आधी घ्यायचा फायदा; नंतर...!
फोंड्यात सध्या भाजप आणि काँग्रेसमधील वाद शिगेला पोचला आहे. चार दिवसांपूर्वी केतन भाटीकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना खुद्द मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. हे टीकास्त्र जिव्हारी लागल्याने भाजपच्या फोंड्यातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाटीकर यांना चोख प्रत्युत्तर दिले. भाटीकर हे मगो पक्षात असताना मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधून होते, हे कुणीही नाकारू शकत नाही, मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेणे म्हणजे फायदा घेऊन नंतर आपण त्या गावचे नाहीच, असा प्रकार केल्यासारखा आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
पाटकरांच्या नावाला बगल!
‘आरजी’च्या नेत्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पणजीतील आमदार वीरेश बोरकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. आभार मानण्याची ही औपचारिकता त्यांनी पार पाडली. त्यात त्यांनी काँग्रेस आमदार युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, उपाध्यक्ष सुनील कवठणकर, प्रदेश युवक काँग्रेसचे अर्चित नाईक, गोवा फॉरवर्डचे पक्षप्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई, दीपक कळंगुटकर, आपचे आमदार व्हेंझी, क्रूझ, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी या सर्वांची त्याचबरोबर राजकीय पक्ष, बिगर सरकारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना या सर्वांची नावे घेतली. परंतु त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचे नाव घेतले नाही. पाटकरांनी आझाद मैदानावर येऊन हजेरीही लावली होती आणि तेथे भाषणही केले होते. परब यांनी त्यांचे नाव जाणूनबुजून घेतले नाही, यामागील (राज)कारण आता सर्वांना ज्ञात झालेच असेल.
साहेब बदलले मात्र, मांडवली सुरूच..
सासष्टीतील एका पोलिस ठाण्यातील मांडवली बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका पोलिसाचे कारनामे अजूनही चालू आहेत. कुठलेही काम असेल तर या भाईला हाताशी धरले, की कामे चुटकीसरशी होतात. ‘एलआयबी’त तो कार्यरत आहे. त्याचा दबदबा तो काम करीत असलेल्या त्या ठाण्यात आहे. तालुक्यातील पोलिस ठाण्यातील ‘पीआय’ आता बदलले आहे. मात्र या भाईच्या कार्यपद्धतीवर कुठलाही परिणाम झाला नाही. वरिष्ठ पोलिसही त्याच्या इशाऱ्यावर नाचतात.कारण उघड आहे. या साहेब लोकांनाही तो मलिदा नित्यनेमाने पोहोचवत असतो. हीच तर खरी कमाल आहे हो.
अदृश्य दिग्दर्शक
आमरण उपोषण म्हणजे काही साधी गोष्ट नाही अन् ते धाडस करून दाखवले वीरेश बोरकर यांनी! त्यामुळे श्रेय द्यायचंच हे तर जनतेचं सरळ गणित. गोव्यासाठी उभा राहिला, म्हणून सामान्य जनता त्यांना दाद देते आहे. पण राजकारणात गणित कधी सरळ असतं का? सध्या राजकीय वर्तुळात चर्चा अशी की, या उपोषणाच्या पडद्यामागे एक ‘अदृश्य दिग्दर्शक’ होता म्हणे. त्यानेच स्क्रिप्ट लिहिली, पडदा उघडला आणि योग्य वेळी टाळ्याही वाजवल्या. उद्देश? काही ठराविक नेत्यांना ‘जमिनीवर’ ठेवायचं! कारण काहीजण जरा जास्तच उंच उडू लागले होते म्हणे… आणि उंच उडणाऱ्यांना आवरणं, ही कला काहींना उत्तम अवगत असते. चर्चा तर इथपर्यंत पोहोचली आहे, की सत्ताधारी पक्षातील एखादा बडा नेता शांतपणे दोर हलवत होता. नाव विचाराल तर सगळे हसतात ...‘नाव घेऊ नका, पण ओळखा!’ असंही म्हणतात. जनतेच्या नजरेत श्रेय एकीकडे, तर राजकीय वर्तुळात श्रेय भलत्यालाच, अशीही चर्चा सुरू आहे. आता प्रश्न एवढाच की या आंदोलनाचा राजकीय रंग आणखी गडद होणार? की थोड्या दिवसांनी फिका पडणार?
युतीची नवी पुडी
सध्या गोव्यात विरोधकांची युती हा एक चर्चेचा विषय बनलेला आहेच त्याशिवाय तो आता काही राजकारण्यांनी थट्टेचा विषय बनविला आहे. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवावी असे म्हणत असताना, एक विरोधी पक्ष दुसऱ्या विरोधी पक्षाला कशा दुगाण्या देतो हे दोन दिवसांपूर्वी सर्वांनी मनोज आणि विजय यांच्या वादातून पाहिले. या पार्श्वभूमीवर आता बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी मनोज यांची आरजी पार्टी आपकडे युती करण्यास तयार आहे. आणि ही युती अरविंद केजरीवाल यांनाही मान्य आहे, अशी नवीन फोडणी राजकारणाला दिली आहे. व्हेंझीची ही फोडणी खरेच प्रत्यक्षात येईल की युतीच्या नावाने व्हेंझीने फोडलेली ही एक पुडीच असेल हे काही दिवसात स्पष्ट होणारच म्हणा.
