साडेचार हजार मतांचा फायदा कोणाला?
‘एसआयआर’ची प्रक्रिया सुरू झाल्यापासून गोव्यातील राजकीय वर्तुळात कुजबुज वाढली आहे. राज्यात एक लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा आहे. फातोर्ड्यात तर साडेचार हजार मतदारांची नावे यादीतून वगळल्याचे विजयबाब ठिकठिकाणी सांगत सुटले आहेत. मजेशीर भाग असा की, ‘एसआयआर’पूर्वी फातोर्ड्यातील काही नेते अगदी शांत होते. निवडणूक लढविण्याची भाषाही कुठे ऐकू येत नव्हती. ‘एसआयआर’ झाला... साडेचार हजार मतदार यादीबाहेर गेले... आणि आता काही चेहरे पुन्हा निवडणुकीच्या मैदानाकडे पाहू लागल्याची चर्चा आहे. योगायोग इतकाच की, साडेचार हजारांचा आकडा आणि निवडणुकीची अचानक वाढलेली उत्सुकता यांचा काही संबंध तर नाही ना? अशी कुजबुज फातोर्ड्यात सुरू झाली आहे. वगळण्यात आलेल्या मतदारांचा फायदा नेमका कुणाला होतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र साडेचार हजार मतांचा हिशोब राजकीय चर्चेचा विषय राहणार, हे नक्की!
यादी अजूनही भिंतीवरच...
‘एसआयआर’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनीही याच मुद्द्यावरून राजकारण तापवले आहे. गोव्यातील ९७ जणांची नावे यादीतून वगळल्याची बातमी तर थेट राष्ट्रीय चर्चेचा विषय बनली. एसआयआरसाठी मतदारांकडून कागदपत्रे मागविण्यात आली आणि त्यासाठी विविध ठिकाणी केंद्रेही उभारण्यात आली होती. पर्वरीतील संजय स्कूलमध्येही असेच एक केंद्र होते. काम झाले, प्रक्रिया पुढे गेली... पण तिथली मतदारांची यादी मात्र अजूनही भिंतीवरच लटकलेली दिसतेय! मतदारांचे नाव, पत्ता अशी सगळी माहिती उघड्यावर असताना कुणाचेही त्याकडे लक्ष गेलेले नाही. उद्या या माहितीचा गैरवापर झाला, एखाद्या सायबर भामट्याने त्याचा फायदा उठवला तर? मग जबाबदारी कोणाची? ‘एसआयआर’च्या राजकारणात सगळ्यांचे लक्ष... पण भिंतीवर लटकलेल्या यादीकडे पाहायला वेळ कोणाला आहे?
रितेश, अपूर्वच्या एकसंधतेचा प्रश्न
फोंड्यात भाजपचे दोन तगडे उमेदवार रिंगणात असून, त्यातील कुणाला तिकिटासाठी निवडायचे, असा पेच साहजिकच भाजपवाल्यांसमोर उभा आहे. त्यातच आता मगोवाल्यांनीही आम्ही फोंड्याच्या उमेदवारीच्या शर्यतीत असल्याचे अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिल्यामुळे हा तिढा अधिकच घट्ट होत चालला आहे. त्यामुळेच रितेश की अपूर्व, अशा दोघांपैकी एकाला तिकीट द्यावे लागेल आणि कुणाला एकाला तिकीट दिल्यानंतर दुसऱ्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे लागेल, अन्यथा...!
‘गोंय राखण’चे फलक रस्त्यावर!
पणजीत ‘गोंय राखण’ यात्रा झाली... घोषणा झाल्या... हातात फलकही मिरवले गेले. आता सगळे आपापल्या कामाला लागले. मात्र, पणजीतील आत्माराम बोरकर रस्त्यावर याच यात्रेतील एक फलक चक्क रस्त्यावर पडलेला दिसला. आता चर्चा सुरू झालीय ती याचीच! ‘गोंय राखण’ म्हणत हातात धरलेला फलकच ‘राखता’ आला नाही, याची कुणाला खंत वाटली नाही का? कार्यकर्त्यांच्या नजरेतून हा फलक सुटला की पालिका कर्मचाऱ्यांच्या झाडूखालीही तो आला नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच यात्रेत याच फलकासाठी जोरदार घोषणा देणारे कार्यकर्ते परतताना एकदा मागे वळून पाहिले असते तर...? कट्टर कार्यकर्त्यांनी हा फलक असा रस्त्यावर पडू दिला असता का, असा मिश्कील सवाल आता आत्माराम बोरकर रस्त्यावरून जाणाऱ्यांमध्ये ऐकू येतोय.
