

Sikh Bus Driver Assaulted in Britain: ब्रिटनच्या टेलफोर्ड शहरातील मेडलेच्या कोर्ट स्ट्रीट परिसरात एक अत्यंत थरारक आणि संतापजनक घटना समोर आली. शुक्रवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने 'ट्रॅवल टेलफोर्ड'च्या सिंगल डेकर बसमध्ये ड्यूटीवर असलेल्या एका शीख बस चालकावर जीवघेणा हल्ला केला आणि बस हायजॅक केली. या भयंकर प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी किंचाळू लागले.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात आरोपी बसच्या केबिनमध्ये घुसून चालकाला मारहाण करताना आणि घाबरलेला चालक प्रवाशांकडे फोन मागून पोलिसांना बोलावण्याची विनंती करताना स्पष्ट दिसत आहे. प्रवाशांनी आणि एका महिलेने चालकाला सोडण्यासाठी हल्लेखोराला वारंवार विनवण्या केल्या, मात्र आरोपीने कोणाचेही ऐकले नाही.
हल्लेखोराने बसची तिकीट मशीन थेट चालकाच्या तोंडावर भिरकावली, शीख चालकाची दाढी ओढली आणि त्याच्या डोक्याला जोरदार टक्कर दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि बस घेऊन पसार झाला. त्याने बस रस्त्यावर चुकीच्या दिशेने भरधाव हाकली आणि वाटेत येणाऱ्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. रस्त्यावरील नागरिक जीव मुठीत धरुन बस थांबवण्यासाठी ओरडत होते. त्याचवेळी या घटनेची माहिती मिळताच मेलिन्सगेट पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करत जिगरबाज मुसद्दीपणा दाखवला.
इमर्जन्सी कॉलवर पहिला फोन आल्यापासून अवघ्या दहा मिनिटांच्या आत पोलिसांनी बसला चोहोबाजूने घेरले आणि या 33 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीवर लूटमार आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. काही सोशल मीडिया हँडल्सवर तो येमेनचा नागरिक असल्याचा दावा केला जात आहे, मात्र पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
या भीषण हल्ल्यात शीख चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, घटनास्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार करुन त्याला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने बसमधील इतर कोणत्याही प्रवाशाला किंवा रस्त्यावर जाणाऱ्यांना कोणत्याही स्वरुपाची गंभीर दुखापत झाली नाही. पोलीस अधीक्षक एडवर्ड हॅंकॉक्स यांनी तात्काळ कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आणि संकटसमयी चालकाला मदत करणाऱ्या प्रवाशांचे आभार मानले.
दरम्यान, शिरोमणी अकाली दलचे वरिष्ठ नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. हा केवळ एका चालकावर झालेला हल्ला नसून शीख धर्मियांच्या पगडी आणि धार्मिक अस्मितेवर झालेला आघात असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ब्रिटिश सरकारने याची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून ब्रिटनमध्ये शीख समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने मांडावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.