Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: काँग्रेसमधील तमाशाचे दर्शन!

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसमध्ये जे सुरू आहे, त्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. प्रदेशाध्यक्ष बदलानंतर जे पडसाद उमटत आहेत किंवा पडसाद उमटवण्यासाठी जे घटक कार्यरत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

काँग्रेसमधील तमाशाचे दर्शन!

काँग्रेसमध्ये जे सुरू आहे, त्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. प्रदेशाध्यक्ष बदलानंतर जे पडसाद उमटत आहेत किंवा पडसाद उमटवण्यासाठी जे घटक कार्यरत आहेत, त्यांच्याकडून अशा तमाशाची अपेक्षाही कोणी बाळगली नसणार. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा काँग्रेसच्या समित्यांमध्ये समावेश आहे, पण त्या समित्यांच्या बैठकांचे निमंत्रण त्यांना मिळत नाही, यावरून सध्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांना बालिशपणा सोडा, असे पाटकर यांना का सांगावे लागले आहे, याचे उत्तर दोघांनाच माहीत असणार. के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते येऊन गेले तरी पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या धुसफुशीवर कायमचा तोडगा काढता आला नाही. पण नेत्यांकडून जे काही सुरू आहे, ते पाहता काँग्रेसजणांना पटत नसतानाही त्यावर काही भाष्य करता येत नसल्याचे दुःख वाटत आहे.

श्रेष्ठींनी खरोखरच कान फुंकले काय?

काँग्रेसच्या गोवा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर या आक्रमक नेत्या आहेत. गोव्यात त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. परंतु त्यांनी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्यावर जी पोस्ट केली होती, ती त्यांना मागे का घ्यावी लागली, याचे उत्तर काही मिळू शकले नाही. कदाचित त्या गोव्यात आल्यानंतरच त्यावर काही स्पष्टीकरण देऊ शकतात, असे दिसते. परंतु गोवा रिव्होल्युशनरीच्या नेत्यांबरोबर आघाडीविषयी बैठका झाल्यानंतर गोवा फॉरवर्ड व आम आदमी पक्षाकडे काँग्रेस नेत्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन तात्काळ बदलला होता. परंतु अलीकडे काँग्रेसच्या नेत्यांकडून पुन्हा आघाडीचे दरवाजे खुले असल्याचे सांगणे आणि त्यात या दोन्ही पक्षांनाही हे दरवाजे खुले ठेवल्याचे स्पष्टीकरण देणे म्हणजे कदाचित श्रेष्ठींनी नेत्यांचे कान फुंकले असावेत, म्हणूनच त्यांची भूमिका बदलली असावी, असा संशय येऊ लागला आहे.

काब्रालनी भूमिका बदलली

भाजपने उमेदवारी देऊ केली तर ती घ्यायची की नाही याचा विचार करावा लागेल असे वक्तव्य करून भाजप गोटात बॉम्ब टाकणारे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी काल परत एकदा आपली भूमिका बदलत आपण भाजपपासून दूर गेलेलो नाही, पण काही भाजप नेत्यांकडून आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते त्याविरोधात व्यक्त केलेली ती खंत असा खुलासा केला आहे. काब्राल यांनी भाजप विरोधात ते वक्तव्य केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शुकवारी काब्राल यांनी चतुर्थीच्या निमित्ताने दामू नाईक यांची त्यांच्या फातोर्डा येथील घरी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपली भूमिकाही बदलली. दामूच्या घरी असे काय झाले असेल म्हणून काब्राल यांचे हे मत परिवर्तन झाले? यावर कोण बरे उत्तर देईल?

खरेच कॅप्टन फातोर्ड्यातून?

फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेस आपला उमेदवार उभा करेल आणि काँग्रेसचे या मतदारसंघात कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे संभाव्य उमेदवार असतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले होते, पण काल प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीला कॅप्टन गैरहजर राहिले. या बैठकीला अमित पाटकर हेही गैरहजर राहिले होते. हे चित्र पाहिल्यास कॅप्टन खरेच विजय विरोधात फातोर्ड्यात उभे राहतील, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. काँग्रेस पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यातच अस्वस्थतेची खरी गोम आहे

असाही धिंगाणा!