मोरेनचा दावा खरा पण...
कुडतरी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सध्या तुल्यबळ लढाई सुरू आहे. माजी झेडपी सदस्य मोरेन रिबेलो हे यावेळेसही काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा करीत आहेत. २०२२च्या निवडणुकीत ते कुडतरीत काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघात काँग्रेसचे काम जोमाने सुरू ठेवले, हे कुणीही नाकारू शकत नाही. मात्र, यावेळी उमेदवारी त्यांनाच मिळणार का, हे छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही. कुडतरीत अनेक वर्षे अनभिषिक्त सत्ता गाजविलेले फ्रान्सिस सार्दिन हेही अधूनमधून आपण कुडतरीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे सांगत असतात. दुसरीकडे, विद्यमान आमदार आलेक्स बाबानेही आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. या एकंदर स्थितीत मोरेन यांच्यासमोर अनंत अडथळे आहेत, हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही!ृ
तानावडेंचा किस्सा अन् दाद
पर्वरीत रविवारी मूकबधिरांच्या कार्यक्रमाला खासदार सदानंद शेट तानावडे गेले होते. तिथे त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. एका कार्यक्रमात एका मुलीने सुंदर रांगोळी काढली होती. तानावडेंनी तिचे कौतुक केले आणि, ‘रांगोळी कुणी काढली?’ असे विचारले. मुलगी पुढे आली... चेहऱ्यावर गोड हास्य; पण शब्द मात्र नाहीत! चौकशी केली असता ती मूकबधिर असल्याचे समजले. तिच्या कलेने मात्र तानावडेंचे मन जिंकले. तिच्यासाठी काहीतरी करायचे ठरले आणि पुढे तिला नोकरी मिळवून देण्यासाठीही त्यांनी मदत केली. आजही चतुर्थीला ती मुलगी आवर्जून तानावडेंना बोलावते, सेल्फी काढते, असे त्यांनी सांगितले. किस्सा संपला आणि उपस्थितांनी हात हवेत उंचावले. टाळ्यांचा आवाज नव्हता... पण दाद मात्र मनापासून होती! ∙∙∙
भाजप फोंडा सोडणार?
२०२२ मधील विधानसभा निवडणुकीत रवी नाईक यांच्या रुपाने भाजपने फोंड्याचा ‘गड’ सर केला होता. परंतु, भाजप सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच रवींचे निधन झाल्याने फोंडा वर्षभरापासून आमदाराविनाच आहे. आता येत्या विधानसभा निवडणुकीत फोंड्याची उमेदवारी ‘मगो’ला मिळावी, यासाठी मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवाय फोंड्यातून स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी याबाबत मौन बाळगले होते. अखेर दामूंनी यावर भाष्य करीत, सद्यस्थितीत भाजप–मगो युतीची गरज असल्याचे स्पष्ट केले. शिवाय फोंड्याच्या जागेचा निर्णय भाजप–मगोचे स्थानिक नेते वरिष्ठांशी चर्चा करून घेतील, असेही सांगितले. निवडणूक अजून चार महिन्यांवर असल्याने दामूंनी हे वक्तव्य केले. परंतु, भाजप आमदार असलेला मतदारसंघ युतीतील आणि तेही केवळ दोन आमदार असलेल्या पक्षाला ते सोडतील का? याकडे फोंडावासीयांचे लक्ष लागून आहे.
स्वाभिमानी कळंगुटकरांची युती!
