Goa Loksabha Election Result: सासष्‍टीमुळेच ‘ऑपरेशन विजय’, कॅप्‍टनना मतदारांचा खंबीर पाठिंबा; आठपैकी सात मतदारसंघांत आघाडी

Goa Loksabha Election Result: ‘अबकी बार, चारसो पार’ ही घोषणा देत निवडणुकीच्‍या रिंगणात उतरलेल्‍या भाजपला सासष्‍टीतील मतदारांनी धोबीपछाड दिला.
Goa Loksabha Election Result Voters in Sasashti rejected the BJP and voted for Viriato Fernandes in a big way
Goa Loksabha Election Result Voters in Sasashti rejected the BJP and voted for Viriato Fernandes in a big way Dainik Gomantak

Goa Loksabha Election Result:  ‘अबकी बार, चारसो पार’ ही घोषणा देत निवडणुकीच्‍या रिंगणात उतरलेल्‍या भाजपला सासष्‍टीतील मतदारांनी धोबीपछाड दिला आणि काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सर्वांना धक्‍का देत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ सर केला. एक मडगाव विधानसभा मतदारसंघ वगळता सासष्‍टी तालुक्‍यातील अन्‍य सातही मतदारसंघांतील मतदारांनी आपले दान कॅप्‍टनच्‍या झोळीत टाकले. त्‍यामुळे दक्षिण गोव्‍याच्‍या राजकारणात सासष्‍टीचे महत्त्‍व किती महत्त्‍वपूर्ण आहे हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले.

दरम्यान, या तालुक्‍यातील बाणावली, वेळ्‍ळी व नुवे या तीन मतदारसंघांत काँग्रेसने प्रत्‍येकी दहा हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी प्राप्‍त केली. तर, कुडतरी मतदारसंघात पाच आकडी आघाडी घेण्‍यात या पक्षाला ७१५ मते कमी पडली. कुंकळ्‍ळी व नावेलीतही काँग्रेसने चांगली कामगिरी करताना सरासरी प्रत्‍येकी सहा हजारांची आघाडी प्राप्‍त झाली.

फातोर्डा मतदारसंघात भाजप किमान एक हजार मतांची आघाडी घेणार अशी अपेक्षा व्यक्त होत‍ होती. मात्र गोवा फॉरवर्डने काँग्रेसला दिलेला पाठिंबा त्‍यांच्‍या कामी आला. सर्वांच्‍या अपेक्षा फोल ठरवत फातोर्ड्याने काँग्रेसला २४३७ मतांची आघाडी दिली. काँग्रेसचा विजय या सात मतदारसंघांतील मतांवर नक्‍की झाला.

Goa Loksabha Election Result Voters in Sasashti rejected the BJP and voted for Viriato Fernandes in a big way
Goa Loksabha Election Result: 'दक्षिणेत धर्माच्या आधारावर मतदान, पहिल्यांदाच आम्ही 2 लाखांहून अधिक मते मिळवली'- भाजप प्रदेशाध्यक्ष

फोंडा तालुक्‍यातून भाजपला ३० हजार मतांच्‍या आघाडीची अपेक्षा होती. परंतु ही आघाडी २० हजारांवर येऊन ठेपल्‍याने तेथे भाजपला किमान १० हजार मतांचा फटका बसला. मडकईत १०,७४८ मतांची आघाडी भाजपने समाधानकारक कामगिरी केली असली तरी फोंडा आणि शिरोड्यातील आघाडी अनुक्रमे ४७५६ आणि ४९८५ एवढीच राहिली.

मुरगाव तालुक्‍यानेही मतांच्‍या बाबतीत भाजपला चांगलाच दगा दिला. या तालुक्‍यातील चार मतदारसंघ भाजपला किमान १५ हजारांची आघाडी मिळवून देतील अशी अपेक्षा होती. मात्र मुरगाव, वास्‍को व दाबोळी या तीन मतदारसंघांत भाजपला फक्‍त ८०२० मतांची आघाडी मिळाली. या उलट कुठ्ठाळी मतदारसंघात काँग्रेसने १९२३ मतांची आघाडी प्राप्‍त करण्‍याची किमया साधली.

