केजरीवालांच्या दाव्यावर नागरिकांचा विश्वास!
गेल्या काही दिवसांपासून देशभरासह गोव्यातही साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. साखरेसह इतर जीवनावश्यक वस्तूंचे भावही ऐन गणेश चतुर्थीकाळात वाढल्याने गोमंतकीय जनता त्रस्त झालेली आहे. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी, केंद्र सरकारने २५ लाख टन ऊस इथेनॉलसाठी वळवला, त्यामुळेच साखरेच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा केला आणि नागरिकांनीही त्यावर विश्वास ठेवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे याचा फटका भाजपला बसण्याची आणि फायदा ‘आप’ला मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बांबोळीतील पार्किंग
बांबोळी येथे ‘गोमेकॉ’जवळ बहुमजली पार्किंग व्यवस्था करण्याची सूचना गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने मायकल लोबो यांनी केली आहे. पणजीत बहुमजली पार्किंग आहे. तेथे वाहने ठेवून शहरात वर्तुळाकार फिरणाऱ्या बसमधून लोकांनी पणजी शहरात यावे, असे नियोजन होते. पणजीत विजेवर चालणाऱ्या बस सुरू झाल्या, बहुमजली पार्किंग इमारतही वापरात आणण्यात आली. मात्र, तेथील व्यवस्था व बससेवा याची सांगड न घातल्याने आजही त्या इमारतीचा पहिला व दुसरा मजला विनावापर राहत आहे. बांबोळीत नवी व्यवस्था आकाराला आणण्याआधी पणजीतील व्यवस्थेचा पुरेपूर वापर होतो का, हे पाहणे योग्य ठरणार नाही का?
कुंभारजुवेतील पेच
कुंभारजुवे मतदारसंघातून यंदा आपण निवडणूक लढवणार, असे सिद्धार्थ नाईक यांनी जाहीर केले आहे. त्यांना फेरीबोटीची तिकीट हवी आहे का? अशी खिल्ली विद्यमान आमदार राजेश फळदेसाई यांनी उडवली आहे. नाईक हे भाजपचे प्रवक्ते शिवाय सहावेळा खासदार म्हणून निवडून आलेले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र आहेत. यामुळे नाईक यांनी केलेल्या मी निवडणूक लढवणारच, या घोषणेमुळे त्यांच्या पित्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवारी देण्यासाठीची प्रक्रिया असल्याचे सांगतो आणि दुसरीकडे प्रवक्तेच आपण निवडणूक लढवणार, असे जाहीर करतात, यामुळे नेमके खरे काय? हा प्रश्नच आहे.
वकील पालेकर यांचे भाकित
काँग्रेस नेते अमित पालेकर यांनी रविवारी एक भाकित केले. काही आठवड्यांपूर्वी ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नव्या पक्षाची निर्मिती होत असल्याची मोठी वावडी उठवली गेली होती. विशेष बाब म्हणजे या पक्षाला भाजपच खतपाणी घालत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्या पक्षाचे पुढे काय झाले, कोणास ठाऊक! काँग्रेस नेते पालेकर यांनी आता आणखी एक भाकित केले आहे. त्यांनी गोव्यातील कथित ‘पर्यायी तिसऱ्या आघाडी’बाबत गोमंतकीयांना सावध केले आहे. पालेकर यांच्या मते, भाजपचाच एक फुटीर गट या आघाडीला पाठिंबा देऊ शकतो. त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांशी हातमिळवणीही करू शकतो. यामागे मते विभागणे, निधी मिळवणे आणि गरज पडल्यास भाजपला पाठिंबा देणे, हे उद्देश असू शकतात, असे पालेकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘गोमंतकीयांनो, जागे व्हा; याकडे दुर्लक्ष करू नका... जागृत राहा,’ असे आवाहन पालेकर यांनी केले आहे. आता त्यांचे हे भाकित किती सत्यात उतरते, हे येत्या काही आठवड्यांत दिसून येईलच.
पाटकरांची भेट का?