आता जनता शहाणी झाली आहे. राष्ट्रीय पक्षांच्या हायकमांड नीतीला लोक कंटाळलेले आहेत. स्थानिक राजकीय पक्षांची एकाधिकारशाहीही जनतेच्या पचनी पडत नाही. आता स्थानिक मतदारसंघातील मतदारच आपला उमेदवार ठरवायला लागले आहेत. कुंकळळी मतदारसंघातील स्वाभिमानी कुंकळळीकरांनी एकत्र येऊन एल्विस गोम्स यांना स्वाभिमानी युतीचा उमेदवार जाहीर केला. काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार युरी आलेमाव यांच्या विरोधात एकच उमेदवार उतरविण्याचा निर्णय स्वाभिमानी कुंकळळीकरांनी घेतल्यानंतर, आता स्वाभिमानी कळंगुटकर एकत्र आल्याची चर्चा आहे. भाजपचे विद्यमान आमदार मायकल लोबो यांच्या विरोधात स्वाभिमानी कळंगुटकरांच्या युतीने सक्षम उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. माजी सरपंच रोशन रेडकर, माजी सरपंच लक्ष्मण परब, प्रसाद शिरोडकर व सुदेश मयेकर यांनी या कामी पुढाकार घेतला. परवा गणपती विसर्जनाच्या वेळी हे चौघेही हातात हात घालून नाचत होते. आता विधानसभेच्या निवडणुकीत ते मायकल लोबोंना किती नाचवितात, हे पाहावे लागणार.
युरींचा रिपोर्ट कुठे?
‘कला राखण मांड’चे पदाधिकारी व कला अकादमीच्या ‘टास्क फोर्स’चे सदस्य फ्रांसिस कुएल्हो यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशावेळी भाषण करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कला अकादमी घोटाळ्याचा खास उल्लेख करून, तेथे पाहणी करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा फ्रांसिस कुएल्हो यांची ओळख झाल्याचे नमूद केले. कला अकादमी नूतनीकरण घोटाळा उजेडात आणण्यासाठी फ्रांसिसबाबांनी खास परिश्रम घेतल्याचेही युरीबाब म्हणाले. परंतु, सुमारे दोन वर्षांपूर्वी सदर पाहणी करून आपण सरकारला स्वतंत्र अहवाल सादर करणार असल्याचे युरी आलेमाव यांनी जाहीर केले होते. मात्र, युरींचा अहवाल काही उजेडात आला नाही. कदाचित त्या अहवालाचे शहाजहानने ताजमहालाखाली दफन केले असावे, अशी चर्चा रविवारी ‘गोवा राखण यात्रे’त पत्रकारांच्या कानावर पडली.
परब परत यावेत अशी कोणाची इच्छा!
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब हे पुन्हा राजकारणात यावेत, असे नक्की कोणाला वाटते? त्यांना राजकारणात पुन्हा ओढले जात आहे की इतरांच्या दबावामुळे ते राजकारणात येणार आहेत, हे काही ते उघड करणार नाहीत. जनतेची किंवा कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून मी आलो, असे सांगून वेळ मारून नेतील. परंतु, आरजीपीच्या काही माजी कार्यकर्त्यांना परब परत येतील, याची शाश्वती वाटत नाही, तर आरजीपीतून ज्यांना आमदारांनी बाहेर काढले आहे, अशा लोकांच्या राजकीय अस्तित्वासाठी परब परत यावेत, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. अजूनही त्यांनी आपण राजकारणात परतणार असल्याचे काही सूतोवाच दिले नाही किंवा भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. सध्या त्यांच्या समर्थकांकडून त्यांचा राजकीय राज्याभिषेक २ ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केले असल्याने, त्यात किती तथ्य आहे, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
फ्रांसिसबाब सांभाळा
ताळगाव मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे एक पदाधिकारी फ्रांसिस कुएल्हो यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विद्यार्थी चळवळीतून पत्रकारिता करीत आता राजकीय विश्लेषक बनून काँग्रेस पक्षाला सल्ला देणाऱ्या एका अजब-गजब व्यक्तीचा संदेश आल्यानेच फ्रांसिस कुएल्हो यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गोवा सांभाळण्यासाठी आपण काँग्रेसवासी झालो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. परंतु, आजच्या त्यांच्या पक्षप्रवेशाला ताळगावचे क्रियाशील गटाध्यक्ष ज्ञानेश्वर गोवेकर मात्र उपस्थित नव्हते. ताळगावचेच काँग्रेस कार्यकर्ते भूपेश प्रभुदेसाई यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकून ताळगावात ज्ञानेश्वर गोवेकरांनाच उमेदवारी, असे सूचक वक्तव्य करीत, नवीन पक्षात येणाऱ्यांनी किमान पाच वर्षे पक्षाचे काम करावे व नंतरच तिकिटावर दावा करावा, असे मत प्रकट केले आहे. आता गोवा सांभाळण्यास निघालेल्या फ्रांसिसबाबांना ताळगाव मतदारसंघातील निष्ठावान कार्यकर्ते कसे सांभाळून घेतात, हे पुढे कळेलच.!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.