Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: युरीवर भरोसा नाही काय?

Khari Kujbuj Political Satire: निवडणुका जवळ आल्यामुळे जनतेचा व कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यावरच विश्वास कमी झाला की काय? अशी शंका येऊ लागली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

युरीवर भरोसा नाही काय?

निवडणुका जवळ आल्यामुळे जनतेचा व कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यावरच विश्वास कमी झाला की काय? अशी शंका येऊ लागली आहे. कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या समर्थकांना कुंकळ्ळीत चोरांची भीती वाटते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व जिथे जंक्शन आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा मागणीचे निवेदन युरी समर्थकांनी कुंकळ्ळी पोलिसांना दिले आहे. आता आमदार युरी आलेमाव यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी थेट बोलून गस्त वाढविण्याबाबत कळविले असते. तसेच मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची जबाबदारीही आमदाराने घ्यायची असते. मात्र, युरी आलेमाव समर्थक थेट पोलिस स्थानकावर गेले याचा अर्थ आमदार युरींचा मतदारसंघावर वचक राहिला नाही असाच होतो. युरी आलेमाव समर्थकांना युरीवर विश्‍वास राहिला नाही का? असा प्रश्न आता विरोधक विचारायला लागले आहेत.

हा पोरखेळ म्हणायचा का?

गोवा फॉरवर्डने आपल्या कार्यकारिणीत संयुक्त सचिव म्हणून नियुक्त केलेल्या दत्तराज राऊत देसाई याच्या पक्षप्रवेशानंतर केवळ एका महिन्यात त्याच्या हातात नारळ देऊन निरोप दिल्यानंतर तो सगळीकडे चर्चेचा विषय होणे साहजिकच होते. मुळात दत्तराजसारख्या वादग्रस्त युवकाला गोवा फॉरवर्ड पक्षात घेऊन कोण आला? पक्षप्रवेशानंतर लगेच त्याची वर्णी पक्ष कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या पदावर कशी झाली आणि अवघ्या एका महिन्यात असे काय झाले की हा दत्तराज गोवा फॉरवर्डला डोईजड झाला? एका बाजूने गोव्याला पर्याय देण्याची भाषा करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षात सध्या हा जो काय तमाशा झाला त्याला कारणीभूत कोण होते? की या पक्षात जे काय सुरू आहे त्याला पोरखेळ म्हणायचे का? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

सक्षम नेतृत्वाचा अभाव

भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी गोवेकर मागणी करत असताना सर्व विरोधकांची एकी होणे अशक्य, हे आता स्पष्ट झाले आहे. याला जबाबदार काँग्रेस पक्षाला धरायचे की अन्य कुणाला, हा खरा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, सक्षम नेतृत्वाच्या अभावी विरोधकांची ही गत झाली आहे. गिरीश चोडणकर यांनी बोडगेश्वराच्या देवळात बोलावलेल्या बैठकीला केवळ मूठभर लोकच उपस्थित होते. यावरून भंडारी समाजाला काँग्रेस फारसा आकर्षित करू शकलेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे गिरीश चोडणकर काँग्रेसला खरेच सक्षम नेतृत्व देऊ शकतील का? हाच खरा लाखमोलाचा प्रश्न आहे.

भाजपमय बालाजी

निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना सर्व इच्छुक उमेदवारांनी चतुर्थीचे निमित्त साधून लोकांना शुभेच्छा देणारे आपले पोस्टर सगळीकडे लावले आहेत. धारबांदोडाचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच बालाजी गावस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या छब्या असलेले आपले शुभेच्छा फलक संपूर्ण सावर्डे मतदारसंघात लावून एक मोठा बार उडवून दिला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत बालाजी गावस हे ‘मगो’च्या उमेदवारीवर सावर्डेतून उभे राहिले होते. यावेळी ते पूर्णतः भाजपमय झाल्याचे दिसत आहेत. सावर्डेच्या भाजप उमेदवारीवर बालाजी यांनीही दावा केला आहे.

कौतुकाचा वर्षाव, आता टीकेच्या सरी!

