CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: शरद पोंक्षेंच्या 'पुरुष'मुळे कला अकादमीतील दोष उघडा पडला; सरकारचे माैन, विरोधक, कलाकारांचा मात्र हल्लाबोल

Goa Kala Academy Controversy: कला अकादमीच्या ‘पुरुष’ नाटकावेळी प्रकाश योजनेच्या फ्लिकर्समुळे सादरीकरण थांबवावे लागले. नाटकाच्या सादरीकरणानंतर शरद पोंक्षे यांनी कला अकादमीतील सदोष यंत्रणा, अपुऱ्या सुविधांवर टीका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Kala Academy Lighting Failure During Play Controversy

पणजी: गेली चार वर्षे या ना त्या कारणाने वादात असलेल्या कला अकादमीत ऐन नाटक सुरू असताना प्रकाश यंत्रणा बंद पडल्याने सरकारची पुरती नाचक्की झाली आहे. या प्रकरणावर निदान चौकशी करतो असे निवेदन सरकारकडून येणे अपेक्षित असताना कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडेंसह सरकारने यावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

दुर्लक्षित ठेवून या विषयाचे महत्त्व कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असला तरी समाज माध्यमांवर आणि सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आधी कला अकादमीच्या वास्तूच्या नूतनीकरणाच्या नावावर झालेले प्रकार, सत्य शोधनासाठी नेमलेल्या कृती दलाकडे सरकारकडूनच (Government) होणारे दुर्लक्ष आणि आता नाटक प्रकाश यंत्रणा रुसल्यामुळे १० मिनिटे बंद ठेवण्याची आलेली वेळ यावरून सरकार टीकेचे धनी झाले आहे. संबंधितांवर दोष निश्चित करण्यासाठी सरकारला आणखीन काय हवे अशी विचारणा होऊ लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अग्निशमन दलाच्या कार्यक्रमाला आले असता ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने हा विषय त्यांच्यासमोर मांडला.

कला अकादमीच्या ‘पुरुष’ नाटकावेळी प्रकाश योजनेच्या फ्लिकर्समुळे सादरीकरण थांबवावे लागले. नाटकाच्या सादरीकरणानंतर शरद पोंक्षे यांनी कला अकादमीतील सदोष यंत्रणा, अपुऱ्या सुविधांवर टीका केली. या घटनेची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. त्यामुळे अगोदरच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अकादमीच्या झालेल्या पुरत्या बदनामीत आणखी भर पडली. या प्रकारावर सरकारच्या बाजूने तत्काळ स्पष्टीकरण येणे अपेक्षीत होते, पण त्यावर सरकारने सोयीस्करपणे मौन बाळगले. तर दुसरीकडे, विरोधकांनी तसेच कलाकारांनी या विषयावरून सरकारला धारेवर धरले.

गांभीर्य कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

काल जो तांत्रिक घोळ झाला तो मनाला यातना देणारा होता. या नाट्यगृहाचे नूतनीकरण केल्‍यानंतर त्‍यात ज्‍या त्रुटी राहिल्‍या त्‍याबद्दल स्‍थानिक कलाकारांनी वेळोवेळी आवाज उठवूनही सरकारने बहिऱ्याची भूमिका घेतली होती. गोवा ही कलेची भूमी आहे आणि या राज्‍यातील मुख्‍य नाट्यगृह असे सदोष असेल, तर ती गोव्‍यासाठी लाजिरवाणी बाब आहे. गोवा (Goa) सरकार या नाट्यगृहाचा मृत्‍यूचा दाखला लिहीत आहे का?

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष, आप

कला अकादमीत काल जे काही घडले ती नामुष्कीच म्हणावी लागेल. मुख्य म्हणजे जे काय झाले आहे त्याची जबाबदारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत किंवा कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे घेण्यास तयार नाहीत. वास्तविक नूतनीकरणाच्या नावावर कला अकादमी वास्तूची जी वाताहात करून टाकली आहे त्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

विजय सरदेसाई, आमदार

शरद पोंक्षे यांच्यासारख्‍या दिग्‍गज कलाकाराने कला अकादमीतील त्रुटींवर बोट ठेवल्‍यानंतर तरी सरकारला जाग येऊन कला अकादमीवर ही परिस्‍थिती कुणी आणली याची चौकशी करून त्‍याच्‍यावर कारवाई केली जाईल का? आत्तापर्यंत अनेकांनी अनेकदा कला अकादमीच्या स्थितीबाबत आवाज उठवून जाग आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. तसेच दुर्लक्ष सरकार आताही करणार का?

विजय केंकरे, अध्यक्ष, टास्क फोर्स

थिएटरचा बाह्यभाग चांगला कसा दिसेल यावर भर देत थिएटर्स बांधली जात आहेत. रंगमंचाच्या/सादरीकरणाच्या मुख्य गरजा काय असतात हे लक्षात घ्यायची गरज संबंधितांना वाटत नाही, याला काय म्हणावे? नाट्य कलाकाराला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या सर्व सुविधा जर नाट्यगृहात मिळत नसतील, तर तशा नाट्यगृहाचा उपयोग तरी काय?

नूतनीकरणाची श्वेतपत्रिका अद्याप लटकलेलीच

गेल्या अडीच वर्षांपासून विरोधी पक्षांकडून विधानसभा अधिवेशनात कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती, पण ती मागणीही सरकारने मान्य केलेली नाही. नूतनीकरणाच्या कामांविषयी कृती दलाचा अहवाल सरकारकडे गेला आहे, पण त्यावरही कृती होत नसल्याने कलाकारांमध्ये आणि कृती दलाच्या समिती सदस्यांमध्ये नाराजी आहे.

पोंक्षेंच्या टीकेनंतर सरकारचे वाभाडे

‘पुरुष’ नाटकाच्या सादरीकरणावेळी पोंक्षे यांनी मागितलेल्या माफीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी करायची ती टीका केली. अकादमीची पुरती शोभा झाल्याने विरोधकांकडून पुन्हा एकदा सरकारचे वाभाडे निघाले आहे. अकादमीविषयी टीका झाल्यानंतर कला व संस्कृती मंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. यावरून अकादमीच्या कोणत्याही घटनेबाबत किंवा टीकेबाबत सरकारकडून स्पष्टीकरण येईल, असे वाटत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT