साखळी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखळी मतदारसंघात निकालासाठीची तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
मतमोजणी व देशभरातील निकालाचे थेट प्रक्षेपण लोकांना पाहता यावे, यासाठी भाजपच्या साखळी मंडळातर्फे विविध ठिकाणी स्क्रीन लावण्यात आले आहेत. तसेच भाजपच्या विजयाचीही जय्यत तयारी केली गेली
आहे.
या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या श्रीपाद नाईक यांच्या विरोधात ॲड. रमाकांत खलप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर या मतदारसंघातील लढतीची चुरस वाढली होती. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त मतदान मिळविण्यासाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जोर लावला होता.
त्यात साखळी मतदारसंघ हा या निवडणुकीत लक्षवेधी ठरला होता. यावेळी भाजपला जास्तीत जास्त मतदान देण्याचे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर होते. या मतदारसंघात भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आत्तापर्यंत झालेल्या विकासकामांच्या बळावर जास्तीत जास्त मतदान मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.
‘दोन्ही जागांवर कमळच फुलणार’
‘एक्झिट पोल’मध्ये भाजपला ३६० ते ४०० जागा मिळतील असे म्हटले आहे. त्यामुळे ‘अबकी बार ४०० पार’ ही आमची घोषणा खरी ठरणार आहे. या ‘एक्झिट पोल’वर व मीडियावर काँग्रेस पक्षाने संशय व्यक्त करून आपली हार मान्य केली आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर कमळच फुलणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांची साखळीत ‘चाय पे चर्चा’
सर्वत्र निवडणूक निकालाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी बाजारातील साईप्रसाद हॉटेलमध्ये जाऊन रात्री चहा पिण्याचा आनंद घेतला. यावेळी दत्ताराम चिमुलकर, धिरेश पेडणेकर, सुविधा पेडणेकर व हॉटेलमालक लवू काणेकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांची ‘चाय पे चर्चा’ रंगली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.