पर्वरीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याने श्रेयाच्या फुलांचा वर्षाव अनुभवणाऱ्या सरकारला उन्नत मार्ग खुला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी झालेल्या भीषण अपघाताने धक्काच दिला. दोघांचा जीव गेल्याने समाजमाध्यमांवर कौतुकाची जागा टीकेने घेतली आहे. मार्ग खुला करताना गाजावाजा झाला, आता सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला जाब द्यावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्याचा आनंद क्षणभर टिकला. मात्र, अपघाताने ‘उन्नत’ मार्गावरील व्यवस्थेची कसोटीच सुरू केली आहे. श्रेय घेण्याची घाई झाली; पण सुरक्षिततेचा हिशेब कोण देणार?

‘कलम ३९ अ’ची चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नगरनियोजन कायद्याच्या ‘कलम ३९ अ’वर तोडगा काढू, असे सांगितल्याने तो शनिवारी चर्चेचा विषय ठरला. हे खाते मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे आहे आणि त्यांनी हे खाते आपल्याला पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे वारंवार सांगितले आहे. गेल्या चार वर्षांत या खात्याच्या कारभारावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे कधी दिसले नाही. त्यामुळे आतातरी कारवाईसाठी पक्षश्रेष्ठींची परवानगी मिळणार का? याविषयीचे कुतूहल शनिवारच्या चर्चेत होते. या कलमावरून झालेल्या जनभावनेचा फायदा घेण्यास विरोधी कॉंग्रेस कमी पडली असताना आणि गोवा उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीवरून महिला खूश असताना तरी ‘कलम ३९ अ’बाबत कठोर निर्णय घेणे शक्य होईल का? असा चर्चेचा सूर होता.

मुख्यमंत्रीच झाले छायाचित्रकार!

मुरगावात महिला स्वयंसाहाय्य गटांनी आयोजित केलेल्या चतुर्थी बाजाराला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली असता महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. मोबाईल पुढे करून ‘एक फोटो काढा ना!’ अशी विनंती करण्याची वेळ आली. एका महिलेने प्रयत्नही करून पाहिला; पण छायाचित्र काही म्हणावे तसे टिपले गेले नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांनीच मोबाईल हातात घेतला आणि महिलांसोबत स्वतः सेल्फी टिपली. त्यामुळे बाजारातील खरेदीसोबत ‘मुख्यमंत्री सेल्फी’चीही आठवण महिलांच्या गाठीशी पडली. सरकारी कार्यक्रमातला हा क्षण मात्र काहीसा घरगुतीच ठरला- मुख्यमंत्री आणि महिला स्वयंसाहाय्य गट यांच्यातील ‘सिस्टरली बॉन्डिंग’ कॅमेऱ्यात बंदिस्त झाले.

जबाबदारी जनतेवरच

राजकारण तापलेय आणि ते तापतच राहावे, यासाठी राजकीय नेतेही चांगलेच सज्ज झाले आहेत; कारण राजकारणाची ही ‘गणिते’ नेत्यांना चांगलीच माहिती असतात- कधी कोणाची बेरीज करायची, कोणाची वजाबाकी करायची आणि गरज पडली तर कोणाला गुणाकारात घ्यायचे, हे त्यांना बरोबर ठाऊक असते; पण खरी अडचण सामान्य जनतेची आहे. कारण या राजकीय गणिताचा अभ्यासक्रम जनतेला कुणी शिकवतच नाही. निवडणुकीच्या वेळी मात्र सगळे नेते आपापल्या पद्धतीने ‘गणित’ समजावून सांगायला येतात. कुणी विकासाची बेरीज दाखवतो, कुणी योजनांचा गुणाकार, तर कुणी विरोधकांची वजाबाकी करण्यातच धन्यता मानतो. आता या सगळ्या गणितात सामान्य माणसाचा ‘बळी’ जाऊ नये, एवढीच काळजी घ्यायची. आपल्या हितासाठी नेमके कोण काम करणार आणि कोण फक्त राजकीय गणित मांडणार, हे ओळखण्याची जबाबदारी मात्र जनतेवरच येणार आहे.

तुमच्या खात्यात पैसे आले का?