पूर्वप्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची भेट घेऊन वेतनवाढीच्या मागणीबाबत सहकार्य करण्याची विनंती त्यांना केली. त्याबाबतचे फोटो सोशल मीडियावरून झळकल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एरव्ही, आपल्या मागण्यांसाठी अशा संघटना विरोधी आमदार किंवा पक्षांच्या अध्यक्षांना भेटत असतात. पाटकर आमदारही नाहीत आणि प्रदेशाध्यक्षही. तरीही पूर्वप्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विद्यमान प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याऐवजी पाटकरांची भेट का घेतली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
उद्घाटन करताय; पूल पुन्हा बंद नको!
पर्वरी उड्डाणपूल पुढील महिन्यात खुला करण्याची तयारी जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. त्यात केंद्रीय मंत्रीही फित कापण्यासाठी येणार असल्यामुळे कामाला आता चांगलाच ‘स्पीड’ आला आहे. लोकांनाही पूल लवकर सुरू झालेला आवडेलच; पण उद्घाटनासाठी पूल खुला केल्यानंतर पुन्हा इतर कामांसाठी तो बंद करू नका! कारण यापूर्वी ‘अटल सेतू’चे काम पूर्ण झाल्याचे सांगून तो खुला करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा काही कामांसाठी बंद ठेवण्याची वेळ आली होती. आता पर्वरीच्या पुलाबाबतही अशी वेळ येऊ नये, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे. नाहीतर फित कापताना मंत्री पुढे आणि पूल बंद करताना अधिकारी पुढे, अशी नवी ‘चर्चा’ सुरू होईल!
विजयचा कुशावतीमध्ये संचार
सध्या काँग्रेसबरोबर संबंध बिघडलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने वेगवेगळ्या भागात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून विजय सरदेसाई यांनी ‘जंय गांव थंय हांव’ ही लोकसंपर्क मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत गोवा फॉरवर्ड हा सासष्टीपुरता मर्यादित असलेला पक्ष, असा समज लोकांमध्ये होता; पण सरदेसाई यांनी आता सगळीकडेच फिरायला सुरवात केली असून आतापर्यंत ज्या जिल्ह्यावर त्यांचे दुर्लक्ष होते, त्या कुशावती जिल्ह्यातही संचार वाढविला. काल केपे येथे झालेल्या त्यांच्या या संपर्क अभियानात काँग्रेसचे काही जुने नेते सामील झाले होते. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा हे तसे विजयचे जवळचे मित्र. मात्र आता विजय एल्टनलाही साेडणार नाही की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत वेगळाच निकाल लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पण गावचा विसर पडला नाही...
काहीजण स्वत: मोठे झाल्यावर ज्या गावातून पुढे आले त्या गावाला विसरून जातात. मात्र, काहीजण असे असतात की, त्यांचा संपूर्ण जगात जरी संचार असला तरी आपल्या जन्मगावाला ते कधीच विसरत नाहीत. गोव्याचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद देसाई हे या दुसऱ्या पठडीतले. डॉ. देसाई यांचा जन्म सावर्डेसारख्या काही प्रमाणात मागास असलेल्या गावात झाला. त्यांचे शिक्षणही तिथेच झाले. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडन आणि अमेरिकेला गेले. सध्या त्यांना गोव्यातील निष्णांत हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. डाॅ. देसाई यांचे मडगावात आलिशान सोयी असलेले इस्पितळ आहे; पण अजूनही ते आपल्या सावर्डे गावाला विसरलेले नाहीत. सावर्डे गावात कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो, डॉ. देसाई त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहातात. सावर्डे आणि कुडचडेसाठी त्यांनी कित्येक मोफत वैद्यकीय शिबिरे आयाेजित करून आपणही या गावाचे काही देणे लागतो हे पटवून दिले आहे. रविवारी सावर्डे येथे झालेल्या ज्येष्ठांच्या वॉकेथॉनमध्येही त्यांनी आवर्जून भाग घेतला. आपण विद्यार्थी असताना आंबेउदक ते कुडचडे हे अंतर शाळेत जाताना कितीतरी वेळा चालत पूर्ण केले आहे, ही आठवण सांगायलाही ते विसरलेले नाहीत.
