

‘इतिहासाची पुनरावृत्ती होते’ अशा आशयाचे इंग्रजीत एक वाक्य आहे. कुंकळ्ळी गावाला शौर्याचा इतिहास आहे. बारा बांधाचे पाणी प्यायलेले ‘कुंकळ्ळीकार’ असे या गावातील लोकांना अभिमानाने संबोधले जाते. या शूर वीरांच्या गावातील तीन पोलिस अधीक्षक पोलिस सेवेत आहेत.या पूर्वी टोनी फर्नांडिस व सेमी सॅमी तावारीस यांनी पोलिस अधीक्षक म्हणून सेवा दिलेली आहे.आता उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर , पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष देसाई व आता परवा बढती मिळून अधीक्षकपदी रुजू झालेले राजेंद्र प्रभुदेसाई असे तीन कुंकळ्ळीचे सुपुत्र पोलिस सेवेत अधीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. ‘देश सेवा व सुरक्षा हाच आपला परमोधर्म’ असा संदेश या गावाने दिलेला आहे. ∙∙∙
तुये येथील सुरू होऊ घातलेले इस्पितळ गोमेकॉशी जोडले जाण्याचा सरकारी आदेश जारी झाला आहे. आता त्या इस्पितळात सर्व सोयी सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध होतात की, नाही यावर पेडण्यातील अनेकजण लक्ष ठेवणार आहेत. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने हे काम स्वीकारले आहे. या व्यक्ती कुठेही आंदोलनात दिसणार नाहीत. पेडणे तालुका नागरिक कृती समितीच्या माध्यमातून त्या व्यक्ती समितीचे कान डोळे बनून काम करणार आहेत. सरकारने दिलेला शब्द कितपत पाळला जातो की नाही, यावर या सर्वांची नजर असेल. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने त्यांचे काम तेवढेच जोखमीचे असेल. ∙∙∙
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी परवा पर्वरीतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये कुंकळ्ळीचे कॉंग्रेस गट अध्यक्ष आसिज नोरोन्हा व इतर काहींजणांना खास मेजवानी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण या मेजवानीचे छायाचित्रे या रेस्टॉरंटच्या मालकाने आपल्या समाजमाध्यमांवर टाकले. एवढेच नव्हे तर, नोरोन्हा यांनीही आपल्या समाजमाध्यमांवरील अकाऊंटवर छायाचित्रे टाकून आनंद व्यक्त केला. या मेजवानीचे बिल कोणी अदा केले माहीत नाही, पण ते बिल युरीबाब यांनी अदा केले असावे, असा अंदाज व्यक्त करीत कॉंग्रेसचे इतर गटाध्यक्ष युरीबाबांच्या मेजवानीच्या निमंत्रणाची प्रतिक्षा करू लागले आहेत. दुसरीकडे लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी विरोधी पक्षनेते लवकरच आपले वेळापत्रक जाहीर करोत, अशी अपेक्षा गोमंतकीय बाळगून आहेत.∙∙∙
फोंड्याची पोट निवडणूक तोंडावर आल्यामुळे फोंड्यात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण येऊ लागले आहे. आणि जास्त चर्चा होत आहे, ती भाजपच्या उमेदवारीची. दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश व भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी हे दोघे स्पर्धेत आहेतच. या दोघांशिवाय इतर नावेही चर्चेत आहेत. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नावाचे पिल्लू काहींनी सोडले होते. माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचे नावही अधून मधून डोके वर काढताना दिसत आहे. आता आणखी एक नाव चर्चेत आले आहे, ते म्हणजे माजी खासदार तथा माजी मंत्री विनय तेंडुलकर यांचे. परवा बेतोडा येथे पार पडलेल्या गणेश जयंती चे यजमान असलेल्या विनय तेंडुलकरांचा ‘उत्साह’ पाहून हे तर भाजपचे उमेदवार नव्हे ना, असे तिथे उपस्थित असलेल्या फोंड्याच्या अनेक भाविकांना वाटायला लागले. तेंडुलकर हे यापूर्वी सावर्डे मतदारसंघातून दोनदा आमदार झाले असले तरी त्यांचा फोंड्याशीही चांगलाच ‘टच’आहे. फोंड्यात त्यांचे कार्यालय ही आहे. या बाबी अधिक त्यांची एकनिष्ठता यामुळे त्यांच्या नावावर ‘शिक्का मोर्तब’ होऊ शकते, असे उपस्थितांत बोलले जात होते. आता काय खरे आणि काय खोटे हे कळेलच पण फोंड्याच्या भाजपच्या उमेदवारीचे ‘रहस्य’ दिवसे दिवस गडद होत चालले आहे, एवढे मात्र नक्की. ∙∙∙
जिल्हा पंचायतीत काही प्रमाणात मिळालेल्या यशा मुळे काँग्रेस पक्षाचे गोव्यातील नेतृत्व हरळून गेले आहे. भाजपने या पूर्वी २०२७ मध्ये २७ असा नारा केला होता. जिल्हा पंचायत निवडणुकी नंतर त्यांनी २७ ऐवजी ३१ असा केला. हम भी कुछ कम नही है, अशा ऐटीत काँग्रेसने २०२७ मध्ये २७ असा नारा सुरू केला आहे. त्यांचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी हल्लीच २०२७ मध्ये २७ जागा काँग्रेस मिळवणार, असे भाकीत करून टाकले आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षाने कुठल्याही इतर पक्षांकडे युती न करता निवडणुक लढवावी असेही मत व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत आम आदमी, रेव्होल्युशनरी गोवन्सचे सोडा, पण काँग्रेस बरोबर युती असलेल्या गोवा फॉरवर्डचे काय होणार हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभािवक आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गवणेश रद्द करणार, अशी जी विजयबाबने घोषणा केली आहे. याला व कॅप्टनच्या नारेबाजीचा काही संबंध आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सध्या गोमंतकीय जनता सतर्क झाली आहे. ∙∙∙
शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो मॅडम यांनी काल एका कवीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थिती लावली. पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. मुळात साहित्यिक कार्यक्रमांना आजकाल उपस्थिती अगदीच नगण्य असते, असं म्हटलं जातं. हाही कार्यक्रम त्याला अपवाद नव्हता. त्यात उन्हाच्या झळा सोसवत नव्हत्या; तरीही कवितेवर प्रेम करणाऱ्या मंडळींची उपस्थिती होती. दिलायला मॅडमनी जोरदार भाषण दिले; कवीचे कौतुक केले अन् आपण केलेल्या विकासकामाचा आढावाही मांडला. मॅडमनी केलेल्या विकासकामांचे कौतुकही झाले, पण साहित्यिक कार्यक्रमात विकासकामांची माहिती देणं खरंच गरजेचं होतं का?, अशी चर्चा उपस्थितांत होत होती! ∙∙∙
गोव्यात १६ वर्षांखालील मुलांनी सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात येईल, अशा स्वरुपाचे सुतोवाच माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी केल्याची माहिती सोशल मीडियात पसरली आणि उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोरोना पूर्वीच्या काळात मुलांकडे मोबाईल देऊ नये, असा आग्रह शाळाचालक धरायचे. कोरोनाचा काळ आला अन् सगळंच बदललं. मुलांना मोबाईल वापरायची सक्ती करावी लागली. अभ्यासाच्या निमित्ताने मुलांकडे दिलेला मोबाईल आता काढून घेणं शक्य होत नाहीये.त्यामुळे त्यांच्या ‘सोशल मीडिया’ वापरावर बंदी शक्य आहे का? हाही प्रश्न उरतोच. शिवाय मंत्री महोदयांचा हेतू चांगला आहे, पण काहींनी विचारणा केलीय की, ‘वाढत्या भ्रष्टाचारावर बंदी कधी? आहे का उत्तर मंत्री महोदयांकडे? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.