पाच दिवसांच्या गणपतीला काल म्हापसा शहरात भावपूर्ण निरोप देण्यात आला; पण विसर्जन मिरवणुकीत काही अतिउत्साही मंडळींनी कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डिजे लावून धिंगाणा घातला. रात्री अकरानंतरही हा दणदणाट सुरूच राहिल्याने पोलिसांनी त्यांना आवाज कमी करण्याची तंबी दिली. विशेष म्हणजे, यात पुढाकार घेणारी व्यक्ती एका लोकप्रतिनिधीकडे कामाला आहे. पोलिस पाठ फिरवून निघून जाताच त्यांनी पुन्हा डिजेचा आवाज वाढवला. त्यामुळे पोलिसांना परत यावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांनी सज्जड दम भरला, डिजेचा आवाज बंद करणार की उचलून ठाण्यात नेऊ? असा खाकीचा हिसका दाखवताच डिजे लगेच शांत झाला. राजकीय वरदहस्त असल्यावर कायद्याची भीती कशी उरत नाही, याचेच हे उत्तम उदाहरण होते. लोकप्रतिनिधींच्या नावाखाली अशी अरेरावी करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच वेसण घालणार कोण? हाच खरा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भेटीगाठी अन् राजनीती

राज्यात चतुर्थीच्या काळात प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवार आणि हितचिंतकाच्या घरी भेट देत असतो, मग तो सर्वसामान्य नागरिक असो किंवा राजकारणी. परंतु अधिक चर्चा सत्ता पक्षातील आणि विरोधी बाकावरील आमदार कोण कुणाच्या घरी जातात याचीच रंगणे स्वाभाविकच आहे. कारण येत्या काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोणता राजकीय नेता कोणाच्या घरी गेला आणि कोण कुणाच्या घरी आला याचीच चर्चा सध्या अधिक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप नेते एकमेकांच्या घरी भेट देत आहेतच, परंतु नव्या आघाड्या आणि धक्कादायक गणिते मांडण्याच्या तयारीत असलेले विरोधी आमदार कोणाच्या दारात पोहोचतात, यावर देखील जनतेची बारीक नजर आहे. भेटीगाठींमागे देवबाप्पाची भक्ती आहेच, परंतु निवडणुकांची खरी ‘शक्ती’ आणि रणनीती आहे, हे आता ग्रामीण भागातील चावडीवरही उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.

मांद्रेकरही फॉरवर्ड

गणरायाच्या दर्शनासाठी शिवोलीत गेलेल्या विजय सरदेसाईंच्या भेटीने यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय रंगाचीही किनार मिळाली आहे. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या निवासस्थानी सरदेसाईंनी कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांसोबत गणेशोत्सव साजरा केला. भेटीत भक्ती, परंपरा आणि बाप्पाच्या आशीर्वादाच्या गप्पा झाल्या. मात्र, राजकीय वर्तुळात त्यातून वेगळाच प्रसाद वाटला जात आहे. मांद्रेकर ‘फॉरवर्ड’ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बाप्पाच्या दर्शनाला गेले की राजकीय गणितही सोबत न्यावे लागते, असेच या भेटीने दाखवून दिले. आता बाप्पा पावतो की राजकीय ‘फॉरवर्ड’ची चर्चा, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जखम मोठी होऊ नये

गोवा हे जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळ. अनेकदा इथे दिल्लीहून वा इतरत्र शहरातून पर्यटकांची कुटुंबे, विला घरं बुक करून समुद्र किनारी राहायला येतात. आल्यावर त्यांना कळतं, भामट्यांनी ऑनलाईन बुकींगनिशी ठकवलं. ते विला, ते घर तिथं नसतंच. टोप्या घालून जगण्याची ही विकृती वाढतेय. बंगळुरूच्या तीन ग्राहकांच्या बाबतीत फसवणूक झाली. अंजुना, कळंगुट पोलिस ठाण्यांतील फसवणुकीच्या तीन स्वतंत्र प्रकरणांमुळे २ कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी सुरू झाली आहे. सुट्टीच्या पॅकेजसाठी एकत्रितपणे ३.१४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. भुलवण्याची गुंगवण्याची विविध नाटके या बनेलांना बरी जमतात व सुशिक्षित लोकही त्यांच्या गळाला लागतात. गोव्याच्या पर्यटनाचं नाव आहे. अनेक ठिकाणी पर्यटकांना घराच्या टेरेसवरील खोल्यांत वा मोठ्या विलांमध्ये बोर्डींगवजा निवासी सोय केली जाते. कायदेशीर नियमांचं मानदंडांचं पालन झालं का हे वेळोवेळी तपासायला हवं.