सरकारने गोवा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर कालपासून रक्कम जमा करण्यास सुरवात केली आहे; परंतु अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांत असून रक्कम जमा झालेल्यांची संख्‍या हजारांत आहे. त्यामुळे आमच्या खात्यात कधी रक्कम येणार याची चिंता अनेकांना लागली आहे. चतुर्थीपूर्वी जर रक्कम मिळाली असती तर चतुर्थीत खर्चाला अधिक पैसे मिळाले असते, अशी चर्चा असून अनेकजण एकमेकांना उज्ज्वला योजनेची रक्कम खात्यात जमा झाली का? याची विचारणा करताना दिसत आहेत.

कार्यालय नवे; बोधचिन्ह जुने

‘रिव्होल्युशनरी गोवन्स’ पक्षाच्या उभ्या फुटीनंतर आमदार वीरेश बोरकर यांच्यासोबतच अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नव्याने पक्षाची उभारणी करण्यास सुरवात केली आहे. ‘आरजी’ची नव्याने कार्यकारिणी स्वीकारल्यानंतर आता नव्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. या कार्यालयात बोधचिन्ह मात्र पक्षाच्या सुरवातीला ज्या रंगात होते ते स्वीकारण्यात आले आहे. पिवळा, काळा आणि पांढरा रंग असलेले बोधचिन्ह पक्षासाठी हितकारी असल्याचे बोरकर सांगतात. आता त्यांना हे कोणत्या पंडिताने की आणखी कोणी सांगितले, हे बोरकरच जाणोत; परंतु एकंदरीत शास्त्र, रंग आणि मुहूर्त राजकारण्यांसाठी महत्त्वाचा असतो, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

ते आता जिंकू शकत नाहीत?

म्हापसा मतदारसंघात आगामी विधानसभेची चर्चा सुरू झाली असून इच्छुकांची मोर्चेबांधणी वेग घेत आहे. माजी नगरसेविका कोमल डिसोझा यांनी भाजप कार्यकर्ते मयूर सावकार यांना पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या कोमल यांनी, म्हापशाच्या विकासासाठीच सावकारांना साथ देत असल्याचे म्हटले. गेल्या निवडणुकीत सुधीर कांदोळकरांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या कोमल यांनी आता थेट त्यांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील दोन निवडणुकांत जे जोशुआ डिसोझा यांना पराभूत करू शकले नाहीत, ते सुधीरभाऊ आता तरी कसे जिंकणार? असा खोचक टोला त्यांनी लगावला. निष्ठा बदलत कोमल यांनी केलेला हा थेट वार कांदोळकरांच्या जिव्हारी नक्कीच लागला असावा.

राजेश वेरेकर फर्स्ट...

मेस्तवाडा-कुर्टीतील गणेश विसर्जन स्थळातील अनागोंदी आणि धोकादायक स्थितीवर काँग्रेसचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर यांनी सर्वांत आधी आवाज उठवला. त्यानंतर मग सगळे जागे झाले. म्हणूनच तर राजेश फर्स्ट असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. राजेश वेरेकर यांनी आवाज उठवताना मूर्तीचे विसर्जन करताना किती धोकादायक आहे, ते माध्यमांना सविस्तरपणे सांगितले आणि किती खर्च येणार तेही स्पष्ट केले. राजेश वेरेकर यांनी झोपलेल्या प्रशासनाला जाग आणल्यानंतर या स्थळाची जलस्रोत खात्यातर्फे डागडुजी करण्यात आली; पण तीही गडबडीने. डागडुजी केली खरी; पण धोका तर आहेच की... खुद्द राजेश वेरेकर यांनी ही बाब संबंधितांच्या नजरेस आणल्यानंतर पुन्हा एकदा झोपी गेलेले खाते जागे झाले. केवळ पंधरा लाखांचा प्रश्‍न; पण सत्ताधाऱ्यांना बेरजेचे नव्हे तर लोकांच्या गरजेचे गणित कसे काय बुवा कळत नाही.

आमदारकीचे वेध!

