तिकीट भाजपचे, स्वप्न सर्वांचे!
डिसेंबर अखेर विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार, अशी जोरदार हवा राजकीय वर्तुळात वाहू लागली आहे, अन् या हवेचा सर्वाधिक परिणाम सध्या म्हापसा मतदारसंघात जाणवू लागला आहे. म्हापशात सध्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, प्रत्येकाला आपणच भावी आमदार असल्याचा साक्षात्कार झाला आहे. प्रत्येकाची जाहिरातबाजी जोरात सुरू आहेत. नुकताच मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस झाला, पण शुभेच्छांच्या फ्लेक्सवर मुख्यमंत्र्यांपेक्षा शुभेच्छा देणाऱ्यांचेच चेहरे जास्त लकाकत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून (फोटोत तरी!) उभे राहिलेले हे इच्छुक प्रत्यक्षात भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी ही सर्कस करत आहेत. शहरात सध्या अशी खमंग चर्चा आहे की, भाजप यावेळी एखादा कोरा करकरीत चेहरा शोधत आहे. भाजपची म्हापशात स्वतःची हक्काची आठ-दहा हजार मते आहेत, त्यामुळे अनेकांना वाटू लागलेय की, एकदा का पक्षाचे तिकीट मिळाले की, विधानसभेची पायरी चढणे सोपे जाईल! आता पक्ष विद्यमान आमदारांवरच पुन्हा विश्वास दाखवून आपला हा बालेकिल्ला शाबूत राखतो की, एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देऊन जुन्यांना ‘रिटायर’ करतो, हे येणारा काळच ठरवेल. ∙∙∙
यजमान सतीश धोंड!
कोलकाता येथे भाजपच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल पार पडला. पक्षाचा सहसंघटनमंत्री या नात्याने सतीश धोंड हे मंचावर असणे स्वाभाविक होते. मिथून चक्रवर्तीलगत त्यांची आसन व्यवस्था होती. राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी संच आणि मोबाईलवर पाहिले. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाशी हस्तांदोलन, अभिवादन करत पुढे सरकत होते. ते चक्रवर्ती यांच्यापर्यंत पोचले आणि थबकले. त्यांनी अर्धा मिनिट तेथे चक्रवर्तींशी वार्तालाप केला. या दरम्यान, कॅमेरा तेथे रोखला गेल्याने सतीश धोंड यांचे दर्शन सर्वांना झाले आणि आपसूक ‘तो बघ आमचा सतीश’ असे उद्गार अनेकांच्या तोंडातून आल्याशिवाय राहिले नाहीत. ∙
भोंगळ कारभार
साकोर्डा येथील रानात मृत पट्टेरी वाघ आढळल्याने सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. या मृत्यूचे नेमके कारण काय हे अद्याप वन खाते स्पष्ट न करू शकल्याने या खात्याच्या कार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. वन खात्यातील अधिकाऱ्यांचे मनमानी कारभाराचे किस्से आता त्यामुळे चर्चेत येऊ लागलेत. मडगाव येथील वन्यप्राणी संरक्षण विभागात काम करणाऱ्या एका बड्या महिला अधिकाऱ्याचे किस्से तर जास्तच चर्चेत आहेत. ही बया काम करते मडगावात पण तिचे वास्तव्य आहे पणजीला. पणजीहून मडगाव कार्यालयात येण्यासाठी त्यांची दुपार उलटते. आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्यांना पुन्हा पणजीला जाण्याचे वेध लागलेले असतात. अशा स्थितीत कार्यालयाचे काम ते काय होणार? आणि वरिष्ठांची जर अशी वृत्ती तर खालचे कर्मचारी का म्हणून काम करतील? अशा परिस्थितीत दक्षिण गोव्यात साकोर्डासारखीच गोष्ट झाली, तर दोष कुणाला द्यायचा?