सुरक्षिततेच्या नावाने

पर्वरी उन्नत मार्गासाठी तब्बल १२४ कोटी रुपये प्रति किलोमीटरमागे खर्च झाला, तरी सुरक्षेचे प्रश्न कायम असल्याची टीका विरोधी आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली आहे. म्हणजे एवढा मोठा खर्च केल्यानंतर वाहनचालकांना रस्ता मिळाला की ‘सावधगिरीचा धडा’ असा प्रश्न पडावा! कोट्यवधींच्या मार्गावर सुरक्षिततेची हमी मात्र अजूनही शोधावी लागत असेल, तर खर्चाचा हिशेब आणि सुरक्षेचा हिशेब यांची बेरीज जुळवण्याची वेळ आली आहे. उन्नत मार्ग झाला, पण सुरक्षिततेची पातळी अद्याप जमिनीवरच असल्याचे चित्र आहे.

नियमभंग करण्याची सवय

शोभेची, फुलाफळांची रोपे विकणाऱ्या नर्सरींची संख्या झपाट्याने वाढत आहे. गोवा फळ आणि रोपवाटिका (नियमन) कायद्याअंतर्गत या आस्थापनांनी परवाना घेतला आहे की नाही, हे तपासण्यासाठी कृषी विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. रस्त्याच्या कडेला आणि पडीक शेतजमिनींवर नर्सरींचे जाळे विस्तारत आहे. सध्या नियामक चौकटीबाहेर चालणाऱ्या आस्थापनांबाबत तपासणीदरम्यान चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केवळ बार्देश तालुक्यात अधिकाऱ्यांनी आतापर्यंत १७ नोंदणी नसलेल्या नर्सरी शोधून काढल्या आहेत. काहींनी कृषी संचालकांकडे नोंदणी केलेली नाही. काहींचे मालक गोव्याबाहेरील असल्याने देखभालधारक मालकीविषयी माहिती सांगण्यास टाळाटाळ करत आहेत. कृषी खात्याने चाबूक उगारल्याने बेकायदेशीर कृत्यांना चाप व शिस्त लागेल अशी आशा आहे.

अपघातास कारण की...

दाबोळी जंक्शनवर अपघातांची मालिका सुरू असताना रस्त्यावरील दुभाजकांना रंग देण्याची ‘तसदी’ही प्रशासन घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहनचालकांनी रस्ता पाहायचा की रंगहीन दुभाजक ओळखायचा, हा प्रश्नच निर्माण झाला आहे. वाहतूक नियोजनाचा अभाव आणि देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप होत आहे. अपघात झाल्यावर पाहणी, सूचना आणि आश्वासने देण्यापेक्षा दुभाजक आधी रंगवले, वाहतूक व्यवस्था सुधारली आणि सुरक्षितता सुनिश्चित केली तर प्रशासनाचे काम अधिक सोपे होईल.

बाबू कवळेकर काय करणार?

एखादा नेता जनतेच्या नजरेआड जास्त काळ उरला, तर जनता त्या नेत्याला हळूहळू विसरायला लागते. माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी केपे मतदारसंघाचे जवळजवळ वीस वर्षे प्रतिनिधित्व केले. काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करून बाबूंनी उपमुख्यमंत्रिपद मिळविले होते. मात्र, तीनवेळा काँग्रेसच्या पंज्यावर निवडणूक जिंकणारे बाबू भाजपाच्या कमळावर निवडणूक हरले. गेली साडेचार वर्षे आमदार नसतानाही ते बातमीत राहिले. मात्र, केपे मतदारसंघ एसटी आरक्षित होणार असे जाहीर होताच बाबूंची उमेद मावळली. आता ते पुढे काय करणार याची कुणालाच माहिती नाही. मात्र, त्यांच्या निष्ठावानांना अजूनही खात्री आणि आशा आहे की बाबू केपे मतदारसंघाचेच आमदार होणार. आता पाहूया समर्थकांची ही भाबडी आशा सत्यात उतरते की नाही ते.

येरे येरे पावसा...

