जानेवारी महिन्यातील २४, २५ आणि २६ तारखांच्या सलग सुट्यांमुळे गोव्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. महाराष्ट्र, कर्नाटकासह देशातील विविध राज्यांतून हजारो पर्यटकांनी गोव्यात हजेरी लावली. समुद्रकिनारे, कॅफे, नाईटलाइफ आणि खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.
मात्र यंदाच्या लॉन्ग वीकएंडमध्ये पर्यटनाचा आनंद घेताना अनेकांना वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या मर्यादांचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसून आले.
मुंबईहून गोव्याला गेलेल्या एका पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनुभवामुळे या समस्यांवर चर्चा रंगली आहे. त्या पर्यटकाने लिहिले की, “गोव्यातील लॉन्ग वीकएंड संपवून नुकताच परतलो आणि खरंच सांगायचं तर गोवा मला खूप आवडला. समुद्रकिनारे, कॅफे, खाणं-पिणं, पार्टीज आणि एकूणच वातावरण मन मोहून टाकणारं आहे. मात्र परतीचा प्रवास पूर्ण मूड खराब करणारा ठरला.”
त्याने पुढे नमूद केले की, दुपारी ३ वाजता आरंबोल येथून मडगाव रेल्वे स्थानकाकडे निघालो. मडगावहून मुंबईला जाणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा ११ वाजता पोहोचणार होती. मात्र बसचा गोंधळ, ट्रेनच्या वेळेतील विलंब आणि कोणतीही व्यवस्थित व्यवस्था नसल्यामुळे जवळपास २० तासांचा प्रवास त्रासदायक ठरला.
“गोव्यात असताना वाटत होतं, इथे वारंवार यायला हवं. पण मुंबईला पोहोचल्यानंतर मनात आलं, पुन्हा हा त्रास सहन करायचा का?” असे त्याने लिहिले.
या पोस्टमध्ये गोव्यातील व्यवस्थापनावरही टीका करण्यात आली आहे. “गोवा फक्त निसर्गाच्या सौंदर्यावर आणि खासगी व्यवसायांवर चालतोय. सार्वजनिक वाहतूक आणि व्यवस्थापन इतकं कमकुवत आहे की पर्यटन सुधारण्याऐवजी उलट खराब होतंय. हा विरोधाभासच सगळ्यात त्रासदायक वाटतो,” असे त्याचे मत आहे.
या पोस्टखाली अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले, “गोवा हे स्वतःची गाडी घेऊन फिरण्याचं ठिकाण आहे.” तर दुसऱ्या युजरने सल्ला दिला की, “गोव्यात फिरण्यासाठी रेंट बाईक घ्या किंवा महागड्या टॅक्सीचा वापर करा.”
या चर्चेमुळे गोव्यातील पर्यटनासाठी सार्वजनिक वाहतूक, रेल्वे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.