Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: निवडणुकीचा सक्सेस फॉर्म्युला!

Khari Kujbuj Political Satire: दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी आता असीझ नोरोन्हा यांची निवड झाली आहे. या पदावर पूर्वी वेळ्ळीचे सावियो डिसिल्वा होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

निवडणुकीचा सक्सेस फॉर्म्युला!

राजकारणात तसे मूल्यांना, सत्याला, स्वाभिमानाला, निष्ठेला व इतर गुणांना मोठे स्थान नसते. जो मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून स्वतः व पक्षाला निवडणुकीत जिंकून आणण्याची ज्याला पात्रता आहे, तोच यशस्वी राजकारणी असे मानले जाते. भाजपाने आता आपल्या कार्यकर्त्यांना शिक्षित करण्यासाठी व पुढच्या विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी कसे प्रयत्न करावे, याची शिकवण देण्यासाठी शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. या शिकवणी वर्गात आपल्या कार्यकर्त्यांना शिक्षित करण्यासाठी भाजपाने अनुभवी शिक्षकांची नेमणूक केली आहे. आता हे शिक्षक कार्यकर्त्यांना निवडणुकीचा सक्सेस फॉर्म्युला शिकवताना साम, दाम, दंड, भेद हा मंत्र शिकवतात का? हे बघावे लागेले. ∙∙∙

सावियोची दांडी गुल्ल!

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी आता असीझ नोरोन्हा यांची निवड झाली आहे. या पदावर पूर्वी वेळ्ळीचे सावियो डिसिल्वा होते. हल्लीच काँग्रेसने गटाध्यक्ष बदल प्रक्रिया राबविली होती. त्यामुळे सावियो याची या पदावरून एक्झिट झाली म्हणून कुणी त्याला आक्षेप घेऊ शकत नाही. मात्र आता अध्यक्ष झालेले नोरोन्हाबाब हे विरोधी पक्षनेते तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचे खंदे समर्थक आहेत. युरीनेच त्यांना या पदावर बसविण्यासाठी आपले मोहरे वापरले, अशी चर्चा खुद्द काँग्रेसजणातच सुरू आहे. खरे खोटे ते देवच जाणे. मात्र सावियोच्या पदरी मात्र निराशा पडली, हे मात्र तेवढेच खरे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेळ्ळी म तदारसंघातून निवडणूक लढविण्याची सावियो यांनी जय्यत तयारी सुरू ठेवली आहे. त्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी डावलली नाही म्हणजे झाले. शेवटी हे राजकारण आहे, कधी काय होणार? हे सांगताही येत नाही म्हणा.

पालिकेसाठी भाजपची बैठक

मडगाव भाजप मंडळाची हल्लीच एक बैठक झाली. या बैठकीत मडगाव पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली. पण तेथे भाजपचे जुने कार्यकर्ते केवळ बोटावर मोजण्या इतपत व कॉँग्रेसमधून आलेल्यांची संख्या अधिक होती. आता नेमके किती विद्यमान नगरसेवक उपस्थित होते याची माहिती मिळू शकली नाही. तरी बैठकीत जे काही निर्णय घेतले गेले, त्यात नगरपालिका भाजपच्याच हातात असावी, त्यासाठी डावपेच आखणे, मडगावमधील ११ व फातोर्डातील सुद्धा ११ प्रभाग जिंकण्यासाठी प्रयत्न करणे, आमदार ठरवील, तो उमेदवार इत्यादींचा समावेश होता. तात्पर्य काय तर निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू. मग विरोधक आहेत कुठे? यावर चर्चा रंगणार असे दिसते.

युरी करणार धमाका?

जे कराल, ते धडाक्यात करा, जे जनतेच्या लक्षात राहील व जनता आपल्याला पुन्हा निवडून देणार, हे गणित सगळ्या राजकारण्यांना चांगले माहीत आहे. कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव याच मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. आलेमाव यांचे वडील ज्योकिम आलेमाव दोन टर्म आमदार होते. आता युरीलाही कुंकळ्ळीचे मतदार आणखी एक संधी देणार असा विश्वास युरी समर्थकांना आहे. मात्र युरी विरोधक युरीला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. याला उत्तर म्हणून पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर युरी म्हणे मतदारसंघात धमाका करणार आहेत. आता पाहूया युरी काय धमाका करतात व विरोधकांना थंड करतात, की विरोधकांना आणखी एक संधी देतात.

कुंकळ्ळीत युरी विरोधक एकत्र?

‘एकीत बळ असते’ ही बोध कथा आपण लहानपणी ऐकली असणार भाजपाला हरविण्यासाठी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव ग्रॅण्ड ऑपोजीशन एलायन्स (गोवा) बॅनर खाली सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र युरी आलेमाव यांच्या कुंकळ्ळी मतदारसंघात युरी यांना पराभूत करण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक एकत्र येत असल्याचे संकेत मिळत आहेत. कुंकळ्ळी बाजारात युरी विरोधात असलेल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी ख्रिस्ती बांधवांच्या ईस्टर संडेच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. डॉ. जॉर्सन फर्नाडीस, माजी आमदार क्लाफास डायस, काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते एल्विस गोम्स, सेवा निवृत्त पोलिस अधीक्षक सेमी तवारीस व आम आदमी पक्षाचे प्रशांत नाईक यांनी एकत्रित आपले फोटो घालून ईस्टर संडे सणाच्या शुभेच्छा मतदारांना खास बॅनर घालून दिल्या आहेत. बॅनरवरील ऐक्य प्रत्यक्षात कितपत राहते? हे पहावे लागेल. या बॅनरवर युरी समर्थकांचा ‘शेर अकेला आता है, भेडीये झुंड में है। असा शेरा लक्ष वेधून घेत आहे. ∙∙

प्रतिमाचे सोशलवर्क?