सावर्डे मतदारसंघात ९५११ मतांची आघाडी घेऊन भाजपने चांगली कामगिरी केली. मात्र सांगेत आपण भाजपला दहा हजारांची आघाडी मिळवून देईन अशी गर्जना करणाऱ्या सुभाष फळदेसाई यांना फक्‍त ५३२० मतांच्‍या आघाडीवर समाधान मानावे लागले. काणकोण मतदारसंघात रमेश तवडकर, विजय पै खोत आणि इजिदोर फर्नांडिस यांनी एकत्रित जोर लावूनही भाजपची आघाडी ७१३२ मतांपुरतीच सीमित राहिली.

तर, कुडचडेत ती आणखी कमी होऊन १६९५ एवढी खाली उतरली. दरम्‍यान, केपे मतदारसंघात काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा असताना भाजपने संघटित विरोध केल्‍याने काँग्रेसला ७८५ मतांच्‍या आघाडीवरच समाधान मानावे लागले.

Goa Loksabha Election Result Voters in Sasashti rejected the BJP and voted for Viriato Fernandes in a big way
Goa Loksabha Election Result: उत्तरेत नाईकांचा विजयी षटकार; कॅप्टनकडून धेंपेंना ‘सायलेंट’ धक्‍का

हिंदू मतदारसुद्धा राहिला काँग्रेसच्‍या बाजूने

ख्रिश्‍‍चन आणि मुस्‍लिम मतदारांनी यावेळी अगदी ठरवून म्‍हणतात तसे काँग्रेसला मतदान केल्‍याने दक्षिण गोव्‍यात या पक्षाला अल्‍पसंख्‍याकांची जवळपास ९० टक्‍के मते मिळाली. तसेच हिंदूबहुल भागातील हिंदू मतदारांनीही कुठलाही गाजावाजा न करता आपली मते काँग्रेसच्‍या पारड्यात टाकली. त्‍यामुळे या पक्षाने दक्षिण गोवा सहज सर केला.

मडगाव आणि कुडचडे या दोन्‍ही मतदारसंघांत हिंदू मतदार मोठ्या संख्‍येने आहेत. तरीही तेथे भाजपला अनुक्रमे १३२३ आणि १६९५ मतांचीच आघाडी मिळाली. यावेळी भाजपने बाहेरचा उमेदवार आपल्‍यावर लादला अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्‍ये झाली होती. त्‍याचेही पडसाद मतदानात उमटले. मुरगावसह सांगे आणि काणकोण या हिंदूबहुल मतदारसंघांतही भाजप अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.

Goa Loksabha Election Result Voters in Sasashti rejected the BJP and voted for Viriato Fernandes in a big way
Goa Loksabha Result: पाच पांडव, मनी पॉवर, मोदींचा नैतिक पराभव; भाजप- काँग्रेसला गोव्यात 1-1 जागा, विजयानंतर कोण काय म्हणाले?

‘आरजी’च्या मतांचा भाजपला दणका

२०२२च्‍या विधानसभा निवडणुकीत रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) पक्ष मैदानात उतरला आणि भाजपने त्‍याचा फायदा उठविला. यावेळीही ‘आरजी’ रिंगणात असल्‍याने भाजपला त्‍याचा फायदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र ‘आरजी’ने ख्रिस्‍ती मतदारसंघांपेक्षा हिंदूबहुल मतदारसंघांतच अधिक मते घेतली. त्‍यामुळे ‘आरजी’चा फटका जर कुणाला बसला असेल तर तो भाजपलाच असे म्‍हणावे लागेल.

‘आरजी’चे उमेदवार रुबर्ट परेरा यांना एकूण १७,२०५ मते प्राप्‍त झाली. मात्र त्‍यातील सर्वाधिक मते ही मडकई आणि शिरोडा मतदारसंघांतील होती. मडकईत त्‍यांना २८२९ तर शिरोड्यात २८०८ मते प्राप्‍त झाली. सावर्डे मतदारसंघात ‘आरजी’ला २०६९ तर केपेत १०२९ मते मिळाली. या उलट सासष्‍टीतील आठ मतदारसंघांत त्‍यांना ८०० मतांचा टप्‍पा पार करता आला नाही. एकूणच ‘आरजी’मुळे भाजपला किमान ७ ते ८ हजार मतांचा फटका बसला असे म्‍हणावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com