आर्लेकर यांच्याविषयी गौरव
तमीळनाडूच्या राजकारणात दोन गोमंतकीयांवर सर्वांच्या नजरा होत्या. एक कॉंग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर आणि दुसरे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. ते केरळमचेही राज्यपाल. दोन्ही राज्यांत निवडणुका, दोन्हीकडे पेच प्रसंग. केरळमध्ये कॉंग्रेसचा नेता ठरत नव्हता तर तमीळनाडूत नेता असलेल्या विजय यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. या दोन्ही राज्यातील परिस्थिती राज्य घटनेतील तरतुदींवर बोट ठेऊन संयमाने हाताळून आर्लेकर यांनी आपण राजकारणात किती मुरलेले आहोत हे दाखवून दिले. त्यामुळे ते भाजप कार्यकर्त्यांच्या गौरवास पात्र ठरल्याचे दिसून येते.
मडगावात उमेदवारी कुणाला?
पालिका निवडणुकांपूर्वी विधानसभा निवडणुका होणार, अशी शक्यता निर्माण झाल्याने मडगावात वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेत. भाजप तर्फे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित असले तरी आतून अनेक गुप्त घडामोडी घडताहेत, असे कळते. सावियोबाब, चिरागबाब व प्रभवबाब हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसने तिघांनाही आशेवर ठेवण्याचे तंत्र अवलंबले आहे. कित्येक वर्षांपासून सावियोबाब तर मडगावातील अनेक घोटाळे उघड करीत आहेत. प्रभवही विद्यमान आमदारांचे अनेक घोटाळे जाहीर करताहेत. चिराग हळूहळू कॉंग्रेसमध्ये रुळू लागलेत. हे तिघेही घोटाळे उघड करतात तरी विद्यमान आमदार त्यांच्या टीकेला उत्तर देत नाहीत. तरीही यापूर्वी कधी विरोध झाला नव्हता, तो आता होताना व लोकांत जागृती होताना दिसतेय. एवढे असूनही या तिघांना लोकांचे पाठबळ आहे का? त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज आहे का? केवळ घोटाळे उघड केले व टीका केली म्हणून मडगावकर त्यांना मतदान करतील? त्यांच्याकडे एक गठ्ठा मते आहेत का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या मडगावकर शोधताहेत.
गिरीश यांनी करून दाखवले!
तमीळनाडूत कॉंग्रेसला ५९ वर्षांनी सत्तेत आणत गिरीश चोडणकर यांनी करून दाखवले अशी भावना कॉंग्रेसजनांत आहे. १९६३-६७ मध्ये एम. भक्तवत्सलम हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सातत्याने कॉंग्रेस सत्तेपासून दूर राहिली होती. गेले तीन दिवस सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी विजय यांना निमंत्रित केले नाही यावरून सरकारीया आयोगापासून, राज्य घटनेतील तरतुदींविषयी गिरीश यांनी राष्ट्रीय माध्यमांवर केलेले विश्लेषण फारच आक्रमक आणि बोलके होते. द्रमूकची साथ सोडत टीव्हीकेसोबत जाण्याचा अल्पकाळात घेतलेल्या निर्णयामागेही गिरीश यांचेच गणित होते. यामुळे तमीळनाडूच्या राजकारणासोबत गिरीश यांच्या वाढलेल्या राजकीय वजनाचीच चर्चा आहे.
बोलायचं की ‘हेल्मेट घालूनच बोलायचं?’
सरकारच्या निर्णयांना विरोध करायचा, न्यायालयात जायचं, आदेश आणायचे... हे सगळं लोकशाहीत अगदी नेहमीचं. एखादा सामाजिक कार्यकर्ता सरकारच्या एखाद्या निर्णयावर बोट ठेवतो, न्यायालयही कधी सरकारच्या बाजूने तर कधी कार्यकर्त्यांच्या बाजूने आदेश देते. पण सध्या गोव्यात वेगळीच चर्चा रंगलीय. सरकारविरोधात बोलायचं असेल तर आधी हेल्मेट घालावं का? असा मिश्किल सवाल लोक विचारू लागलेत. कारण अलीकडे कार्यकर्त्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. आता हे घाबरवण्याचे प्रकार की खरेच गंभीर प्रकार हे शोधून काढण्याचे काम पोलिसांचे. असे हल्ले लगेच थांबणार की वाढणार,अशीही चर्चा लोकांत रंगली आहे. कारण पुढे निवडणुका येत असल्याने हे वाढतील की काय, अशी भीती लोकांना वाटतेय.
