस्ट केल्याची चर्चा आहे. एक सेवानिवृत्त पोलिस हवालदार, एका माजी नगराध्यक्षाचा बंधू, एक दुकानदार, युरींच्या कार्यालयात काम करणारी एक महिला, युरी समर्थक आणखी एक युवा महिला, एक फुटबॉल प्रशिक्षक, एक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, एक सेवानिवृत्त खलाशी, एक सेवानिवृत्त अभियंता, सेवानिवृत्त शिक्षक, एक माजी महिला नगराध्यक्षा यांचा त्‍यात समावेश आहे. प्रभाग राखीवता जाहीर झाल्यावर काँग्रेस लगेच उमेदवार जाहीर करण्याच्या विचारात आहे. तर, दुसऱ्या बाजूने भाजपची टीम क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे, असे आम्‍ही नव्‍हे, लोक बोलतात!

सावियो पुन्हा हॅप्पी-मूडमध्ये

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याने वेळ्ळीचे सावियो डिसिल्वा हे मध्यंतरी नाराज होते. आता त्यांची नाराजी दूर झाली असल्‍याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. त्यास कारण ठरले असोळणा येथे झालेला एक कार्यक्रम. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून सावियो यांच्याबरोबर व्यासपीठावर सीट शेयर केली. तसेच त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्यानंतर सावियोबाबचा चेहराही खुलला. कदाचित ‘पुढच्या निवडणुकीत वेळ्ळीतून तुमची उमेदवारी नक्की’ असे तर पाटकरसरांनी सावियोंच्‍या कानात सांगितले तर नसावे ना? सध्या सावियो पुन्हा हॅप्पी-मूडमध्ये दिसत आहेत, हे मात्र खरे.

युरी-केतन गेले कुठे?

फोंडा पोटनिवडणूक उच्च-न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्‍याचे जाहीर केले. काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी आजच याचिका दाखल होणार असे सांगितल्याची बातमी ‘गोमन्तक''मध्ये रविवारी प्रसिद्ध झाली. त्यानंतर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व फोंड्याचे उमेदवार केतन भाटीकर हे विमानतळावर एकत्र बसल्याचा फोटो व्हायरल झाला आणि एका डिजिटल मीडियाने तर ते दोघे दिल्लीलाच निघाल्याचा कयास बांधला. परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका काही दाखल झाली नाही. त्यातच रविवारी संध्याकाळीम युरी-केतन मुंबईत आयपीएलचा सामना बघायला गेल्याची वावडी कुणीतरी उठवली. त्यामुळे ते दोघेही परतल्यावर नक्की कुठे गेले होते, ते सांगितले काय, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

स्पर्धा बंद कराव्यात

कला अकादमीच्या कोकणी व इतर नाट्यस्पर्धा बंद कराव्यात अशी मागणी कलाकारांकडून होऊ लागली आहे. कारण नाट्यस्पर्धेत परीक्षकांना लाच देऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची धमक कला अकादमीकडे नाही हे दिसून यायला लागले आहे. सर्व गोवा या मुद्द्यावरून पाळण्यासारखा हलायला लागला, भूकंप झाल्यासारखा कंप येऊ लागला. त्याची पर्वा जर अकादमीला नसेल तर झंझट बंद केलेली बरी, असे लोक म्हणतात. झुंडशाही, दादागिरी, दडपशाही, दंडेलशाही, मनमानी, धटिंगणपणा हे लोकशाहीचे मानदंड नव्हेत हे कलेसारख्या सरकारी संस्थांनी ध्यानात घेणे उचित असे तज्‍ज्ञ म्हणतात. लोकांना पारदर्शकपणे कारवाईविषयी समजायला पाहिजे अशी सर्व कलाकारांची मागणी आहे. मग त्या कायापालटाची चौकशी कां होऊ नये? खरेच तसा तो केला गेला तर पाच वर्षांच्या आत त्याची अशी दुर्दशा का व्हावी? असेही काहीजण आता म्हणू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Fair Bicholim: 317 जण आले, 84 युवांना 'ऑफर लेटर'; सनी मानकर यांच्‍यातर्फे डिचोलीत 'नोकरभरती मेळावा'

Goa Drug Peddling: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर उघडपणे होतेय ड्रग्‍सविक्री, परदेशी पर्यटकाने पोलखोल केल्याने खळबळ

भारतीय सुगम संगीताच्या क्षेत्रातले एक युग संपले- विशेष संपादकीय

Goa Drowning Death: सहलीचा आनंद अल्पकाळ टिकला, म्हादईत 21 वर्षीय तरुण बुडाला, दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांवर काळाचा घाला

चुकून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीने घेतला मैत्रिणीचा वेध, काजूर केपेत दुर्घटना; पाळी येथील मित्राला अटक

SCROLL FOR NEXT