‘बाप दाखवा, अन्यथा श्रद्धा वाढा’ अशी मराठीत एक म्हण आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व दूध संघांवर निवडून आलेल्या काही स्वार्थी आणि भ्रष्ट दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांच्या अध्यक्षांमुळे गोवा दूध उत्पादक सहकारी संघटना मृत्युशय्येवर पोचली आहे. काही वर्षांपूर्वी भाजप सरकारने गोव्यात ‘सुमूल’ कंपनीला दूध गोळा करण्याची परवानगी दिली, तेव्हाच डेअरी अर्धी संपली होती. आता सरकारने नेमलेला प्रशासक डेअरी चालवित आहे. सामान्य शेतकऱ्यांची डेअरी आज सरकारी उदासीनता व भ्रष्ट व्यवस्थापनामुळे मृत्यू घंटा मोजत आहे. सामान्य दुग्ध उत्पादकाचे आशा स्थान आता निराशेच्या गर्तेत सापडले आहे, असे शेतकरीच सांगू लागले आहेत. ∙∙∙
यापूर्वी बेतूल पठारावर डिफेन्स एक्सपो झाला होता, त्यावेळी केपेचे आमदार बाबू कवळेकर होते. मात्र, त्यावेळी ते काँग्रेसचे आमदार होते आणि त्या एक्सपोला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे अगदी घरासमोर कार्यक्रम सुरू असतानाही बाबूंना या कार्यक्रमाला जाता आले नव्हते. यावेळी बेतूल येथे चार दिवसांचा ‘इंडिया एनर्जी विक’ आयाेजित केला. आता बाबू भाजपमध्ये असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला अधिकृत आमंत्रण असणार, हे सर्वांनीच गृहित धरले होते. पण बाबू आता आमदार नसल्यामुळे असेल कदाचित, कार्यक्रमाचे जे प्रोटोकॉल होते, त्यात बाबूंना स्थानच नव्हते. म्हणजे एका अर्थी बाबू कवळेकर यांना अधिकृत आमंत्रण नव्हते, असे म्हणावे लागेल. काल बाबू कार्यक्रमस्थळी आले; पण अधिकृत आमंत्रण नसल्याने त्यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा आधार घेत कार्यक्रम स्थळावर जाण्याची वेळ आली. ∙∙∙
राज्यातील चोरांनी बहुधा एकदाच “टार्गेट मिटिंग” घेतली असावी. “आजच काम उरकायचं!” असा काहीसा त्यांचा निर्धार दिसतोय. कारण एका दिवसात एवढ्या घरफोड्या झाल्या, की लोकांनी सीसीटीव्हीपेक्षा शेजाऱ्यांच्या खिडक्यांवर जास्त लक्ष ठेवायला सुरुवात केलीय. आता प्रश्न असा, की चोर जास्त हुशार झालेत, की सुरक्षा यंत्रणा जास्तच निर्धास्त झालीय? लोक विचारतात, “रात्री गस्त घालणारे पोलिस दिसत नाहीत; पण सोशल मीडियावर शुभेच्छा देणारे मात्र वेळेवर दिसतात!” सुरक्षेवर प्रश्न विचारला, की काही मंडळी लगेच म्हणतात, “राज्याची बदनामी करू नका.” पण घराचं कुलूप तुटल्यावर नागरिकांना बदनामीपेक्षा कपाटातील उडालेल्या वस्तू जास्त आठवतात! नुकतेच बढती मिळालेले पोलिस अधीक्षक, नव्या गाड्या, नवे स्टार, नवे फोटो... सगळं नवीनच! फक्त चोर पकडण्याचा वेग मात्र अजूनही जुन्याच स्टाईलने आहे, अशी चर्चा गल्ली-बोळात ऐकू येतेय. ∙∙∙
फोंड्यातील पोटनिवडणुकीत सध्या भाजपसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंड्याची विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी आता येत्या मार्च महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, सत्ताधारी भाजपसमोर एक म्हणजे रविपुत्र रितेश नाईक आणि दुसरे म्हणजे विश्वनाथ दळवी यांचे नाव आहे. सध्या तरी दोन्ही नेते प्रबळ मानले जातात. त्यातच रितेश यांनी वडिलांचे कार्यालय सुरूच ठेवले असून प्रत्येक शनिवारी या कार्यालयात नागरिक आणि गरजवंतांची मोठी गर्दी असते. त्यातच भाजपचे विश्वनाथ दळवी यांनीही ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’ या नावाने फोंड्यातच कार्यालय सुरू केले आहे. या दोन्ही नेत्यांनी तिकिटावर प्रबळ दावेदारी केल्यामुळे भाजप नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. आता रितेश समाजसेवेचे ऑफिस चालवतो म्हटल्यावर ‘हम भी कुछ कम नही’, याचा प्रत्यय देत विश्वनाथ यांनीही ऑफिस थाटले आहे. पाहुया पुढे काय होते ते.! ∙∙∙
विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा व सर्व सुविधा मिळतात. गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना खरे म्हणजे आठ आमदारांच्या पक्षांतरानंतर खरे म्हणजे या पदाची लॉटरीच लागली. विधानसभा संकुलात मोठे प्रशस्त दालन, बोर्ड रुम, १६ कर्मचारी, वाहने, पोलिस सुरक्षा रक्षक अशा अनेक सुविधा त्यांना अधिकृतपणे मिळतात. गोव्याबाहेर गेल्यावरही संबंधित राज्यांच्या शिष्टाचार खात्यांकडून सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातात. आता एवढे सांगायचे कारण म्हणजे, युरीबाब आपल्या पदाला खरोखरच न्याय देतात का? परवा प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते. आझाद मैदानावर डॉ. त्रिस्तांव ब्रागांझा यांचा स्मृतिदिन, ओपिनियन पोल दिनाचा शासकीय कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांना युरीबाब उपस्थित नव्हते म्हणे. आता कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा व सर्व सुविधा घेताना शासकीय कार्यक्रमांत युरी आलेमाव दांडी का मारतात? असा प्रश्न गोमंतकीय विचारत आहेत. ∙∙∙
पेडणे मतदारसंघावर वारंवार आपला दावा सांगणारे भाजपचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासमोर काय बोलतील, याची धास्ती अनेकांना लागली आहे. कारण ३० जानेवारी रोजी नितीन नवीन हे दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री या नात्याने बाबू आजगावकर यांना निमंत्रण असणार आहे. त्यावेळी आजगावकर यांना बोलण्याची संधी मिळाली तर ते काय बोलतील, याविषयी सध्या तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहे. ∙∙∙
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील विधानसभा निवडणुकीला पक्ष सामोरा जाईल, हे बुधवारी स्पष्ट झाले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत पाटकर यांनी काही आग्रही मते मांडली. काँग्रेसवर वरचष्मा असलेले मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांत आघाडी करता येतील, असे पाटकर यांनी सुचवले आहे. या साऱ्यामुळे पाटकर हे प्रदेशाध्यक्षपदी नको, अशी हाकाटी करणाऱ्यांना उत्तर मिळाल्याची चर्चा मंगळवारी होती. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.