Goa News: राज्यात कमी दर्जाची काजू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याबद्दल दैनिक ‘गोमन्तक’ने आवाज उठविला होता. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा एफएसएसएआय (FSSAI) परवाना नसताना काजू विक्री करणाऱ्या बार्देश तालुक्यातील चार दुकानांवर काल दंडात्मक कारवाई केल्याची माहिती संचालक ज्योती सरदेसाई यांनी दिली.
बार्देश तालुक्यात विविध भागात काल एफडीआयने काजू व ड्रायफ्रूट विक्रेत्यांकडे तपासणी केली. यापूर्वी ज्या विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली होती, त्यांना एफएसएसएआयचा परवाना घेण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने कारवाईचा बडगा उगारला.
उमटावाडो-कळंगुट येथील मेसर्स गोवा काजू शॉप क्र. 4 येथे कोणताही परवाना व नोंदणी प्रमाणपत्राशिवाय काजूची विक्री होत असल्याचे आढळून आले. एफडीएच्या मोबाईल तपासणी व्हॅनमध्ये विक्री होणाऱ्या काजूचा दर्जा तपासण्यात आला, त्यात 25 टक्के भेसळ असल्याचे आढळून आले.
त्यामुळे एफडीआयने या विक्रेत्यास कलम 31 अन्वये नोटीस जारी केली आहे. त्याचबरोबर त्याचा काजू साठा जप्त करण्यात आला असून, त्याचबरोबर त्यास काजू विक्री थांबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याच परिसरातील बालाजी ट्रेडर्स येथे विनापरवाना काजू विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.
या दुकानातून 748 किलो काजू जप्त करून पुढील तपासणीसाठी फूड बिझनेस ऑपरेटर्सकडे पाठविला. खोब्रोवाडा-कळंगुट येथील बालाजी ट्रेडर्सच्या काजू डेपोवर एफडीएने दुसऱ्यांदा तपासणी केली. याठिकाणी एफएसएसएआयच्या परवान्याविषयी सुक्या मेव्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने विक्री थांबविण्याची नोटीस बजावली आहे.
तंबाखूजन्य उत्पादनेही ताब्यात
एकंदरीत कारवाईत एफडीएने 8.60 लाख रुपयांचा 748 किलो काजू जप्त केला आहे. दरम्यान, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायद्यांतर्गत एफडीएने हुक्का व वापे शॉपवर कारवाई करीत अनुक्रमे 29 हजार 580 आणि ५४ हजार 890 अशा एकूण 84 हजार 470 रुपये किंमतीची तंबाखू उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.
नोटीस बजावली होती, तरीही...
कळंगुटशेजारी असलेल्या कांदोळी भागात मेसर्स साई काजू डेपो (शॉप नं. १) या दुकानात एफएसएसएआय परवाना वैध नसतानाही काजू विक्री होत होती. यापूर्वी या दुकानास एफडीएने नोटीस बजावली होती आणि विक्री थांबविण्याचे निर्देश दिले होते, तरीही येथे विक्री केली जात असल्याचे दिसून आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.