इतर रुग्णालये सुधारणार का?
सरकार गोव्यातील आरोग्य क्षेत्राचा विकास करून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देणार आहे. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, याचवेळी सामान्य नागरिकांच्या मनात एक प्रश्नही उपस्थित होत आहे. मोठ्या रुग्णालयाचा दर्जा वाढवताना जिल्हा पातळीवरील सरकारी इस्पितळांचे काय? प्रत्येक उपचारासाठी नागरिकांना ‘गोमेकॉ’पर्यंत धाव घ्यावी लागू नये, यासाठी जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही दर्जा वाढणे गरजेचे आहे. डॉक्टर, औषधे, तपासणी सुविधा आणि आवश्यक उपचार स्थानिक पातळीवर मिळाले, तर रुग्णांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास दोन्ही वाचतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवांसोबत सरकार प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर रुग्णालयांकडेही तितकेच लक्ष देणार का? असा सवाल आता नागरिकांच्या चर्चेत आहे.
ग्रामसभा महत्त्वाच्या...
गोव्यातील ग्रामसभा ही थेट लोकशाहीचे प्रभावी व्यासपीठ आहे. गावातील विकासकामे, निधीचा वापर, सामाजिक प्रश्न आणि विविध समस्यांवर नागरिक येथे आपली मते मांडतात. चर्चेतून सामूहिक निर्णय घेतल्याने पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा सहभाग वाढतो. ग्रामसभांमध्ये नागरिकांचा वाढता सहभाग ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मात्र, मतभेद असले तरी चर्चा सकारात्मक, तात्त्विक आणि सुसंवादी असावी. आक्रमकता, कटुता व वितंडवाद टाळून गावाच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामसभा अधिक प्रभावी ठरतील..
ऐक्याचे काय झाले?
भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराच्या चरणी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्नी सुनीता यांच्यासह सत्यनारायण महापूजेचे यजमानपद भूषविले. यानिमित्ताने भंडारी समाजातील सर्व पक्षीय नेते एकवटतील, असे चित्र तयार करण्यात येत होते. प्रत्यक्षात नोनू नाईक, सुधीर कांदोळकर, वीरेंद्र शिरोडकर, अमरनाथ पणजीकर असे कॉंग्रेसमध्ये असलेलेच भंडारी समाजातील नेते तेथे दिसून आले. इतर पक्षातील भंडारी समाजातील नेत्यांनी या धार्मिक कृत्यात सहभागी न होऊन काय संदेश द्यायचा तो दिला.
‘ए-आय’ सिग्नलचा ताप
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेरशी चौकात बसवलेला ‘हुशार’ ए-आय सिग्नलच आता वाहनचालकांच्या संयमाची परीक्षा घेत असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. सिग्नलला कृत्रिम बुद्धिमत्ता दिली; पण वाहतूक कोंडी पाहून तो नैसर्गिक बुद्धिमत्तेने कधी वागणार, असा सवाल ते विचारत आहेत. सिग्नलमुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी प्रतीक्षा वाढत असेल, तर या ‘हुशार’ यंत्रणेचा उपयोग नेमका कोणाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोंडी कमी करण्यासाठी आणलेला ‘ए-आय’ सिग्नल जर वाहनांच्या रांगा वाढवण्याचेच काम करत असेल, तर ‘हा सिग्नल नकोच’ हा सूर साहजिकच उमटू लागला आहे. निदान जुना सिग्नल तरी लोकांना इतका वेळ विचार करायला लावत नव्हता!
