मोरजी: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची मांद्रे मतदार संघाला गरज नाही. त्यांनी अगोदर कळंगुट मतदार संघातील गैर व्यवहर बंद करावेत, नंतरच मांद्रेतून निवडणूक लढविण्याचा विचार करावा, अशी भूमिका मांद्रे मतदारसंघातील सरपंचांनी पत्रकार परिषदेत घेतली.
यावेळी आगरवाडा सरपंच सचिन राऊत, मांद्रे सरपंच मिगेल फर्नांडिस, हरमल सरपंच सांतान फर्नांडिस, केरी सरपंच धरती नागोजी, पार्से उपसरपंच अजित मोरजकर, पालये पंचायत सदस्य सागर तिळवे, रॉबर्ट फर्नांडिस, अजय गाड उपस्थित होते.
मायकल लोबो यांनी हल्लीच आपण मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आज मांद्रे मतदार संघात उमटले. मांद्रे मतदारसंघातील सरपंचांनी खास पत्रकार परिषद घेऊन लोबो याचा समाचार घेतला.
लोबो यांनी अगोदर आपल्या मतदार संघातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद करावेत आणि नंतरच पुढे बोलावे, असा टोमणाही पंचायत सदस्य सागर तिळवे यांनी लावला. मतदार संघातील जनतेने निवडून दिलेला युवा नेतृत्व आणि संस्कृती जपणारा नेता जीत हे सक्षम आहेत, असे त्यांनी सांगितले.
मी केलेल्या विधानाचा उगाच कुणी बाऊ करु नये. विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षाचा काळ आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत कळंगुट मतदार संघातील माझ्या मतदारांना विश्वासात घेतल्याशिवाय अथवा त्यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही, असे आमदार मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे उमेदवार असताना लोबो यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांसोबत देव बोडगेश्वर, देव महालक्ष्मी, बांबोळी क्रॉस अशा वेगवेगळ्या देव देवतांकडे गाऱ्हाणे घातले होते. पक्षाशी निष्ठावंत राहणार, असेही वचन त्यांनी दिले होते. मात्र त्याचे काय झाले, असा सवाल सागर तिळवे यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.