Goa Loksabha Result Silent voters in Canacona voted for india alliance candidate against BJP's South Goa candidate Pallavi Dempo Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election Result: दहा हजारांच्या मताधिक्क्याला सुरुंग; काणकोणात पल्लवी धेंपेंना चांगली मतं, पण ‘सायलेंट’ मतदारांनी केला घात

South Goa Candidate Pallavi Dempo: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘सायलेंट’ मतदारांनी आपला कौल इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या बाजूने देऊन भाजपला धक्का दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result: भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांना काणकोणमधून दहा हजारांचे मताधिक्य देण्यासाठी भाजप कार्यकर्ते तसेच सभापती रमेश तवडकर यांनी चंग बांधला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘सायलेंट’ मतदारांनी आपला कौल इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या बाजूने देऊन भाजपला धक्का दिला आहे.

सभापती तवडकर यांनी जाहीर सभांमधून भाजप उमेदवाराला दहा हजारांहून जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपचे काही कार्यकर्ते मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजप उमेदवाराला काणकोण मतदारसंघातून तीन - साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळणार असे गणित मांडत होते.

मात्र, दोन्ही गणिते ‘सायलेंट’ मतदारांनी फोल ठरवून सुमारे सात हजार मतांची आघाडी भाजपच्या उमेदवार धेंपे यांच्या पदरात टाकली. दक्षिण गोव्याच्या अन्य मतदारसंघात भाजपची झालेली पिछेहाट काणकोण मतदारसंघातील आघाडीने भरून काढता आली नाही.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांना काणकोणमध्ये यांना ५९०० मतांची आघाडी काणकोणातून मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विजय पै खोत, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी भाजपच्या उमेदवार धेंपे यांना समर्थन दिले होते. त्यामुळे भाजपचे काणकोणमधील मताधिक्य वाढणार अशी आशा होती. मात्र, या तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रमेश तवडकर यांना ३०५१ मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यांना ९०६३ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांना ६०१२, काँग्रेसचे जनार्दन भंडारी ५३५१, अपक्ष उमेदवार विजय पै खोत ४७९१ व रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रशांत पागी यांना १५९९ मते मिळाली होती.

आगोंद वगळता पालिका व अन्य पंचायतीत भाजपला आघाडी....

आगोंद पंचायतीत काँग्रेस उमेदवाराला १३१ मतांची आघाडी मिळाली, तर भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक २९४४ मतांची आघाडी पालिका क्षेत्रात मिळाली. आगोंद पंचायतीत भाजप उमेदवाराला ११०८ व काँग्रेस उमेदवाराला १२३९ मते मिळाली. पालिका क्षेत्रात भाजपला ५२९० व काँग्रेसला २३४६, श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात भाजपला १८८१ व काँग्रेसला ११४४, पैंगीण पंचायत क्षेत्रात भाजपला २८२६ व काँग्रेसला १४२५ मते मिळाली.

खोतिगाव पंचायत क्षेत्रात भाजपला १२२३ व काँग्रेस उमेदवाराला ५७९ मते मिळाली. लोलये पंचायत क्षेत्रात भाजपला १९६१ व काँग्रेसला ११६९, तर गावडोंगरी पंचायत क्षेत्रात भाजप उमेदवाराला १९७०, काँग्रेस उमेदवाराला १२१२ मते मिळाली. पोस्टल मते वगळता भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना १६३१८ व काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस यांना ९१३४ मते मिळाली. भाजप उमेदवाराने काणकोणात ७२२५ मतांची आघाडी घेतली.

४८ बुथ केंद्रामधून धेंपेंना मताधिक्य

धवळखाजन, काराशीरमळ, पाळोळे, शिंगोळे-भोळो, भाटपाळ, अर्धफोंड, पासल, मुठाळ - सादोळशे, चिपळे - गाळये, माशे अशा एकूण ११ बुथ केंद्रावर मताधिक्य कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्राप्त झाले, तर ४८ बुथ केंद्रावर भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना मताधिक्य मिळाले.

आम्ही थोडे कमी पडलो: सभापती

आम्ही १० हजाराचे मताधिक्य म्हटले होते, तरी आमचे लक्ष्य ८ हजारांचेच होते. आम्ही आमचे लक्ष्य गाठण्यात थोडे कमी पडलो. आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली. इंडी आघाडीच्या कार्यकर्ते मतदारांना अधिक चांगल्याप्रकारे आपले म्हणणे पटवून सांगू शकले. अल्पसंख्याकांना एनडीएसंदर्भात भीती घालू शकले असे वाटते.

थोडी खुशी थोडा गम

केंद्रात मोदी सरकार पुन्हा येणार त्याचप्रमाणे भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांना काणकोणमधून भरघोस ७१८४ मतांची आघाडी मिळाली याबद्दल खुशी आहे. उत्तरेतून सहाव्यांदा श्रीपाद नाईक खासदार म्हणून निवडून आले याबद्दलही आनंद आहे. मात्र, दक्षिणेतील उमेदवार धेंपे निवडून येऊ शकल्या नाहीत याचे दुःख आहे, अशीच काणकोणमधील भाजप कार्यकर्त्यांची स्थिती झाली आहे.

काणकोणमधून दहा हजार मताधिक्य अपेक्षित होते. मात्र, ते मताधिक्य देण्यासाठी आम्ही कुठे कमी पडलो याची कारणमीमांसा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन करण्यात येईल. मात्र, कार्यकर्त्यांनी पोस्टल मते वगळता ७१८४ मते मिळवली. ती आघाडी अन्य मतदारसंघातील पिछाडीवर मात करू शकली नसल्याचे शल्य असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT