Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्पावर धावपट्ट्या तयार झाल्या असून आता रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. रात्रंदिवस हॉटमिक्स रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विमानतळाचे उदघाटन होण्यापूर्वी दोनवेळा धावपट्टीवर विमान उतरवण्याचा आणि उड्डाणाचा सराव केला जाणार आहे. जम्बो विमानही धावपट्टीवर उतरणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
कॉंक्रिटचे रस्ते पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित रस्ते हॉटमिक्स करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे काम सुरू झाले आहे व ते नियोजित वेळेतच पूर्ण होणार असल्याची हमी संबंधित कंत्राटदारांनी दिली आहे. कामात कोणतीच दिरंगाई चालत नाही; कारण आता रोज कामाच्या पूर्ततेचा अहवाल महासंचालकांना पाठवावा लागतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रोज 150 उड्डाणे शक्य
यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरवण्यात आले होते. त्यावेळी इंडिगो कंपनीने सहकार्य केले होते. या कंपनीचे कमर्शियल विमान ए-320 या चाचणीसाठी निवडले होते. खुद्द मुख्यमंत्री ही चाचणी पाहण्यास उपस्थित होते.
विमान उड्डाणसेवा सुरू झाल्यावर रोज किमान 100 ते 150 उड्डाणे अपेक्षित आहेत. दाबोळी विमानतळावर रोज 70 पेक्षा जास्त उड्डाणे होऊ शकत नाहीत. कारण तेथे नौदलाचे नियंत्रण असून त्यांनी उड्डाणावर मर्यादा घातल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता हैदराबाद, बंगळूर मार्गांची चाचणी
पहिली चाचणी मुंबईहून उड्डाण करून झाली. त्यामुळे मुंबई ते मोपा विमानतळाचा मार्ग पक्का झाला होता. या मार्गावरील अडथळ्यांचा व उड्डाण अनुभवाचा अहवाल पायलटांकडून महासंचालकांनी घेतला होता. आता हैदराबाद व बंगळूर या मार्गांची चाचणी बाकी आहे.
मोठे जम्बो विमान दाबोळी विमानतळावर अद्याप उतरलेले नाही. कारण येथील धावपट्टी मोठ्या विमानांसाठी नाही. मात्र, मोपा येथे ते शक्य आहे. तसे झाल्यास ते गोव्यात उतरणारे ते पहिले जम्बो विमान असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.