साळगावात चर्चांना उधाण
सध्या साळगावच्या राजकारणात चांगलीच खलबते सुरू आहेत. माजी मंत्री जयेश साळगावकरांनी भाजपचा राजीनामा दिल्यावर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांच्या या संभाव्य पुनरागमनामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे अगदी साधे आहे, निवडणुकीच्या तोंडावर बाहेरून येणाऱ्या नेत्यांना लगेच उमेदवारी देण्यापेक्षा, वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंतांचा विचार व्हायला हवा. मागच्या निवडणुकीत बाहेरून आलेल्या उमेदवाराला म्हणजे विद्यामन आमदार केदार नाईक यांना संधी देऊन शेवटी काय झाले, हा जुना अनुभवही कार्यकर्ते मांडत आहेत. त्यामुळे ‘आता पक्षांतर करणारे नकोत, आपल्यातल्याच निष्ठावंत चेहऱ्याला संधी द्यावी,’ असा सूर स्थानिक पातळीवर उमटत असून, या संभाव्य प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाऐवजी नाराजीचे वातावरण दिसत आहे.
अन् त्यांनी फेर धरला...
मडगाव पालिकेतर्फे गेल्या शनिवारी वार्षिक श्रीसत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. पूजेचे यजमानपद मुख्याधिकारी मधु नार्वेकर व त्यांच्या सौभाग्यवती यांनी भूषविले. पूजेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भजनी कार्यक्रमही होता. पालिका कर्मचाऱ्यांसह यावेळी मधु सरांनीही फेर धरून टाळ वाजवीत आपल्या देवभक्तीचा प्रत्यय दिला. नार्वेकर बाब हे तसे देवभोळे. मात्र, ते कडक शिस्तीचेही आहेत. त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीने ते दाखवून दिले आहे. त्यामुळेच असावे मडगाव पालिकेतील कामचुकार कर्मचारी काही प्रमाणात का असेना सुधारले आहेत, ही गोष्ट नजरेआड करता येत नाही.
शुद्धलेखनाचे महत्त्व सांगणाऱ्या...
हयातभर मराठी शुद्धलेखन आणि व्याकरण याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या व्युत्पन्न प्राध्यापक यास्मीन शेख यांचे निधन हे सांस्कृतिक प्रांताचे नुकसान. यास्मीन शेख यांची शुद्धलेखनावरची पुस्तके वाचावीत. भानू काळे व दिलीप फलटणकर यांच्यावर यास्मीन मॅडमनी पुत्रवत प्रेम केले. दोघांनी ९९व्या वाढदिनी सुंदर गौरवग्रंथ प्रकाशित केला. त्यात प्रा. यास्मीन यांचेही लेख, भाषणे आहेत. त्यांच्यावर लेख आहेत. प्रा. यास्मीन यांचा साधा, नम्र, निरहंकारी, शांत, गोड स्वभाव लोभस होता. बदलत्या मराठीविषयी, मराठी भाषेच्या सौष्ठवाविषयी त्यांची मते लक्षात घेण्यासारखी आहेत. प्रसारमाध्यमे असो की एक मराठी विषय घेतलेले विज्ञानाचे विद्यार्थी असो, त्यांनी मराठीच्या शुद्धतेकडे कायम आग्रह धरावा व हीच प्रा. यास्मीन शेख यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
‘जीत’वर बायचुंगचे प्रेम!
मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकर यांच्या उदरगत संस्थेच्या विविध उपक्रमांची चर्चा सुरू आहे. कार्निव्हल, महिलांचे विशेष कार्यक्रम असोत किंवा क्रीडा स्पर्धा या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच झालेल्या मांद्रे मर्यादित फुटबॉल स्पर्धेसाठी जीत यांनी भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया याला खास पाहुणा म्हणून आणले. स्पर्धा मतदारसंघापुरती; पण पाहुणा थेट राष्ट्रीय पातळीवरचा! त्यामुळे स्पर्धेलाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. बायचुंगनेही जीतचे तोंडभरून कौतुक केले. आता बायचुंगला मांद्रेत आणण्यामागे केवळ फुटबॉलप्रेम होते की त्यामागे राजकीय ‘गोल’ करण्याचीही रणनीती होती, याची चर्चा सुरू झाली आहे. तसेही, जीत गोल करण्याची संधी सहसा सोडत नाहीत, हे मांद्रेकरांनाही चांगलेच माहीत आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.