राजकारणी ते सामाजिक कार्यकर्ता असा प्रतिमा कुतिन्हो यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. गुडफ्रायडेच्या दिवशी मध्यरात्री एका लैंगिक शोषण प्रकरणी त्यांनी मायणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनीही लागलीच कारवाई करून संशयिताला गजाआड केले. या कामाबद्दल प्रतिमा मॅडमचे निश्चित कौतुक केले पाहिजे. मात्र अल्पवयीनावर झालेल्या गुन्ह्यासंबंधी सर्व माहिती उघड करण्यास कायद्याने बंदी आहे. प्रतिमा या स्वतः वकील आहेत. कायद्याचे शिक्षण घेऊनही त्यांना या गोष्टी कशा कळत नाहीत. प्रतिमा मॅडम तुमचे काम चांगले आहे, तरीही  सोशल वर्क करताना कायद्याचे भान ठेवा म्हणजे झाले, असे आता पोलिस खाजगीत बोलतात बरे का?

भंडारी समाजाची शिष्टाई!

फोंडा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे, म्हणून सत्ताधारी विविध ट्रिक्स आणि खेळी खेळत आहे. फोंड्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दादा ऊर्फ व्यंकटेश नाईक यांचे निवडणूक जाहीर होताच तळ्यात मळ्यात होते, पण भाजपवाल्यानी अखेर दादाला जवळ केल्याने रितेशची बाजू भक्कम झाली आहे. भंडारी समाजाची शिष्टाई अखेर सफल ठरली म्हणायची.

वडापावच्या प्रेमात ठाकरे!

महाराष्ट्रात वडा-पाव हा खाद्यपदार्थ प्रख्यात आहे. मुंबईत तर वडा-पावविषयी काही बोलूच नये, हे जणू येथील महत्त्वाचा अन्नघटकच. ज्याप्रमाणे मुंबई-पुण्यातील वडापाव फेमस आहेत, त्याची अनेक राजकीय नेते वेगवगेळ्या व्यासपीठावरून जाहीरपणे उल्लेखही करीत असतात. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी फोंड्यातील प्रचारात वडापावच्या गाडीवर वडापावचा आस्वाद घेतला. त्यांच्याबरोबर सर्व राजकीय नेत्यांनी वडा-पावच्या गाडीवरील वडापाववर ताव मारला. या सर्वांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच अनुषंगाने ठाकरे यांना एका पत्रकाराने गोव्यातील वडापावविषयी विचारणा केली असता, आपण मुंबई-पुण्याचे वडापाव खाल्लेले आहेत. पण गोव्यातील वडापाव वेगळाच आहे, असे त्यांचे मिश्किल हास्य देत दिलेले उत्तर. त्यामुळे ठाकरेंना येथील वडापावची चव नक्कीच रुचली असावी हे नक्की.

भाटीकर मान्‍य नव्‍हते?

फोंडा पोटनिवडणुकीच्‍या प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्‍यामुळे भाजपने रितेश नाईक यांच्‍या प्रचारास आणखी गती दिली असून महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री तथा गत विधानसभा निवडणुकीतील भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्‍या सभेचेही भाजपने आयोजन केले आहे. दुसरीकडे, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक तळागाळापर्यंत पोहोचून रितेश यांच्‍या प्रचारासाठी कोपरा बैठका घेत आहेत. त्‍याचवेळी रितेश यांचे प्रतिस्‍पर्धी असलेल्‍या केतन भाटीकर यांच्‍या प्रचारात मात्र काँग्रेस नेते कमी पडत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येत आहे. प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर वगळता भाटीकर यांच्‍या प्रचाराकडे काँग्रेसच्‍या इतर नेत्‍यांनी मात्र पाठ फिरवल्‍याने त्‍यांना भाटीकर मान्‍यच नव्‍हते का? असा प्रश्‍‍न आता काँग्रेसचे मतदारच विचारत आहेत.

वातावरण तापले!

फोंड्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप काँग्रेस आणि आपकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यासाठी सोशल मिडियाचा वापर करण्यात येत आहे. संगणकावर काहीही करता येत असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन विशेषतः भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या ''इमेजिस'' डॅमेज करण्याचा प्रयत्न होत आहे. आता हा प्रकार मतदार किती मनावर घेतात त्यावर काही प्रमाणात अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली-कातरवाडा रस्ता वाद चिघळणार, ग्रामस्थ संतप्त; रस्त्यासाठी जमीन देण्यास गावकरांचा ठाम नकार

Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

School textbook shortage: नववीपासूनची पुस्तके अनुपलब्ध; विद्यार्थी, पालक चिंतेत; चौकशीसाठी दुकानांवर गर्दी

Omkar Elephant: ओंकार हत्ती पुन्हा गोव्यात, बंदोबस्त करणार कोण? गोवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा प्रस्ताव नेतर्डेवासीयांनी धुडकावला

युरोपमधून कुरियरने गोव्यात ड्रग्स; जेलमधील पेडलर्सचा खुबीने वापर, गोव्यातील काही टॅक्‍सीचालकही होते सूत्रधाराच्या पे-रोलवर

SCROLL FOR NEXT