Goa Kala Academy: गळती रोखण्‍यासाठी गोव्याच्या 'ताजमहाला'वर ताडपत्री टाकण्याची नामुष्‍की

Goa Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणावर आतापर्यंत सुमारे ५५ कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे.
Kala Academy Goa
Kala Academy Goa Dainik Gomantak

Goa Kala Academy

गोवा कला अकादमीच्‍या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना पावसामुळे मुख्य सभागृहात लागलेल्‍या गळतीमुळे या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सरकारने त्‍याची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्‍हणजे ही गळती थांबवण्यासाठी कला अकादमीच्या छपरावर ताडपत्री घालण्‍याची नामुष्‍की ओढवली आहे. यापेक्षा आणखी दुर्दैव ते कोणते?

गोवा कला अकादमीचा नावलौकिक देश-विदेशात आहे. या कला अकादमीचा आराखडा प्रसिद्ध वास्तुशिल्प रचनाकार चार्ल्स कुरैय्या यांनी तयार केला होता. मात्र तिचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतल्यापासून लागलेले ग्रहण अजूनही सुटलेले नाही.

कला अकादमीच्या नूतनीकरणावर आतापर्यंत सुमारे ५५ कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आणखी किती खर्च होणार हे त्‍या देवालाच माहीत.

कला अकादमीचे नूतनीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया अवलंबिली तर उशीर होईल असे स्पष्टीकरण कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी तेव्हा देत निविदा न काढताच ते काम एका कंत्राटदाराला दिले. मात्र ही घिसाडघाई आता त्यांच्या अंगलट आली आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या या संशयास्पद बांधकामाबाबत अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्यातच या कामावरून कला अकादमी व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात सुरू असलेल्‍या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात कलाकार व रसिकांची मोठी गैरसोय होत आहे.

गावडेंकडून समाजाचा ढालीसारखा वापर!

कला अकादमीच्या नूतनीकरण बांधकामाचा आतापर्यंतचा पूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मागविला आहे. दुसरीकडे कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे गेल्या काही दिवसांपासून समाजाची ढाल पुढे करून सरकारवर तुटून पडले आहेत.

सभापती रमेश तवडकर यांच्‍याशी तर त्‍यांनी उघड संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. त्‍यामुळे गावडे यांची खुर्ची डळमळीत झाली आहे, अशी चर्चा सुरू आहे.

नूतनीकरण कामाबाबत अनेक प्रश्‍‍न उपस्‍थित

काही दिवसांपूर्वी कला अकादमीच्‍या सभागृहात तियात्र सुरू असताना जोरदार अवकाळी पावसामुळे छपरातून गळती लागली. त्यामुळे नूतनीकरण कामाच्‍या दर्जाबाबत अनेक प्रश्‍‍न उपस्‍थित होऊ लागले आहेत. पुढील पाच-सहा दिवसांत गोव्यात मान्सून दाखल होऊ शकतो.

या अल्‍पमुदतीत कला अकादमीच्‍या छपराची डागडुजी करणे शक्य नाही. त्‍यामुळे त्‍यावर ताडपत्री घालून गळती रोखण्याचा पर्याय सार्वजनिक बांधकाम खात्याने निवडला आहे.

उच्च दर्जाची साऊंड सिस्टम बंद

काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिर सभागृहाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यात आला. सभागृहातील पूर्ण साहित्य बदलण्यात आले. मात्र या सभागृहात बसवण्यात आलेली उच्च दर्जाची साऊंड सिस्टम बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कलाकारांना स्वतःची ध्वनियंत्रणा आणावी लागते.

आता सर्वांचे लक्ष कारवाईकडे

सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीचे काम पूर्ण करून ती अजून कला-संस्कृती खात्याकडे दिलेली नाही. त्यामुळे मंत्री गोविंद गावडे यांनी या सर्व घटनांपासून हात वर केले आहेत. विशेष म्‍हणजे सार्वजनिक बांधकाम खाते हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे. त्यामुळे चौकशीनंतर त्यांच्याकडे येणाऱ्या अहवालातून ते कोणावर काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com