Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

Khari Kujbuj Political Satire: ‘छोडो कल की बाते कल की बात पुरानी’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे आजचे भाजपचे नेतृत्व वागायला लागले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

‘छोडो कल की बाते कल की बात पुरानी’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे आजचे भाजपचे नेतृत्व वागायला लागले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एक काळ होता जेव्हा भाजपने ‘पार्टी विथ डीफरन्स’, ‘शिस्तबद्ध पक्ष’ अशी बिरुदावली जोडली होती. भाजपमध्ये तशाप्रकारची शिस्त होतीही. मात्र, काळाप्रमाणे भाजपही बदलला. आज पक्षाचे आमदार व मंत्रीच पार्टी अध्यक्षांना आव्हान देतात. पार्टी अध्यक्षही आपल्याच आमदार-मंत्र्यावर कारवाई करणार, असे इशारे देतात. पक्षाच्या आमदारांना डावलून इतर इच्छुकांशी जवळीक साधतात. आता तर पक्षाचे आमदारच जाहीर टीका करायला लागले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये पहिलीसारखी शिस्त उरली नाही, अशी चर्चा रंगली आहे.

मडकईतील गणेश दर्शन

मडकईत गणेशदर्शनाच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दत्तप्रसाद नाईक यांच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेतले आणि राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहू लागले आहे, याची पुन्हा एकदा चाहूल लागली. कधीकाळी काँग्रेसचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जाणारे दत्तप्रसाद आता काँग्रेसच्या गोटात दिसू लागले आहेत. त्यामुळे टीकेच्या सुरातून समर्थनाच्या तालावर झालेला हा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. चोडणकरांनी त्यांच्या घरी जाऊन गणेशदर्शन घेतल्याने या नव्या राजकीय समीकरणावर जणू शिक्कामोर्तबच झाले. राजकारणात कायमचा मित्र किंवा कायमचा विरोधक नसतो, हे तत्त्व मडकईतील गणेशदर्शनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले. कालपर्यंत ज्यांच्यावर टीकेचे बाण सुटत होते, आज त्याच दारात राजकीय सदिच्छांच्या फुलांचा वर्षाव होताना दिसला!

काब्राल कोणत्या दिशेने?

आजपर्यंत भाजप पक्षाचा आपण एकनिष्ठ सेवक, असे म्हणणाऱ्या नीलेश काब्राल यांनी एका मुलाखतीत कुडचडे मतदारसंघात भाजपने आपल्याला उमेदवारी दिली तरी ती घ्यावी की न घ्यावी याचा आपल्याला विचार करावा लागेल, असे म्हणत भाजप उमेदवारीची आपल्याला गरज नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही या वक्तव्याविरोधात थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप नसेल तर काब्राल जाणार कुणीकडे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी काब्राल विजय सरदेसाई यांना जवळचे, असे सांगितले जायचे; पण विजय सरदेसाई यांनी कुडचडेत आपला उमेदवार म्हणून अमित पाटकर यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अशा परिस्थितीत काब्राल अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार की काँग्रेस त्यांना उमेदवारी देईल? पाहावे लागेल काय होते ते?

महापौरांचा जनजागृतीवर भर

महापौर रोहित मोन्सेरात सध्या शालेय मुलांच्या सुरक्षिततेवर, ज्येष्ठांमध्ये डिजिटल सायबर गुन्ह्यांविषयी जागृतीवर आणि युवकांमध्ये विविध उपक्रम राबविण्याविषयी सतत चर्चा किंवा कार्यक्रम करीत असतात. त्यांनी गुरुवारी एक पोस्ट आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकली आहे. ‘गोवा युथ बिझनेस नेटवर्क’मधील व्यावसायिक आणि उद्योजकांसोबत एक संध्याकाळ त्यांनी घालविल्याने मिळालेला आनंद त्यांनी त्यात व्यक्त केला आहे. या नेटवर्कमुळे संपूर्ण गोव्यातील आणि विविध क्षेत्रांतील व्यक्ती एकत्र येतात. विविध व्यावसायिक क्षेत्रांतील लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या कल्पना, आकांक्षा आणि शक्यतांची एक रंजक झलक या संवादांमधून पाहायला मिळाल्याचे रोहित यांचे म्हणणे आहे. या नेटवर्कमध्ये २५० हून अधिक व्यावसायिक आणि उद्योजक सहभागी झाले होते. गोव्यातील उदयोन्मुख व्यावसायिक आणि उद्योजकांना एकमेकांकडून शिकण्यास आणि नवीन शक्यता शोधण्यास मदत करण्यात अशी व्यासपीठे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा विश्‍वास रोहित यांनी व्यक्त केला.

