

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात युती होण्याचे संकेत आज स्पष्टपणे मिळाले. कारण, ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारी गोव्यात दाखल झाल्यानंतर रविवारी दुपारी ३ वाजता आपण मोठी राजकीय घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, गोवा फॉरवर्डने युतीबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांना दिले आहेत.
दोन मोठ्या पक्षांना गोव्यातील जनता कंटाळली असून ते चांगला पर्याय शोधत आहेत, असे केजरीवाल यांनी गोव्यात दाखल होताच सांगितले. त्यामुळे त्यांच्या रविवारच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या चिन्हांसह महामार्गांवर झळकलेल्या फलकांमुळे दोन्ही पक्ष विधानसभेसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. ‘तिसऱ्यांदा त्यांना तुम्हाला फसवू देऊ नका’, असा संदेश या फलकांवर देण्यात आला. मात्र, हे फलक लावण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
केजरीवाल यांनी शनिवारी सकाळी समाजमाध्यमावर ‘गोव्यात जात असून एक मोठी घोषणा करणार आहे’, असे सूचित केले होते. रविवारी केजरीवाल हे पत्रकार परिषद घेणार असून त्यावेळी ‘आप’ आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे गोवा फॉरवर्डच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. ही युती भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून स्वतंत्र अशी बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेस आघाडी असेल, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, गोवा फॉरवर्ड, ‘आप’ आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षांनी युती/आघाडीसाठी दरवाजे खुले केले आहेत. काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत वरिष्ठ पातळीवर आघाडीच्या चर्चा सुरू असल्याचे नमूद केले.
फॉरवर्ड देणार संयुक्त पर्याय
गोवा फॉरवर्डच्या राज्य कार्यकारिणीची शनिवारी बैठक झाली. त्यात भाजपचा पराभव करण्यासाठी समान विचारांच्या धर्मनिरपेक्ष राजकीय शक्तींशी तातडीने आघाडी करण्याच्या दिशेने पुढे जाण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. ‘गोवा फर्स्ट’ म्हणजेच ‘सर्वप्रथम गोवा’ हा आपला स्पष्ट संदेश असल्याचे पक्षाने समाजमाध्यमावरील संदेशातून म्हटले आहे. ‘पक्ष, राजकारण आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांपेक्षा गोवा प्रथम’, अशी भूमिका मांडताना गोवा फॉरवर्डने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना एक संयुक्त पर्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
फॉरवर्डसोबत चर्चा : गिरीश
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा फॉरवर्डसोबत काँग्रेसची युतीबाबतची चर्चा अद्याप सुरू असल्याचा दावा केला. गोवा फॉरवर्ड हा २०२२ पासून काँग्रेसचा मित्रपक्ष असून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
काँग्रेस-आरजीचे एकमत
दोनापावला येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये रात्री ११ वाजता झालेल्या काँग्रेस व आरजीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले. पुढील बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. आज तीन तास चाललेल्या बैठकीत फुटीरांना पक्षप्रवेश देऊ नये, यावर मतैक्य झाल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व आमदार वीरेश बोरकर यांनी बैठकीनंतर सांगितले.
नवे समीकरण आकारास
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. मात्र, आम आदमी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. तर आम आदमी पक्षाचे वेन्झी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा हे आमदार आहेत. २०२७ च्या निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसमध्ये यापूर्वीही आघाडीबाबत चर्चा झाली होती. मात्र, काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत गोवा फॉरवर्डने ही चर्चा काही काळ थांबवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.