

Racist Attack On Indian Nurse Australia: ऑस्ट्रेलियातील जीलॉन्ग शहरात एका 22 वर्षीय भारतीय शीख नर्सवर अत्यंत निर्घृण वर्णद्वेषी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हरमनप्रीत सिंग असे या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात त्याच्या नाकाला गंभीर जखम झाली. ही घटना मंगळवारी (17 फेब्रुवारी) रात्री 'प्लॅनेट फिटनेस' जिमच्या बाहेर घडली. हरमनप्रीत आपला व्यायाम संपवून जिममधून बाहेर पडत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला.
हरमनप्रीतने दिलेल्या माहितीनुसार, जिमच्या आत असतानाच या तिघांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली होती. तो बाहेर येण्याची आरोपींनी वाट पाहिली आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला चढवला. या घटनेच्या एका व्हिडिओमध्ये एक हल्लेखोर त्याला "इंडियन डॉग" (भारतीय कुत्रा) म्हणताना आणि "तू जिथून आलास तिथे परत जा" अशा वर्णद्वेषी शिवीगाळ करताना दिसत आहे. हल्ल्यादरम्यान एका आरोपीने हरमनप्रीतच्या तोंडावर जोरात 'हेड-बट' (डोक्याने जोरात धडक) मारली, ज्यामुळे त्याच्या नाकाचे हाड तुटले आणि रक्तस्त्राव सुरु झाला.
हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी करड्या रंगाच्या कारमधून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या हरमनप्रीतने स्वतः रुग्णालय गाठून उपचार घेतले. त्याला रात्रभर रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. या दुखापतीमुळे त्याला कामावरुन आठवडाभराची सुट्टी घ्यावी लागणार असून नाकाची शस्त्रक्रिया करण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली आहे. हरमनप्रीत हा पेशाने नर्स आहे आणि त्याने यापूर्वीही अशा वर्णद्वेषी वागणुकीचा सामना केल्याचे सांगितले.
या घटनेमुळे ऑस्ट्रेलियात (Australia) स्थायिक असलेल्या भारतीय आणि शीख समुदायामध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. "मी स्वतःला खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण अशा घटना मनाला वेदना देतात. आता जिममध्ये परत जाण्यासाठी मला सुरक्षित वाटत नाहीये," अशी भावनिक प्रतिक्रिया हरमनप्रीतने दिली. ऑस्ट्रेलियातील वाढता वर्णद्वेष आणि स्थलांतरितांवरील हल्ले ही आता चिंतेची बाब बनली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. भारतीय समुदाय आणि मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.