पोलिसांना आशीर्वाद!

राज्यभर सध्या चतुर्थीचा उत्साह ओसंडून वाहतोय. गणरायाच्या दर्शनासाठी शहरात राहणारे भाविक गावाकडे गेले आणि मागे राहिले ती शहरातील घरे आणि बंगले! त्यामुळे चोरट्यांच्या नजरा आता या घरांवर असतील, अशी भीतीही होतीच; पण यंदा गणरायाच्या कृपेने आणि पोलिसांच्या जागरूकतेने चार दिवसांत चोरीच्या प्रकारांना आळा बसल्याचे चित्र दिसले. त्यामुळे गावाकडे गेलेल्या भाविकांनी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने पोलिसांना आशीर्वाद दिल्यामुळेच अजून चोरी न झाल्याची गमतीशीर चर्चा सध्या सुरू आहे.

बाबाशान - क्लाफास काय करणार?

येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात तिरंगी लढत होणार, हे आता स्पष्ट होत सासष्टी तालुक्यातील ‘डिफेक्टर’ आमदार काय करणार? हा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेस उमेदवारीवर नुवे मतदारसंघातून निवडून आलेले बाबाशान डिसा आणि कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडून आलेले क्लाफास डायस यांनी नंतर काँग्रेस सोडून भाजपला जवळ केल्यानंतर मागच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना घरी पाठविले. आता ते दोघे काय निर्णय घेणार? आणि वेळ्ळी मतदारसंघातील ‘डिफेक्टर’ फिलिप नेरी रॉड्रिग्स हे कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील, ते पाहावे लागेल.

वेन्झींचे आव्हान!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी आम आदमी पक्षात कोण होते आणि आता ते कुठे आहेत? याचा लेखाजोखा तोंडपाठ केला आहे. लोकसभा निवडणुकीत ‘आप’चे कोण उमेदवार होते यांची नावे तरी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना माहीत आहेत काय? असा सवाल त्यांनी केला. गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ची युती झाली, त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून चोडणकरांना या युतीवर टीका करणे भाग आहेच, त्यांनी ती किमया साधली. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रेयवर ‘आप’कडून त्वरित काही प्रतिक्रिया आली नाही किंवा त्याच्या खोलवर जाणारी टीकाही कोणत्या नेत्याने केली नाही. मात्र, ‘आप’चे नेते तथा आमदार वेन्झी व्हिएगस यांनी व्हिडिओ काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसवर टीका केली. त्यांनी काँग्रेस नेत्यांना बाणावलीतील विकास आणि तीन आमदारांच्या मतदारसंघांतील विकासावर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. आता हे आव्हान काँग्रेसपैकी कोणता आमदार पेलतोय की चोडणकरांनाच ते पेलावे लागतेय, हे येत्या काळात कळेलच.

कुंकळ्ळी भाजप मंडळ व गिनीपिग!

‘‘आम्हाला ‘गिनीपिग’ करू नका,’’ अशी आर्त हाक कुंकळ्ळी मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पक्षनेतृत्वाला मारायला लागले आहेत. याला कारण भाजप नेतृत्व कुंकळ्ळी मतदारसंघाला दुय्यम मानत असल्याची भावना काही निष्ठावान कार्यकर्तेच व्यक्त करतात. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजप नेतृत्व प्रयोग करते. स्थानिक नेतृत्वाला पुढे काढण्याचे धाडस दाखवीत नाही, असा दावा काही कार्यकर्ते करतात. या मतदारसंघातील अल्पसंख्याक भाजपला मतदान करण्यात कचरतात हे माहीत असूनही या मतदारसंघातून एकाला सतत दोन निवडणुकीत उमेदवारी दिली. एवढेच नव्हे काँग्रेस पक्षातून आलेल्या क्लाफास डायस यांनाही उमेदवारी दिली. आता भाजप मतदारसंघाबाहेरील उमेदवार कुंकळ्ळी मतदारसंघात आयात करण्याचा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. विज्ञानात प्रयोगासाठी ‘गिनी पिग’ नावाच्या लहान जीवाचा वापर केला जातो. तशाप्रकारे कुंकळ्ळीतील भाजप कार्यकर्त्यांना ‘गिनी पिग’ करू नये, अशी भावना काही भाजप कार्यकर्तेच जाहीरपणे व्यक्त करायला लागले आहेत.

तुरुंगातील चौकशीचे पुढे काय होते?