दीपक यांना मतदारसंघ कोणता?
येत्या निवडणुकीत ‘मगो’-भाजपची युती होणार असे वाटत असले तरी ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना कोणता मतदारसंघ मिळणार यावर या युतीचे भवितव्य अवलंबून आहे. दीपक यांचा डोळा प्रियोळ मतदार संघावर आहे हे सर्वश्रुत आहे. गेल्यावेळी युती नसल्याने त्यांचा या मतदारसंघातून फक्त २१३ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ मिळेल, असे अनेकांना वाटतही होते. पण परवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी प्रियोळ हा मतदार संघ भाजपचा असून तिथे भाजपचे कार्यही सुरू आहे, असे वक्तत्व केल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. तसे झाल्यास दीपक यांना मतदार संघ कोणता शिरोडा का फोंडा यावर खल सुरू झाला आहे. पण हे दोन्ही मतदारसंघही भाजपचेच असल्यामुळे त्यापैकी एखादा ‘मगो’ला सोडला जाईल की, काय यावरही शंका व्यक्त होत आहेत. हे पाहता आता भाजप याबाबतीत कोणता निर्णय घेतो, यावर या युतीचे भवितव्य अवलंबून आहे, हे निश्चित. तशी आता ‘दिल्ली’ फार दूर नाही म्हणा, नाही का?
कुणाच्या म्हशी अन् ...
राज्यात परराज्यातून येणाऱ्या टॅक्सींवर हल्ल्याचे आणि पर्यटकांना मारहाणीचे प्रकार घडत असल्याने सोशल मीडियात गोव्याची बदनामी होत आहे. साळगाव येथे आकस्मित एका व्यक्तीने टॅक्सीवर दगड मारून काच फोडल्याच्या प्रकाराबाबत परराज्यातील नागरिक येथील प्रशासन आणि पोलिसांना दोष देताहेत. गोव्यापेक्षा इतर राज्यांत पर्यटनासाठी गेलेले बरे, अशी चर्चा रंगत आहे. असे बेजबाबदारपणे कोणीही वागले तरी दोष मात्र प्रशासनावर येतो. परिणामी ‘कुणाच्या म्हशी कोण काढतंय उठाबशी’ असं म्हणण्याची वेळ प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अन् ‘अथिती देवो भवः’ म्हणत पर्यटनवृद्धीसाठी धडपडणाऱ्या पर्यटन खात्यावर ओढवते, नाही का?
कुठे गेले गोव्याचे हितरक्षक?
गोवा राज्याच्या अखत्यारित असलेल्या १६ बेटांवर कर्नाटक सरकारचा डोळा असल्याच्या ‘गोमन्तक’च्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली परंतु विरोधी पक्षातील एकाही आमदाराने या प्रकाराविरूद्ध कर्नाटक सरकारचा निषेध करणे सोडाच ‘ब्र’ देखील उच्चारला नाही. विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर ते गंभीर नाहीत. राज्याच्या जमिनी वाचवा म्हणून ओरडणारे या स्वयंघोषित समाजसेवकही या प्रकरणी गप्प का राहिले ? अशी विचारणा आता सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून केली जातेय.
इतरांसाठी गोवा ‘दुबई’ का वाटते?
मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी एक विधान केले की, इतर राज्यांतील लोकांना गोवा ‘दुबई’ वाटते. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे व ती वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही. पण गोव्यातील पारंपरिक व्यवसाय इतरांनी ताब्यात का घेतले? त्यांना गोवा ‘दुबई’ का वाटते? हे कशामुळे झाले व होतेय यावर कुणीतरी बारकाईने अभ्यास केलाय का? किंवा तसे होऊ नये म्हणून कुणी उपाय केले का? जेव्हा गोवा स्थानिक पक्षापासून राष्ट्रीय पक्षांच्या हाती गेला तेव्हापासून गोव्याची अशी स्थिती होत गेली, असे काही लोकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय पक्षांतही गोमंतकीयच आहेत ना, मग त्यांनी गोमंतकीयांना रोजगार मिळवून देण्यासाठी, पारंपरिक व्यवसाय अबाधित ठेवण्यासाठी, गोव्यातील तरुणांना इतर राज्यांत वा विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी एकाही सरकारने गंभीर विचार केला का, अशी विचारणा प्रामाणिक गोमंतकीय करू लागलेत!
अनेकांच्या आशा पल्लवीत!
बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत सत्ता स्थापन केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री झाले आणि गोव्यातील अनेकांच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या असतील, हे ते इच्छुकही नाकारणार नाहीत. बंगालमध्ये भाजपच्या केडरव्यतिरिक्त व्यक्ती तिही सहा वर्षांपूर्वी दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येते आणि प्रदेशाध्यक्ष होऊन भाजपला घवघवीत यश मिळवून देते, त्या व्यक्तीच्या गळ्यात आपोआप मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, हे आता सर्व जनतेने पाहिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये केडरचा प्रश्नच उरलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून आता गोव्यातही भाजपमध्ये काँग्रेसमधून आलेल्यांना दहा-पंधरा वर्षे होत आली आहेत, पण त्यांना मंत्रिपदावरच समाधान मानावे लागले आहे. बंगालमधील राजकीय निर्णय पाहता गोव्यात २०२७ मध्ये काहीही घडू शकते, हे मात्र नक्की. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांतील अनेकांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडलीही असतील आणि काहीजण दिवसा पाहतही असतील.
वालंकाचे नावेली प्रेम!
मागच्या विधानसभा निवडणुकीत नावेली मतदार संघातून पराभव पत्करावा लागल्यानंतर चर्चिल कन्या वालंका आलेमाव यांनी या मतदारसंघावरील आपले लक्ष काढून घेतले होते. मात्र, आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने त्यांचे नावेली प्रेम उतू जाऊ लागलेय, असे वाटते. त्यांनी आता एका पाठोपाठ एक कार्यक्रम नावेलीत आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी नावेलीत आरोग्य शिबिर घेतले. आता त्यांनी उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. निवडणूक होईपर्यंत त्यांचे नावेलीत किती कार्यक्रम होणार, हे त्यांचे त्यांनाच ठावे! ∙∙∙
क्रमांक बदलला, पण चर्चा कायम!
एनसीआरबी अहवाल आला आणि महिलांवरील अत्याचारांत गोवा राज्य ‘अव्वल’ असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गोवा पोलिसांनीही लगेच स्पष्टीकरण देत सांगितलं, की दोन वेगळ्या श्रेणी एकत्र झाल्यामुळे गैरसमज निर्माण झाला. म्हणजे ‘पहिला क्रमांक’ तांत्रिकदृष्ट्या वेगळा आहे, असं पोलिस म्हणाले. पण लोक म्हणू लागले, क्रमांक बदलला तरी विषय तर महिलांवरील अत्याचाराचा आहेच ना! काहींनी तर मिश्किलपणे विचारलं, आता जनता श्रेणी मोजणार की सुरक्षितता? त्यामुळे पोलिसांचं स्पष्टीकरण आलं खरं, पण त्यापेक्षा जास्त चर्चा मात्र अहवालाचीच रंगली. आता पुढच्या वेळी अहवाल येण्यापूर्वी आकडेवारीपेक्षा प्रतिमा कशी सांभाळायची, याचाच वेगळा अभ्यासक्रम पोलिसांना सुरू करावा लागेल की काय, अशी चर्चा ऐकू येऊ लागली आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.