राज्यात यंदा चतुर्थी काळात पावसाने उघडीप घेतली आणि गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला. कोणाला आरतीला जाताना पावसाने भिजवले नाही, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाचेच नवे कोरे कपडे चिखलात माखले नाहीत. सुख-समाधानात आणि कोरड्या हवामानात गणरायाचे आगमन झाले. अनंत चतुर्दशीपर्यंत गणराया घराघरांत विराजमान असले, तरी आता मात्र ‘येरे येरे पावसा’ अशी आळवणी सुरू झाली आहे. कारण, पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतातली पिके सुकू लागली असून शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यातच उन्हाचा चटका आणि उकाडा असह्य वाढला आहे. त्यामुळे गणपतीच्या भक्तीसोबतच आता बळीराजासह सर्वजण पावसाच्या जोरदार पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

आम आदमी पक्ष बाजूला उरणार?

राजकारणात कोण कोणाचा नसतो. कोण कधी कोणता निर्णय घेणार हे सांगणे कठीण. आप व गोवा फॉरवर्ड पक्षाची युती जाहीर झाली असली तरी अजूनही किंतु परंतु ऐकायला मिळत आहे. आम आदमी पक्षाला बाजूला ठेवून इतर सर्व भाजपविरोधी राजकीय पक्ष युती करणार अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. असे जर झाले तर अरविंद केजरीवाल यांच्या आपचे काय होणार? एक प्रियकर आपल्या प्रेयसीला चीट करून दुसऱ्या मुलीशी सलगी करतो असे जे हार्डिंग आम आदमी पक्षाने टाकले आहे तो डाव आपवरच कोसळणार नाही का?

पाटकर श्रेष्ठींच्या संपर्कात!

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गाभा समितीच्या बैठकीच्या निमंत्रणावरून गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या भाष्यावर खास प्रसारमाध्यमांना बोलावून आपली मनातील खदखद व्यक्त केली. यापूर्वीच्या पीएसी बैठकीच्या निमंत्रणावरून पाटकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आज झालेल्या गाभा समितीचे निमंत्रण एम. के. शेख यांनी त्यांना पाठविले होते, असे प्रभारींचे म्हणणे आहे. परंतु बैठकीचे निमंत्रणच न पाठविल्याचे सांगत पाटकर यांनी पुन्हा अंतर्गत कलहाला फुंकर घातली आहे. काही झाले तरी पाटकर हे पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींशी कालच त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि पक्षाच्या अधिकृत व्यासपीठाचा कथित गैरवापर होत असल्याचा आणि काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. गोवा राखण यात्रेसाठी राहुल गांधी-प्रियांका गांधी, यांच्यासह इतर वरिष्ठ नेते गोव्यात येणार आहेत, त्यावेळी या नेत्यांनी बोलावल्यास जाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सगळ्यांना कळले!

इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. मात्र, इतिहासापासून आपण बोध घेणे गरजेचे असते. काही वर्षांपूर्वी उत्तर गोव्यातील एक राजकारणी नको असलेले प्रताप करायला गेला आणि संकटात सापडला होता. बाईच्या नादात त्या राजकारण्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती. आता त्याच मतदारसंघातील आणखी एक राजकारणी तशाच प्रकारच्या वादात सापडला असल्याची चर्चा उत्तर गोव्यातील त्या मतदारसंघात सुरू झाली आहे. आमदारकीच्या शर्यतीत असलेला हा राजकारणी अति ऊर्जा प्राप्त करण्याच्या नादात फसला व आता त्याचे राजकीय व कौटुंबिक भवितव्य संकटात सापडल्याची रंगतदार चर्चा त्या मतदारसंघात सुरू आहे. ∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Update: गोव्यात 'यलो अलर्ट'! पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात वर्षातील पहिल्या चक्रीवादळाची शक्यता

Budh Guru Yog 2026: धनलाभाचा 'राजयोग'! 22 सप्टेंबरपासून 4 राशींची तिजोरी पैशांनी भरणार; बुध आणि गुरुच्या चालीनं बदलणार नशिबाचं चक्र

Iran US Tension: इराणचा महा-अल्टीमेटम! 7 अटी मान्य करा अन्यथा... तेहरानने उडवली 'महासत्ते'ची झोप; कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने थेट मेसेज

India Development Conference: 'विकसित भारत'साठी खासगी गुंतवणुकीला चालना; राज्यांच्या भांडवली खर्चाचे लक्ष्य ३ टक्क्यांपर्यंत नेण्यावर चर्चा

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबारामागे 'सूरज'चा हात? कॅसिनो व्यवसायाशी संबंधित कारणाचा पोलिसांना संशय; तपास निर्णायक टप्प्यात

SCROLL FOR NEXT