तुरुंगात दोन आरोपींचे भांडण झाले की पोलिस मध्ये पडतात, वातावरण शांत होते आणि मग सुरू होते ‘चौकशी’! आता या चौकशीचीच तुरुंगाबाहेर चर्चा सुरू झाली आहे. कारण, चौकशी होते हे सर्वांना माहीत; पण चौकशीतून निष्पन्न काय होते, कारवाई कुणावर होते आणि कारवाई झाली की नाही, हे कधी कळते का? कारवाई झाली तर त्याची माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचवण्यात अधिकारी तत्पर आणि कारवाई नसेल तर मात्र ‘चौकशी सुरू आहे’ एवढ्यावरच पडदा! त्यामुळे आता लोकांचीही उत्सुकता वाढली आहे. तुरुंगात भांडण झाले की चौकशी होते, हे समजले; पण चौकशीचा निकाल कुठे जातो? याचे उत्तर तुरुंग पोलिस अधीक्षक देतील का, की त्याचीही चौकशीच सुरू राहणार?

सेवेचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या जन्मदिनाचे औचित्य साधून कुडचडेतील ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून ७६० दिवे प्रज्वलित करण्यात आले. मात्र, या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा त्यामागचा सेवेचा संकल्प अधिक लक्षवेधी ठरला. युवकांनी समाजाशी जोडून काम करावे, सामाजिक बांधिलकी जपावी आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्किल इंडिया’ यांसारख्या उपक्रमांचा संदर्भ देत युवकांनी नोकरी शोधण्याबरोबरच रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहनही करण्यात आले. त्यामुळे कुडचडेतील ७६० दिव्यांनी केवळ चौक उजळला नाही, तर सेवाभाव आणि युवकांच्या नव्या संकल्पनांनाही प्रकाश दिला, अशी चर्चा सुरू होती.

गोंधळलेले प्रवासी

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी ‘यात्री सेवा अभियान’ सुरू झाले आणि विमानातून उतरलेल्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देत, गोमंतकीय लोकनृत्यांच्या तालावर स्वागत करण्यात आले. मात्र, या साऱ्या ‘राजेशाही’ स्वागताची कल्पना प्रवाशांना आधीच नसल्याने विमानतळाबाहेर पडताच एवढ्या मोठ्या लवाजम्याने आपले स्वागत होताना पाहून अनेक प्रवासी क्षणभर बावरून गेले. विमानप्रवासाचे तिकीट काढले होते की एखाद्या लग्नाच्या मिरवणुकीत मानाचा पाहुणा म्हणून आलो आहोत, असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. प्रवाशांनी कदाचित विमानतळावर उतरून आपले साहित्य घ्यायचे आणि निघायचे एवढेच ठरवले असावे; पण येथे गुलाबपुष्प, नृत्य आणि स्वागताचा असा सोहळा पाहून त्यांचा ‘आश्चर्याचा धक्का’ मात्र मोफत मिळाला!

रवींचा वारसा रितेशकडे!

फोंड्याच्या गेल्या पोटनिवडणुकीवेळी भाजपने रवीपुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी दिली. आणि ही उमेदवारी सार्थ ठरवताना रितेश यांनी सबंध फोंडा मतदारसंघ पिंजून काढला. प्रचाराला सकाळी सुरवात व्हायची ती रात्री उशिरापर्यंत लोकांच्या भेटीगाठी घेणे, प्रत्यक्ष घरोघरी भेट देणे यावर रितेश नाईक यांनी भर दिला, ज्याचा ‘रिझल्ट’ही त्याकाळी चांगलाच दिसला; पण माशी कुठे तरी शिंकली आणि मतदानाच्या आदल्या दिवशी ही पोटनिवडणूकच रद्द झाली. तरीही रितेश नाईक यांनी न डगमगता लोकांशी संपर्क सुरूच ठेवला. रवी नाईक यांचा वारसा कोण चालवणार? या प्रश्‍नाचे उत्तर रितेश यांनी आपल्या संपर्क मोहिमेतून दिले असल्याच्या प्रतिक्रियाच फोंडावासीयांतून व्यक्त होत आहेत.

तेच बरे होते का?

प्रवेशाकडे अपघातप्रवण बिंदू असताना पर्वरी उन्नत मार्गिका सुरू केली खरी. भीषण अपघात झाला. तत्काळ पाहणी करून बैठक घेऊन दुचाकी वाहनांना मार्गिकेवरून बंदी करण्यात आली. आता दुचाकींची व इतर वाहनांची कोंडी हा सर्व्हिस मार्गावर ताप ठरला आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी ही स्थिती. गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होणार, तेव्हा अनिश्चितता वाढू शकते, अशी भीती पर्वरीवासीयांना ग्रासू लागली आहे. लोकांच्या सुविधेसाठी बऱ्यासाठी रचना करावी आणि नियोजनाअभावी कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ येऊ नये इतकेच.