आमदारकीच्या शर्यतीत असलेले राजकारणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू देण्यात व्यस्त आहेत. सरकार ज्याच्या हाती आहे ते सत्ताधारी मंत्री सरकारी योजनाची खैरात वाटायला लागले आहेत. सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता आमदारकी मिळविण्यासाठी धडपडत असलेले उत्तम पार्सेकर सध्या आपल्या मतदारसंघात स्वखर्चाने विविध सुविधा उपलब्ध करून द्यायला लागले आहेत. पार्सेकरांनी प्रत्येक कुटुंबाला मोफत कडधान्ये व चतुर्थीला लागणारे साहित्य वाटण्यात सुरवात केली आहे. मतदारांना खुश केल्याशिवाय आमदार बनणे अशक्य, हे उत्तम पार्सेकर उत्तमरीत्या समजले असणारच!

वरातीमागून घोडे!

चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर आली असून गणपती चित्रशाळांमधील बहुतांश मूर्ती रंगरंगोटी करून तयार झाल्या आहेत. काही मूर्ती भाविकांच्या घरीही पोहोचल्या आहेत. अशा वेळी आमदार तथा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी मूर्तिकारांना मूर्ती रंगविण्याची यंत्रे (कॉम्प्रेसर) वाटपाचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले. त्यामुळे पेडण्यात या उपक्रमाची चर्चा रंगली असून, ‘वरातीमागून घोडे’ की ‘देवळा फाटल्यान गाऱ्हाणे?’ असा सवाल केला जात आहे. गणपती घरी गेल्यानंतर रंगकामाचे साधन वाटप म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपणच की निवडणुकीची तयारी, अशी चर्चाही सुरू आहे.

एक नवा पायंडा

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे सांगे मतदारसंघातील रिवण गावातील उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखविले. या शाळेत गेल्या पाच वर्षांपासून गणेश चतुर्थीचा बाजार भरविला जातो. शाळेतील विद्यार्थी स्वतः हा बाजार भरवतात. या बाजारात गणेश चतुर्थीला लागणारे माटोळी साहित्य व गावात मिळणाऱ्या फळभाज्या विक्रीस ठेवल्या जातात. यंदा हा ‘बाजार डे’ शनिवारी उत्कर्ष विद्यालयाच्या पटांगणात आयोजित केला होता. या ‘बाजार डे’ला स्थानिक नागरिकांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बाजारात सुमारे पन्नास स्टॉल टाकण्यात आले होते. दोन तासांत शाळकरी मुलांनी आपले सगळे साहित्य खपविले आणि आपली चतुर्थी फुलविली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शाळा व्यवस्थापनाने खरोखरच अनोखा उपक्रम राबवून एक नवा पायंडा टाकला, असेच म्हणावे लागेल.

दामूंचे विकासकाम

फातोर्ड्यात जो विकास झाला तो केवळ आपण आमदार असताना, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सांगतात. रवींद्र भवन, जिल्हा प्रशासन इमारत, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, ‘एसजीपीडीए’ मार्केट, रस्त्यांचे रुंदीकरण अशी मोठी यादी ते सांगतात. यात तथ्य आहे. आता मात्र जो विकास झाला तो इमारती उभ्या करण्याचा. त्यासाठी शेतजमीन, पाण्याचे स्रोत बुजवण्यात आल्याचा आरोप ते करतात. तसेच इमारतींना ३००-३०० एफएआर देण्यात आले आहेत, असेही ते सांगतात. आपण केलेला विकास लोकांच्या नजरेत गेला नाही याला कारण देताना ते सोशल मीडियाला दोष देतात. आपण आमदार होतो तेव्हा सोशल मीडियाचा एवढा मोठा गाजावाजा नव्हता; पण प्रश्न असा आहे की, सरकार कोणाचे आहे? इमारतींना ‘एफएआर’ वाढवून कोणी दिला? दामूंचे सरकार असल्याने त्यांनी त्याची चौकशी करावी, असे काही लोक बोलू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

Goa Politics:गोवा फॉरवर्डला 'आप'चा हात? केजरीवालांच्या 'मोठ्या घोषणे’कडे लक्ष; 2027 साठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी

US Open Final 2026: एलेना रिबाकिना बनली नवी 'चॅम्पियन'! जागतिक नंबर 1 सबालेंकाचा पराभव करत जिंकला पहिला यूएस ओपन ताज; स्टेफी ग्राफचा मोडला रेकॉर्ड

Porvorim Road Accident: उन्नत मार्ग खुला होताच पहिला भीषण अपघात; पर्वरीत दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर! लेन बदलण्याच्या धोक्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT