Goa Monsoon 2023 मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यात उद्या (गुरुवारी) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारी झाडे कोसळणे, पाण्याखाली रस्ते जाणे तसेच पडझडीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.
मंगळवारी सायंकाळी कॅसलरॉक येथे कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली असून दरड हटवण्याचे काम सुरू असल्याने उद्याही (गुरुवारी) ही सेवा बंदच राहणार आहे.
या मार्गावरील गाड्या हुबळी आणि बेळगावहून सोडण्यात येणार आहेत. तथापि, प्रशासनाने गुरुवारी शाळांना सुटी जाहीर केलेली नाही. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ८०.५ मिमी. म्हणजेच ३.१६ इंच पाऊस पडला असून आतापर्यंत राज्यात २,३४१ मिमी. म्हणजेच तब्बल ९२.१६ इंच एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली.
रेल्वे मार्गावर कोसळली दरड
कॅसलरॉक ते करंझोळदरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने बुधवारी आणि गुरुवारी वास्को-तिरुपती आणि वास्को-यशवंतपूर या गाड्या रद्द केल्या आहेत, तर अन्य गाड्या बेळगावहून पुढे धावतील.
दरड काढण्याचे काम सुरू आहे. मात्र वाहतूक कधी सुरू होणार, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. कदाचित उद्या हे काम पूर्ण होऊ शकते. मात्र, पाऊस सुरूच राहिल्यास माती पुन्हा रुळावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोठे काय घडले?
हरमलमध्ये मुख्य रस्त्यावर साचले गुडघाभर पाणी
काणकोणात नद्या-नाले तुडुंब-जनजीवन प्रभावित
डिचोलीत चार ठिकाणी झाडांची पडझड, घरांची हानी
टाकी शेल्डे येथे भूस्खलन : घरात शिरली माती
सासष्टी तालुक्यात ११ ठिकाणी पडली झाडे; घरे-वाहनांचे नुकसान
शेतजमिनीत पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
मडगाव शहरात साचले पाणी; पूरसदृश स्थिती
चापोली धरणाची पाणी पातळी वाढली; एक-दोन दिवसांत भरणार.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.