पोलिसांचा अहंकार!

म्हापशाच्या गांधी चौकात बुधवारी रात्री पोलिसांनी लावलेल्या झिगझॅग बॅरिकेड्समुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर जागा अपुरी पडल्याने एका कंपनीची मोठी बस वळणावर अडकली आणि त्यापाठोपाठ एका रुग्णवाहिकेसह अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बॅरिकेड्स थोडे बाजूला सरकवले असते तर बस लगेच पुढे निघू शकली असती. मात्र, तिथे ड्युटीवर तैनात असलेल्या ‘पीएसआय’ महाशयांचा अहंकार आडवा आला. ‘मी येथे नाकाबंदीसाठी उभा आहे, बॅरिकेड्स हलविणे माझे काम नाही. कंपनीच्या बसवर कंडक्टर असायला हवा होता, मी कशाला हात लावू?’ असा हेकेखोर पवित्रा त्यांनी घेतला. रुग्णवाहिका अडकलेली असतानाही पोलिस जागचे हलले नाहीत. अखेर एका नागरिकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढत मध्यस्थी केली आणि नंतर स्वतः बॅरिकेड्स बाजूला करून रस्ता मोकळा केला. एकंदर घटना पहिली असता, ड्युटीवरील या अधिकाऱ्याचा अहंकार मोठा ठरल्याचे यातून अधोरेखित होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरकारी वसुलीची कथा

मोरंब ऑ ग्रॅण्ड कूळ समितीकडून ४४ लाख ५६ हजार रुपयांची वसुली करण्यासाठी तिसवाडी मामलतदार कार्यालयाने जंगम मालमत्तेचा लिलाव पुकारला. मात्र, लिलावाच्या टेबलावर बोली लावणाऱ्यांपेक्षा खुर्च्यांचीच संख्या अधिक दिसली. दोनवेळा लिलावाची तारीख ठरूनही बोलीदार फिरकले नाहीत आणि अखेर यावेळीही ‘कोणी घेणार आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर शांततेतच मिळाले. त्यामुळे वसुलीच्या सरकारी मोहिमेला पुन्हा एकदा ‘लिलाव तहकूब’चा फलक लावावा लागला. थकबाकीदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी मालमत्ता जप्त झाली, लिलावाच्या नोटिसा निघाल्या, तारखा ठरल्या; पण मालमत्ता घेण्याची वेळ आली तेव्हा बाजारालाच बहुधा या मालमत्तेत काही ‘मूल्य’ दिसले नाही. आता पुढची लिलावाची तारीख जाहीर होईल, पुन्हा नोटीस निघेल आणि पुन्हा बोलीदारांची वाट पाहिली जाईल- फरक एवढाच, सरकारी कागदोपत्री वसुलीची प्रक्रिया सुरू राहील आणि प्रत्यक्षात मात्र खुर्च्या रिकाम्याच राहतील.

ई-गव्हर्नन्सचा ‘ऑफलाइन’ धडा!

ई-गव्हर्नन्सचा गाजावाजा करत सरकारी कामकाज अधिक गतिमान आणि सुलभ करण्याचे दावे केले जात असताना, मडगावातील माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलातील मुख्य संगणक प्रणाली सलग दोन दिवस बंद राहिल्याने नागरिकांना मात्र जुन्याच अडचणींचा सामना करावा लागला. नोंदणी, जमिनीच्या नोंदी आणि प्रमाणित प्रतींसारखी महत्त्वाची कामे ठप्प झाली. आधीच अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांनाही फटका बसला. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांचे शुल्क वसूल करणाऱ्या व्यवस्थेत अशा प्रसंगी पर्यायी सर्व्हर किंवा सक्षम बॅकअप यंत्रणा कितपत तयार आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. तंत्रज्ञानावर अवलंबून व्यवस्था उभी करताना ‘बॅकअप’चा पर्यायही तितकाच सक्षम असणे गरजेचे आहे, अशी चर्चा नागरिंकांत सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Agniveer Job News: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा दिलासा! 4 वर्षांचा कार्यकाळ संपताच हातात असणार दुसरी सरकारी नोकरी; काय आहे नेमका प्लॅन?

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीचा गुंता सुटणार? रविवारी तज्ज्ञांची पाहणी; सोमवारी संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

Horoscope 18 September 2026: शुक्रवारचा ग्रहांचा महासंयोग! 5 राशींना होणार अफाट आर्थिक फायदा; रखडलेली कामे चुटकीसरशी मार्गी लागणार

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

SCROLL FOR NEXT