कुंकळळीत प्रदूषणाचे राजकारण !
‘कारण राजकारण!’असे म्हणतात ते खरे. काही राजकारणी समाज कार्यातही आपला फायदा शोधतात. कुंकळ्ळीत प्रदूषणाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, हा लढा निर्णायक स्तरावर नेण्याची इच्छा कोणालाच नाही, असे दिसते. प्रदूषणाचा मुद्दा हा काही लोकांच्या ‘सर्व्हायवल’चा विषय बनला आहे, असा संशय येतो. आता कुंकळ्ळीत प्रदूषणाचा विषय बाजूलाच राहिला या विषयावरून वेगळेच राजकारण रंगू लागले आहेत.ज्यांच्याकडे शहराची सत्ता आहे, ते एवढी वर्षे गप्प राहिले आणि आता कार्यालयात बसून मोर्चे काढण्याची धमकी देतात. युरी आलेमाव यांचे विरोधक प्रदूषणाला युरीचे वडील माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांना जबाबदार धरतात. तर युरी समर्थक हे खापर भाजपवर फोडतात. यात आता भर पडली आहे ती सेवा निवृत्त पोलिस अधीक्षक व तियात्र दिग्दर्शक सॅमी तावारीस यांची. आपण प्रदूषणाचा विषय हाती घेणार, असे साहेब सांगू लागले आहेत. यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्ते अशाच पत्रकार परिषदा घेत होते, ते आता गायब झाले. आमदार युरी आलेमाव यांनी तर आपल्या जिवात जीव असेपर्यंत प्रदूषणाच्या विरोधात राहण्याचा निर्धार जाहीर केला आहे. आता जनता ही या राजकारण्यांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाही, कारण पूर्वानुभव. म्हणतात ना, ‘यू कॅनॉट फूल ऑल पीपल ॲट ऑल टाईम’.
आता चर्चा उत्पलची
पणजी महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षांनी उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिल्यानंतर राज्यभरात या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. आधी ही निवडणूक मंत्री बाबूश मोन्सेरात एकतर्फी करतील, असे वातावरण तयार करण्यात आले होते. बाबूश यांनीही ३० पैकी ३० जागा जिंकू असे सांगून त्यात भर घातली होती. मात्र, संयमाने ठामपणे उत्पल यांनी उमेदवार निवड केली. ते रिंगणात राहतील, हे पाहिले आणि टक्कर देण्याची तयारी केली. एकास एक लढत अनेक प्रभागांत होणार असल्याने सर्वांना ही विधानसभेची ‘सेमीफायनल’ वाटते. त्याचमुळे उत्पल चर्चेत आले आहेत.
गेले युरी-एल्टन कुणीकडे?
युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मोदी सरकारने अटक केल्याच्या निषेधार्थ गोवा प्रदेश युवक काँग्रेसने जुने गोवे येथे गांधी पुतळ्याजवळ शुक्रवारी धरणे आंदोलन केले. आंदोलनाला कॉंग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, ‘संघटन सृजन’ साठी आलेले इतर प्रभारी, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गिरीश चोडणकर, आमदार कार्लुस फेरेरा, खासदार विरियातो फर्नांडिस व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु काँग्रेस विधिमंडळ गट नेते असलेले युरी आलेमाव व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा दिसलेच नाहीत. मागील काही दिवसांत ‘आरजी’च्या नेतृत्वाखालील आंदोलनात दिवस-रात्र सहभागी झालेले आपलेच आमदार हजर नसल्याने जमलेल्या कार्यकर्त्यांत उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली. त्यात पणजीतील आंदोलनावेळी ‘आरजी’च्या नेत्याने विरोधी पक्षातील आमदारांना ‘ऑफर’ही दिली आहेच. त्यामुळे या ‘ऑफर’ विषयी ही दुकडी आत्तापासून तरी विचार करीत नाही ना, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्ते करू लागलेत.
लाच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांना कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांनीच लाच ऑफर करण्याचे प्रकरण कला अकादमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की काय अशी शंका उपस्थित व्हावी, अशा घटना घडत चालल्या आहेत. हे प्रकरण उपस्थित होताच त्यातील गांभीर्याची नोंद घेण्याऐवजी कला अकादमीचे सदस्य सचिव रजेवर गेले आहेत. त्याला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर म्हणतात, जोपर्यंत सदस्य सचिव पुन्हा रुजू होत नाही तोपर्यंत या प्रकरणाची चौकशी कला अकादमीकडून होणार नाही. ‘थंड करून खा’ असाच हा एकंदर मामला दिसतो आहे. लाच प्रकरणात सामील असलेले दोन्ही कर्मचारी देखील ‘तशे तातून व्हडले काय ना रे!’ असेच सांगत गावभर फिरत आहेत. गोव्याच्या कला आणि संस्कृतीला एक हिडीस रूप तर येत चाललेले नाही ना?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.